किस्से दैनिकांतले!

दैनिकांत काम करत असताना घाई गडबडीत कोणते गोंधळ होतात आणि त्यातून कोणच्या गंमती होतात त्याचाच हा एक नमूना.

मी प्रत्यक्ष अनुभवलेला.त्या शहरात आप्पा रणखांबे ( नांव बदलले) नावाचे एक वयोवृद्ध सर्पमित्र राहतात. त्यांचे वय 78 च्या आसपास असेल. अशाही परिस्थितीत शहराच्या कुठल्याही भागात, कुणाकडे सर्प, नाग वगैरे प्राण्यांनी हजेरी लावली की ते हक्काने अप्पांना फोन करतात आणि आप्पा स्व:खर्चाने तेथे जाऊन सर्पांना पकडतात. त्यामुळे तो सर्प व ज्याच्या घरात सर्प निघातो तो, असे दोघांनाही दिलासा मिळतो. अप्पांविषयी सर्व शहराबद्दल आदर आहे.

सुमारे दोन तीन वर्षांपूर्वी अप्पा असेच एका ठिकाणी साप पकडण्यासाठी गेले. भला विषारी नाग होता तो. चावला आप्पांना. त्यांना शहरातीलच मोठ्या रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्‍टरांनी 48 तासांची मुदत दिली. समाजसेवा अप्पांच्या जीवावर बेतली. त्या दिवशी शहरातील सर्व दैनिकांनी त्याची दखल घेतली आणि आप्पांच्या बातमीला पहिल्या पानावर स्थान मिळाले. बातमी अशी होती- विख्यात सर्पमित्र अप्पा रणखांबे सर्पदंशाने अत्यवस्थ.' मी ज्या दैनिकात काम करत होतो त्या दैनिकातही ही बातमी 1ल्या पानावर प्रसिद्‌ध झाली होती.बातमी छापून आली त्याच दिवशी सायंकाळची गोष्ट. तशी मजेशीरच. अप्पांच्या तब्येतीची हालहवाल विचारून त्यासंबंधीची आणखी बातमी आपल्या दैनिकात दयावी म्हणून आमच्या एका स्मार्ट वार्ताहराने सायंकाळी रुग्णालयात फोन केला. दैनिकांत वेळा फार पाळाव्या लागतात. ठराविक बातमी ठराविक वेळेला द्यावीच लागते. त्यामुळे सायंकाळी येथे फारच घाईगर्दी आणि धावपळ असे दृश्‍य असते. आमचा हा वार्ताहर थेट दुसऱ्या दिवशीचे पान तयार करण्यासाठीच बसला होता आणि त्या जागेवरूनच त्याने रुग्णालयात फोन केला. "हॅलो, मी अमूक वार्ताहर बोलतोय, मला जरा अप्पांच्या तब्येतीबद्दल बोलायचेय. जरा त्यांच्या जवळच्या कुणाला बोलवता का? तिकडून उत्तर आले " अहो, आप्पा आत्ताच गेलेत'. अप्पा गेलेत असे म्हटल्याबरोबर या वार्ताहराने तसाच फोन ठेवून दिला आणि मोठ्या घाईने ती बातमी ऑफीसमध्ये सर्वांना सांगितली. अरेरे ! वाईट झाले, आमच्या प्रतिक्रिया.

बरे तो तर पान तयार करण्यासाठीच बसला होता. घाईतच त्याने संबंधीत डी.टी. पी. ऑपरेटरला हूकूम सोडला. हे बघ कालची जी बातमी होती ना ती तशीच ठेव. त्यात फक्त हेडिंग बदलून घे- आप्पा रणखांबे यांचे निधन- अशा पद्धतीने. मथळ्यात आप्पा अत्यवस्थ ऐवजी आप्पा निवर्तले असा बदल कर आणि जशीच्या तशी बातमी सोड. झाले ऑपरेटरनेही तसेच केले. अर्थात तोपर्यंत रात्रीचे 8 वाजले होते आणि पानाची अंतिम वेळ 12 पर्यंतची होती. दरम्यानच्या काळात अधिक माहितीसाठी तो वार्ताहर कामाला लागला. आता या विषयी कोणत्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या याचाह? त्याने विचार करून तसे वृत्तसंपादकाला सांगितले. आम्ही सर्व मात्र हळहळत होतो की एक चांगला माणूस गेला म्हणून.दैनिकांत कोणतीही बातमी दोन्ही बाजूने आणि पूर्णपणे तपासून मगच प्रसिद्‌धीसाठी पानात सोडायची असते. त्या संकेताला अनुसरून वृत्तसंपादक महोदयांनी संबंधीत रुग्णालयात पुन्हा फोन केला, " काहो अप्पा गेले का?' हो इतक्‍यातच घरी गेले. तब्येत ठिक झाल्यामुळे त्यांना " डिस्चार्ज' दिला.' आणि खरी परिस्थिती वृत्तसंपादकाच्या ध्यानी आली. त्यांनी सर्वांना सांगितली. सर्वांसमोर मात्र एकच प्रश्‍न होता हसावे की रडावे. अप्पा रणखांबे त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा आपल्या समाजसेवेच्या कामाला लागले. इश्‍वर त्यांना उदंड आयुष्य देवो.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट