किस्से दैनिकातले! भाग - 2

साधारणपणे 91-92 सालची घटना आहे. त्यावेळी राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती होती. पाण्यासाठी फार वणवण करावी लागत असे. दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासनाने विविध कामे सुरू केली होती. त्यातच विंधन विहीरी(बोअरवेल्स) तयार करण्याच्या कामाचाही समावेश होता. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही अनेक ठिकाणी बोअरवेल्स घेण्याचे काम सुरू होते. नाशिक शहरात असलेल्या मध्यवर्ती बस स्थानक परिसतातही अशीच एक विंधन विहीर घेण्यात आली. त्याचीच ही गंमत.

तर सांगायची गोष्ट अशी की एकदाचे त्या जागेवर बोअरींग करण्याचे ठरले आणि संबंधित यंत्रणा कामाला लागली. प्रत्यक्ष काम सुरू केल्यानंतर मात्र विशेष आश्‍चर्याची घटना घडली. केवळ 7 ते 8 फूटांवरच पाणी लागले, अन्‌ तेही मोठ्या दाबाने. एवढया दुष्काळात जमिनीत कमी खोलीवर पाणी लागणे, ही नवलाचीच गोष्ट होती. मग हा आनंद संबंधित यंत्रणेतर्फे सादर करण्यात आला व बोअरिंगचे काम त्या ठिकाणीच थांबवून ही यंत्रणा परतली.

ज्या जागेवर बोअरिंग घेतले होते, तेथे एक हॅंडपंप बसविण्यात आला. या हॅंडपंपला खूपच पाणी असायचे. अर्थात त्यातही एक गोम आढळली आणि ही बाब तर फारच विलक्षण होती. या हॅंडपंपला सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास पाणी असायचे नंतर मात्र ते गायब व्हायचे. हा काय वेगळा प्रकार म्हणून मग या गोष्टीचा पूर्णपणे शोध घेण्याचे ठरले.

तपासाअंती जे सत्य बाहेर आले ते फारच विनोदी आणि धक्कादायक होते. तर घडले असे होते, की ज्या जागेवर कमी खोलीवरच पाणी लागले ती जागा दुसरे-तिसरे काही नसून चक्क मुन्सिपाल्टीची भूमिगत जलवाहिनी होती आणि घाई गडबडीत या जलवाहिनीलाच बोअर केले होते. म्हणून अशा पद्धतीने विलक्षण घटना घडू शकली.

अर्थात याचा आणि दैनिकाचा काय संबंध? म्हणजे काय हीच तर त्या दिवशीची पहिल्या पानावरची बातमी होती. लोकांनी आवर्जून वाचली असेल यात शंकाच नाही. आणि ज्यांनी ही बातमी घडवली? त्यांचा चेहरा मात्र बघण्यासारखा झाला असेल. अर्थात मी मात्र तेव्हा हायस्कूलातला विद्यार्थी होतो. लक्षात राहिला आणि दैनिकाशी संबंधित म्हणून हा किस्सा सांगितला.

टिप्पण्या

Y3 म्हणाले…
म्यून्सिपाल्टीच्या कामाच कौतुक कराव तेवढ थोडच :)
Y3 म्हणाले…
म्यून्सिपाल्टीच्या कामाच कौतुक कराव तेवढ थोडच :)
amity म्हणाले…
प्रिय विंचुरकरी,
तुमचा इ-पत्ता नसल्याने, मी तुम्हाला टॅगिंगबद्दल कळवू शकलो नाही..
असो, मला तुमचे ब्लॉग्स आवडतात.. :)
keep blogging..

लोकप्रिय पोस्ट