डेअरी अभियानाचा ‘राजहंस’

गोष्टी बेरडवाडीच्या :  महाराष्ट्रातीलच एका कोपर्‍यात डोंगरपायथ्याशी वसलेलं एक गाव म्हणजे बेरडवाडी. येथील लोक म्हणजे एक से बढकर एक नमुने असल्याने या गावचा पत्ता सांगून आम्ही तुमची पंचाईत करणार नाही; पण बेरडवाडीतल्या प्रत्येक घडामोडी  नियमित तुमच्यापर्यंत पोचवण्याचे काम मात्र आम्ही करणार आहोत.  - - गाववाला


दुपार उलटत चालली, तशी अण्णा पाटलांची घालमेल वाढायला लागली. एरवी जेवणानंतर ओसरीवरच्या झोपाळ्यावर डुलत डुलत मस्तपैकी ताणून द्यायची ही अण्णाची सवय. त्यात आज तर पशुखात्याचा तालुक्याचा साहेब आल्यामुळे मस्तपैकी तांबड्या रश्शाचा बेत होता. साहेबांबरोबरच अण्णांनीही जेवणावर उभा आडवा हात मारला होता. अण्णाची पद्धत अशी होती की, असं खारं जेवण झालं की थेट माडीवरच्या खोलीत जायचं अन् दिवाणावर मस्तपैकी ताणून द्यायची; पण जेवणानंतर पशुअधिकार्‍यानं जे सांगितलं, त्यामुळं अण्णाचा चेहरा जास्तच चिंताग्रस्त झाला. साहेब तर निघून गेला; पण अण्णा पाटलाच्या जीवाला घोर लागला.


बेरडवाडीचा अण्णा पाटील म्हणजे एकदम इरसाल असामी. पिढ्यान् पिढ्या गावचं पुढारपण अण्णाच्या घराकडे चालत आलेलं. सरपंचकी असो, पंचायत समिती असो की साखर कारखाने, अण्णाचा वट सगळीकडे होता. अलिकडच्या काही वर्षांमध्ये तर अण्णानं दूध संघ आणि सहकारी सोसायट्यांवरची पकडही घट्ट केली होती. त्यामुळे समाजकारण असो नाही तर राजकारण अण्णा तसा पावरबाज समजला जायचा.

केवळ अण्णा पाटीलच नाही, अख्खी बेरडवाडी आणि तिथे राहणार्‍या नमुनेदार माणसांबद्दल सगळ्या तालुक्यात गवगवा होता. अण्णा पाटलाच्या जोडीला गावात मराठी शाळेचे कुलकर्णी मास्तर, मधल्या आळीतला रामा शिंपी आणि त्याचा मित्र दामू सोनार, वरच्या आळीत राहणारा भिवा पांगरे, अशी काही ‘सँपल’ मंडळी होती. अण्णा पाटलाला वेगवेगळ्या कामात हातभार लावणे आणि कधी कधी हात दाखविणे, याबददल त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे बेरडवाडीचे सगळेच त्यांच्यापासून चार हात लांब राहात. यांच्या डोक्यातून कधी काय येईल आणि कोणाला गंडा घालतील हे सांगणे महाकठीण. अण्णाची पद्धत अशी होती की काही अडचण आली, तर तो या चौघांपैकी कुणाला ना कुणाला मदतीला बोलवायचा. मग त्यांच्याशी बैजवार चर्चा करून काय ते ठरवायचा. आताही तसंच घडलं. जेव्हा अण्णाचं डोकं चालेना तेव्हा त्यानं या कुलकर्णी मास्तरला सांगावा धाडायला गड्याला पाठवलं.

अण्णाचा गडी बोलवायला गेला तेव्हा कुलकर्णी मास्तर टेबलावर पाय ताणून झोपलं होतं. त्यामुळे पोरांचा नुसता कालवा चालला होता. पण नेहमीची सवय असल्याने मास्तरच्या झोपेवर त्याचा काही परिणाम होत नव्हता. मास्तरची पोरंपण एकदम बेरकी होती. मास्तर झोपल्यावर एका कार्ट्यानं खुर्चीवरून लोंबणारं त्यांचं धोतर हळूच सुतळीनं टेबलाच्या पायाला बांधून टाकले होते; पण ते मास्तरला काही कळणार नव्हते, त्याचं आता घोरण्याचं आख्यान सुरू झालं होतं. अशा निवांत स्थितीत अण्णाच्या गड्यानं पचका केला. गडी थेट वर्गातच मास्तरच्या टेबलापाशी गेला आणि दवंडी पिटल्यागत त्यांच्या कानाजवळ ओरडला, ‘उठाऽऽ वो मास्तर... अण्णानं बोलवलंया वाड्यावर..’
एवढ्यावरच न थांबता गड्यानं पुन्हा एकदा हाळी देण्याची तयारी केली; पण त्याआधीच अचानक झालेल्या या आवाजानं मास्तर धडपडत उठलं, ते एकदम तोंडावरच पडलं. इतकं जोरात की त्याला खरं दात असतं, तर तीन-चार नक्कीच तुटलं असतं. पण तसं नसल्यानं त्यांचं दात वाचलं. कारण मास्तर कवळी वापरायचं आणि दुपारी झोपताना कवळी शर्टाच्या खिशात ठेवून झोपायचं.
मास्तर पडल्यावर पोरांनी चांगलाच कालवा केला; पण अण्णाच्या गड्यानं त्यातही चपळाई दाखवत मास्तरांना हात देऊन उभं केलं. त्यानंतर आपण कोण आहोत? कुठे आहोत? जग काय आहे?.. वगैरे अध्यात्मिक प्रश्‍न सोडविण्यात मास्तरची पाच मिनिटं गेली. थोडी हुशारी आल्यावर त्याला अण्णा पाटलांचा गडी समोर उभा राहिलेला दिसला. तेव्हा त्यानं कपाळावर आठ्या आणून काय आहे? या अर्थाने चेहरा केला. गड्यानेही वेळ न दवडता पाटलाचा निरोप सांगितला आणि जवळजवळ हाताला धरूनच मास्तरांना चलण्याचा आग्रह केला. हा येवढा आग्रह करतोय, तर मॅटर शिरियस असावं, असा तर्क मास्तरनी केला. त्यानं टेबलावरच ठेवलेल्या तांब्यातलं पाणी हातावर घेऊन दोन हबकारे तोंडावर मारले आणि गड्यांच्या मागोमाग चालता झाला.

कुलकर्णी मास्तर अण्णा पाटलांच्या वाड्यावर पोहोचलं तेव्हा अण्णा ओसरीवर भराभर येरझारा मारत होता. काही बिनसलेलं असलं की, तो असाच येरझारा मारायचा. मास्तरला पाहून त्यानं चालणं थांबवलं आणि आपल्या घोगर्‍या; पण दमदार आवाजात, ‘‘या मास्तऽर, बरं झालं तुम्ही आला. एक जरा गुंता झालाय, तो सोडवाया तुमची मदत पायजेलाय’ असं म्हणत थेट मुद्यालाच हात घातला. मग दोघंबी ओसरीवरच्या बैठकीवर बसले. दोन-तीन मिनिटं निवांत गेल्यावर अण्णानं गार्‍हाणं गायला सुरवात केली.
 ‘‘काय सांगू मास्तर, लई प्राब्लेम झालाय्. सकाळच्याला तालुक्याचा साहेब आला होता पशू विभागाचा. तालुक्यातील डेरींसाठी नवा नियम येणार म्हनला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोनच दिवसांपूर्वी डेरींमधून भेसळमुक्त दूध अभियान राबविण्याचा निर्णय झालाय. राजहंस अभियान असं त्याचं नाव आहे. राज्यातील प्रत्येक डेअरीतील दूध तपासायचं आणि त्यातील शुद्ध दूध तेवढंच घ्यायचं असा सरकारचा आदेश हाय...’
अण्णा पाटील तावातावानं आणि काळजीनं सांगत होता, तसं कुलकर्णी मास्तरचं डोळे चमकत होते.

कुठलंही सरकारी काम, जीआर वगैरे आला की, त्याचा अर्थ समजून घ्यायला अण्णा या मास्तरचीच मदत घ्यायचा. मास्तरचं इंग्रजीही तसं बरं होतं; पण या मास्तरला एक खोड होती, ती म्हणजे एखादी गोष्ट अर्धवट ऐकायची आणि कामाला लागायची. अण्णा पाटलानं ‘दूध शुद्धीसाठी राजहंस अभियान’ असं म्हटल्याबरोबर कुलकर्णी मास्तरला राजहंस पक्षी आठवला. कारण बर्‍याच दिवसांच्या आरामानंतर आज सकाळीच त्यांनं वर्गातल्या पोरांना ‘तो राजहंस एक...’ नावाची कविता शिकवली होती. दुपारच्या झोपेमुळं कवितेची चाल अजूनही मास्तरच्या डोक्यात घोळत होती. त्यात पाटलानं ‘राजहंस अभियान’ म्हटल्याबरोबरच त्यांला मास्तरनी हातानी खूण करून थांबवलं.
म्हणाला, ‘अण्णा अहो, उडत्या पाखराची पंख मोजायची सवय झाली आता आम्हाला, तेव्हा तुमची सगळी गोष्ट माझ्या ध्यानात आली. या अभियानासाठी लवकरच प्लान बनवू आणि आपल्या तालुक्यातील दूध डेअर्‍यांमध्ये ते यशस्वी करून दाखवू. सगळ्या जिल्ह्याला आपल्या कामातून तोंडात बोटं घालायला लावू. सरकारी आदेश येण्याआधीच त्यांना योजना सक्सेस करून दाखवू... तसं झालं तर तुमचं सगळीकडे नाव होतंय बघा. मग यंदाच्या निवडणुकीत तुमची आमदारकी पक्की...’’

मास्तर तावातावात बोलत होतं. आमदारकीचा विषय तसा अण्णाच्या जिव्हाळ्याचा होता. अनेक उपद्व्याप करणार्‍या अण्णाला आमदारकीचं तिकीट काही मिळालं नव्हतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा आमदारकी मिळण्याचा विषय यायचा तेव्हा येवढा डेंजर अण्णा; पण लोण्यागत एकदम मऊ व्हायचा. त्याला आतल्याआत गुदगुल्या व्हायच्या... ही गोष्ट इरसाल कुलकर्णी मास्तरला चांगलीच ठाऊक होती. त्यामुळे अधूनमधून आपलं म्हणनं रेटण्यासाठी मास्तर आमदारकीची गोष्ट काढायचं आणि अण्णा त्या स्वप्नात वाहून जायचा. मास्तरच्या हो मध्ये होकार मिसळायचा. आताही त्यानं मास्तरच्या सांगण्याला मान हलवत संमती दर्शवली आणि ‘वाऽऽ! मास्तर, भले शाब्बास, तुमच्यासारखी जंटलमन मंडळी आमच्या जोडीला आहे, म्हणून तर आमचं नाव वाढलंय.. सांगा कशी राबवायची योजना, तुम्ही म्हणाल तसंच होईल.’
अण्णानं असं अभय दिल्यावर मास्तरची गाडी एकदम जोरात सुटली. ‘अण्णा, अभियानाचं काम झालंच समजा. आजच संध्याकाळी ग्रामपंचायतीसमोर गावातल्या दूध उत्पादकांची बैठक बोलवा... आणि हां! रामा, दामू आणि भिवाला पन बोलवा. बैठकीत प्लान करून पुढच्याच आठवड्यात उडवून देऊ ‘अभियानाचा राजहंस!’

मास्तरच्या बोलण्यामुळं अण्णा पाटलाच्या मनाची घालमेल कमी झाली. त्यानं गड्याला संध्याकाळच्या बैठकीत गावातील जनावरांच्या मालकांना बोलवण्याचं काम सोपवलं आणि त्यानंतर तो निवांत मनानं माडीवर झोपण्यासाठी निघून गेला.

उन्हं उतरली तशी बेरडवाडीच्या ग्रामपंचायतीसमोर माणसांची वर्दळ वाढायला लागली. त्यात जनावरांच्या मालकांचा भरणा होताच; पण काहीजण उगाचंच करमणूक होईल म्हणून जमली होती. अण्णा पाटलानं बोलवलेली मिटिंग आणि त्यात मास्तर काहीतरी सांगणार म्हटल्यावर काहीजणांनी आपल्या गाई-म्हशीही सोबत आणल्या होत्या. हो! उगाचच बैठक लांबली, तर संध्याकाळची दूध काढणी खोळंबायला नको, हा त्यांचा उद्देश होता. अगदी काही वेळातच ग्रामपंचायतीसमोर जिकडंतिकडं माणसं आणि जनावरं दिसू लागल्याने त्या परिसराला जनावरांच्या बाजाराची शोभा आली.

ठिक साडेसहा वाजता अण्णा पाटील आणि मास्तर बैठकीच्या ठिकाणी उगवले. त्यांच्या पाठोपाठ मधल्या आळीतला रामा शिंपी, दामू सोनार आणि वरच्या आळीत राहणारा भिवा पांगरे हे त्रिकूटही गोळा झाले. पंचायतीसमोरच चार लाकडी खुर्च्या टाकून बैठकीला सुरवात झाली. समोर पन्नास-साठ डोकी जमली होती. नेहमीप्रमाणे अण्णा पाटलाचा हार-नारळ देऊन सत्कार; त्यात मास्तरचे लांबलचक भाषण होऊन तासभर वाया गेला. ते ऐकून माणसंच काय; पण त्यांच्याबरोबर आलेल्या गाई-म्हशीही कंटाळल्या आणि त्यांनी शिंगे हलवून आणि हंबरडा फोडून निषेध व्यक्त करायला सुरवात केली. त्यातील एका जर्सी गायीनं तर हंबाऽऽऽऽ ऐवजी अण्णाऽऽऽ, असा आवाज काढल्याचा भास खुद्द अण्णा पाटलालाच झाला; पण त्यानं तिकडं दुर्लक्ष केलं.

भाषणांचा कार्यक्रम संपून ‘राजहंस’ अभियानाबद्दल बैठक सुरू झाली, तेव्हा तिथे कुणीच पशुपालक उरले नाहीत. एक-एक करून मंडळी केव्हाच पसार झाली होती. शेवटी केवळ पाच टाळकी उरली. दस्तुरखुद्द अण्णा पाटील, मास्तर, भिवा, दामू आणि रामा बस्स! आलोच आहोत, तर आपल्यातच बैठक उरकून घेऊ असा प्रस्ताव अण्णानं मांडल्यानं नाईलाज झाल्यासारखा कुलकर्णी मास्तरनं बोलायला सुरवात केली. काय बोलायचं हे त्यानं दुपारीच ठरवलं होतं. त्यात ‘राजहंस’ शब्द त्याच्या डोक्यात गेल्यानं त्याचाच आधार घेऊन त्यानं एक ‘स्किम’ बनवली होती. तीच आता तो मांडत होता.
‘हे पाहा मंडळी, आपल्या डेरींमधल्या दुधात भेसळ होता कामा नये, असा सरकारचा आदेश येणार हाय. त्यासाठी ‘राजहंस अभियान’ सुरू होणार हे आपल्याला ठाऊकच आहे. आता आपल्या तालुका दूध संघाच्या ५० गावांमध्ये डेर्‍या आहेत. तेथे रोज दहा हजार लोक दूध घालतात. दररोज ५० हजार लिटर दूध आपण जिल्ह्याला पाठवतो. आपण शेतकर्‍यांना सरसकट गाईच्या दुधाला १५ रुपये आणि म्हशीच्या दुधाला २० रुपये भाव देतो; पण..’
मास्तरला मध्येच तोडत अण्णाने तोंड खुपसले, ‘...पन् मंडळी आपल्या काही विरोधकांना दूध संघाची ही परगती सहन होईना गेली. अण्णा पाटील चांगले फॅट असलेल्या दुधालाबी एकच भाव देतो, दूध तपासायला त्याच्याकडं काहीच यंत्रं नाहीत, त्यातून तो शेतकर्‍यांना लुटतो,... अशा वावड्या या लोकांनी उठवून आपल्यामागं या ‘राजहंस अभियाना’चा ससेमिरा लावलाय. पन् हा अण्णा बी कच्च्या गुरूचा चेला नाय...’
अण्णाचं भाषण आणखी लांबलं असतं; पण मास्तरनं पुन्हा पुढाकार घेतला आणि बोलायला सुरवात केली.
 ‘...तर मंडळी, या सगळ्यावर उपाय म्हणून ‘राजहंसा’ची कल्पना मी मांडणार आहे. राजहंस पक्ष्याला जर दूध आणि पाणी असं मिश्रण दिलं तर तो फक्त दूधच तेवढं पितो आणि पाणी तसंच शिल्लक राहतं, असं आमच्या दुसरीच्या मराठीच्या एका धड्यात लिहलंय. तेव्हा आपण जर प्रत्येक डेरीत एक राजहंस ठेवला, तर दुधातील भेसळ ओळखणं सोपं जाईल आणि भेसळमुक्त दुधाचे ‘राजहंस अभियान’ आपण खर्‍या अर्थानं यशस्वी करू...’
आपल्या बोलण्यावर मास्तरचं एवढा खूष झाला की, बोलणं संपल्यावर त्यानं स्वत:च टाळ्या वाजवायला सुरवात केली. खरं तर मास्तरच्या बोलण्यावर एरवी भिवा, रामा आणि दामू हे नेहमी ‘क्रॉस’ करायचे; पण आज त्यांनीही हा विषय शिरियसली घेतला आणि ‘आ वासून’ विचार करायला सुरवात केली. हे पाहिल्यावर मग अण्णा पाटलालाही मास्तरचा मुद्दा पटल्यासारखा वाटला आणि डेरीचा चेअरमन या नात्याने त्याने तिथल्या तिथे ५० राजहंस पक्ष्यांच्या खरेदीसाठी मान्यता दिली आणि बैठक निकालात काढली. खरेदीचं काम मास्तरनं रामा, भिवा आणि दामू या तिघांवर ढकललं.

दुसर्‍या दिवशी भल्या सकाळीच दामू, भिवा आणि रामा कुलकर्णी मास्तरकडे दाखल झाले. पन्नास राजहंस विकत आणायचं ते ठिक; पण कुठून आणि ते दिसतात कसे? हा त्यांचा मूलभूत प्रश्‍न होता. खरं तर या प्रश्‍नाचं उत्तर मास्तरकडं नव्हतंच; पण तेवढ्यात त्याला काहीतरी आठवलं आणि त्यानं आपल्या पिशवीतून दुसरीचं पुस्तकं काढलं. त्यातील ‘तो एक राजहंस’ या कवितेच्या पानावर राजहंसाचं चित्र होतं ते त्यांनी या तिघांना दाखवलं; पण ते चित्र अगदी बारिक होतं, ते बदकासारखंच दिसू लागलं तेव्हा भिवानं तोंड उघडलं आणि विचारलं, ‘मास्तर, म्हणजे ह्यो बदकंच म्हना की..’
पण त्यावर डोळे वटारीत मास्तरनी बदक आणि राजहंस यात कसा फरक असतोे वगैरे हे त्याला माहिती नसलेलं सगळं ज्ञान पाजळून भिवाला गप्प केलं.
‘पन मास्तर, आणायचा कुठून हा पक्षी? असा प्रश्‍न दामूनं केला,’
बेरडवाडीकरांना बहुतेक वस्तू या तालुक्याच्या गावात मिळायच्या; पण राजहंस ही तशी वेगळी वस्तू असल्यानं जिल्ह्याच्या ठिकाणी मिळेल असा तर्क मास्तरनी केला. ‘जिल्ह्याच्या गावी जा तिथे मिळेल राजहंस? एखाद्या पोल्ट्रीवाल्याला सांगितलं, तर तोही आणून देईल’, असं त्यानं दामूला ठासून सांगितलं.
मास्तरवर या तिघांनी विश्‍वास ठेवला असला, तरी यातून काहीतरी शक्कल लढवायची आणि चार पैसे कमवायचं तिघांच्या डोक्यात होतं. त्यांनी मग राजहंस मिळवणं कसं अवघड काम आहे, हे तिखटमीठ लावून अण्णा पाटलाला सांगितलं आणि त्याच्याकडून एका राजहंसासाठी एक हजार या प्रमाणे ५० हजार रुपये आणि प्रवासखर्चासाठी वेगळे तीन हजार उकळले. अर्थातच अण्णा हे पैसे डेरीच्याच खर्चात दाखवणार असल्यानं त्याला पैसे द्यायला काहीच कष्ट पडले नाही.

पैसे मिळाल्यावर तिघेही जिल्ह्याच्या गावी जाण्यासाठी एस. टी. नं निघाले. निम्म्या वाटेत एस. टी. चहापाण्यासाठी एका ढाब्यावर थांबली. हा ढाबा अलीकडेच झाल्यासारखा दिसत होता. अगदी चकाचक टेबल-खुर्च्या, हिरवळ असलेला छोटा बगीच्या, त्यात तलाव आणि त्या तलावात पांढर्‍या रंगाचे बदक, असं वातावरण पाहून तिघंही हरखून गेले. त्यातल्या त्यात मास्तरनं दाखवलेल्या पुस्तकातील राजहंसाचे चित्र या बदकांशी जुळत असल्याचा शोध रामाला लागला. आणि ‘राजहंस राजहंस, काम झालं’ असं तो मोठ्यानं ओरडला. त्यानं लगेच भिवा आणि दामूलापण तळ्यातले ‘राजहंस’ दाखवले. चहापाणी झाल्यावर मग तिघांनीही ढाब्याच्या मालकाला गाठून त्याच्या ढाब्याची स्तुती केली. त्या स्तुतीने मालक सुखावल्यावर रामाने नेहमीच्या चालूपनानं त्याच्याकडून तलावातल्या पांढर्‍या बदकांबद्दल माहिती घेतली आणि नंतर ते पुन्हा एस. टी. मध्ये येऊन बसले.

जिल्ह्याच्या अलीकडेच एका फार्मवर या पांढर्‍या बदकांची विक्री होते. एक बदक १०० रुपयांपर्यंत मिळतो, अशी माहिती ढाबामालकाकडून रामाला मिळाली होती. त्यामुळे ते वाटेतच त्या फार्मजवळ एस. टी. मधून उतरले. तिथल्या फार्मवर जाऊन मालकाशी घासाघिस करून त्यांनी ६० रुपयांप्रमाणे एक या हिशेबानं अवघ्या तीन हजारांत ५० बदकांची खरेदी केली. नंतर त्याच्याच गाडीतून मोठ्या ऐटीत बदकांना (चुकलं, आपलं हे राजहंसांना) घेऊन बेरडवाडीत आले. या व्यवहारात जवळपास प्रत्येकालाच १५ हजारांचा डल्ला मारता आला.

बेरडवाडीत गाडी आल्यावर अण्णा पाटलाला बोलावणं धाडण्यात आलं. तोपर्यंत पांढर्‍या रंगाचे हे ‘राजहंस’ पाहण्यासाठी गावकर्‍यांनी चांगलीच गर्दी केली होती. अण्णा पाटील, मास्तर आणि हे तिघे आल्यानंतर त्या गर्दीत पुन्हा ‘राजहंस अभियाना’बाबत एक छोटेखानी भाषणाचा कार्यक्रम झाला. भाषणामुळे अर्थातच गर्दी पाच मिनिटांत पसार झाली. त्यानंतर अण्णाच्या हाताने बेरडवाडीच्या दोन डेर्‍यांमध्ये प्रत्येकी एक बदक अर्थातच ‘राजहंस’ ठेवण्यात आले. उरलेले जवळच्या गावांतील डेर्‍यांना पाठविण्यात आले. अण्णाच्या उपस्थितीतच मग ‘राजहंस’ आता दूध आणि पाणी कसे वेगळे करतो, त्याचे प्रात्यक्षिक सुरू झाले.

प्रवासाने आलेला थकवा म्हणा किंवा नवीन जागा म्हणा, ते बिचारं बदक आधीच घाबरून गेलं होतं. त्यात त्याला गेले काही तास खायला-प्यायला न मिळाल्यानं ते मलूल झालं होतं. अशा अवस्थेत त्याच्यापुढे एका मोठ्या वाडग्यात दूध ठेवण्यात आले; पण ते काही पुढे येईना. तेव्हा प्रत्येकानेच आपल्या तोंडाने क्वॅक, क्वॅक, चॅक चॅक, असे जमेल ते आवाज काढून त्याला चुचकारलं. तेव्हा ते जरासं वाडग्याजवळ सरकलं. आता हा ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ करेल, या समजुतीने मंडळींनी श्‍वास रोखून धरला; पण त्यांची निराशा झाली. कारण तहानेने व्याकुळ झालेल्या बदकाने वाटीतले सगळेच दूध पाणी समजून झटक्यात रिकामे केले.
त्यावर ‘बघा बघा, आपल्या डेरीतले दूध कसे शुद्ध आहे ते, या राजहंस पक्षाने प्यायलेल्या दुधातून जराही पाणी उरले नाही. त्याअर्थी आपली डेरी भेसळीच्या बाबतीत पवित्र आहे. अण्णा पाटलाचा विजय असो...’ अशी बडबड एकदम वाताचा झटका आल्यागत कुलकर्णी मास्तरनी सुरू केली.

 बाकीच्या मंडळींनीही मास्तरच्या म्हणण्याची री ओढली. यावर खूष होऊन अण्णा पाटील, पुन्हा एकदा भाषण देणार होता; पण मंडळी पळून जाणार या भीतीने मास्तरनी त्याला दाबलं म्हणून तो गप्प बसला. आपण ‘राजहंस अभियाना’त नंबर पटकावणार या भ्रमात मंडळी जायला निघाली, तोच डेरीसमोर एक सरकारी जीप येऊन थांबली. आतून तालुक्याचे पशू अधिकारी उतरले आणि मोठ्या आनंदाने ओरडत अण्णा पाटलाकडे धावले. ‘अहो अण्णा, पेढे काढा पेढे, भेसळमुक्त दुधाचे ‘राजहंस अभियान’ रद्द झाल्याचं वरच्या पातळीवरून आजचं कळलं आणि लगोलग तुम्हाला सांगायला आलो.ऽऽऽ’ पण हे ऐकल्याबरोबर आनंद होण्याऐवजी पाटलाचा चेहरा पांढराफटक पडला. मास्तरची तर वाचाच गेली. दामू, भिवा आणि रामा गुपचुप मागच्या मागंच पळून गेले.

...आता गेल्या दोन दिवसांपासून ‘राजहंस अभियाना’चा पन्नास हजारांचा खर्च कसा वसूल करायचा, या विचारानं अण्णा पाटील वाड्यावरच्या ओसरीत सारखा येरझार्‍या घालतोय. तिकडे सगळ्या डेर्‍यांमधून राजहंसांच्या अर्थातच बदकांच्या करामतींच्या वेगवेगळ्या बातम्या त्याच्या कानावर येतायंत. सारखं दूध प्यावं लागल्यामुळं काही ठिकाणी राजहंसांनी डेरीच्या कर्मचार्‍यांवर हल्ले सुरू केले होते, तर काही ठिकाणी राजहंसांनी दूध पिण्याला साफ नकार देत दुधाची नासधूस केल्याच्याही बातम्या होत्या. तेव्हा या राजहंसांचं काय करायचं असाही प्रश्‍न अण्णासमोर आहे. त्यानं पुन्हा मास्तरला बोलावलंय आणि मास्तर हे पन्नास राजहंस शेजारच्या तालुक्यातील देशमुखाच्या दूध संघाला एक लाखात विकून टाकायची आयडिया अण्णाला सांगतोय.    बिचारा देशमुख आणि त्याचा दूधसंघ....!


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट