शाळेतल्या दिवसातली पाववड्याची पार्टी !

बेसनात पाव बुडवून तळतात तो पाववडा. पुण्यात याला पाव पॅटीस म्हणतात. आम्ही राहायचो त्या गावात एका माणसाने नुकतीच पाववड्याची गाडी टाकली. दिवसेंदिवस त्याला गावातून प्रचंड प्रतिसाद मिळायला लागला. कधी-मधी पैसे जमले तर आम्ही मुलेही त्या ठिकाणी जात असू. खाताखाता पाववडेवाला कसे वडे तयार करतो याचे बारकाईने निरीक्षण करत असू. परंतु असे प्रसंग फारच कमी यायचे. आमच्या बऱ्याच मित्रांची घरची परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती. माझ्यासह एक दोन जणांशी स्थिती त्यातलेत्यात बरी असली तरी घरून खाऊसाठी वगैरे पैसे मिळण्याची सुतराम शक्‍यता नव्हती. पाववड्यांचा विषय मात्र आमच्या मनात बऱ्यापैकी घर करून राहिला होता. अखेर सर्वजण एकत्र आलो. बालमित्रमंडळाची बसस्टॅंडवर असलेल्या शनीच्या पारावर एक इमर्जन्सी मिटींग बोलावली. अर्थातच विषय होता पाववड्याची पार्टी !

बैठकीला नाना, पुंज्या( पुंजाराम), भीवशा (भीवसन), बाळ्या ( बाळू), चंद्या ( चंदू) म्हशा ( म्हसू), गौत्या (गौतम), गंग्या ( गंगाधर), सुन्या ( सुनिल) आणि मी अशी सर्व मित्रमंडळी हजर होतो. शेवटी बऱ्याच दीर्घ चर्चेनंतर असे ठरले की पाववड्याची पार्टी करायची आणि त्यासाठी प्रत्येकाने वर्गणी म्हणून पाच रुपये जमवायचे. अर्थात पाच रुपये म्हणजे खूपच होते. मलाही घरून मिळाले नसते. पण प्रयत्न तर करायला हवा होता. उरलेली सर्व मुले सुटीत आईवडीलांबरोबर मजुरीची कामे करून पैसे जमविणार होती. त्यावेळी आम्ही सर्वजण 12 ते 13 या वयोगटात होतो. अखेर एकदाचे पैसे जमा झाले. आणि दिवसही ठरला, रविवार. रविवारी सर्वांनी पार्टीसाठी एकत्र जमायचे असे ठरले. जमलेल्या पैशातून काही वस्तू विकत आणाव्या लागणार होत्या. त्या विकत आणल्या. गोडेतेल, बेसन, अशा गोष्टी आणल्या. मीठ, मिरच्या, कांदे, बटाटे वगैरे वस्तू घरुनच आणायच्या ठरल्या. जवळ असलेल्या तालुक्‍याच्या गावाहून बाळ्याने दोन तीन पावाच्या लादी आणल्या. माझ्याकडे वडे तळण्यासाठी लागणाऱ्या कढई आणण्याची जबाबदारी होती.पाव वड्याची पार्टी म्हणजे पाव हा महत्त्वाचा घटक. बाळ्याने पाव आणले की नाही हे बघण्यासाठी शनिवारी सायंकाळी मी आणि चंद्या बाळ्याच्या घरी जाऊन प्रत्यक्ष खात्री करून आलो. अर्थात परत येताना त्याने आणलेल्या पावांपैकी एकेक पाव खाऊनच परत आलो.

ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळी सर्व साहित्य घेऊन एस.टी. स्टॅडवर असलेल्या शनिमंदिरासमोर आम्ही सर्व एकत्र जमलो. दोघा-तीघांनी सायकलीही आणलेल्या होत्या. सर्व एकत्र आल्यानंतर अचानकपणे एक वेगळाच प्रश्‍न निर्माण झाला. तो म्हणजे जागेचा. दोन आठवड्यापासून आम्ही जी काही बारकाईने तयारी करत होतो, त्यात पार्टी कोठे करायची हा विचारच केलेला नव्हता. आणि म्हणूनच ऐनवेळेस हा प्र?न्‌ निर्माण झाला. वेळेवर एक दोन जणांच्या घरी (जिथे त्या वेळेस कुणीही असणार नव्हते) पार्टी करायची असे ठरले परंतु नंतर हे पर्याय सार्वमताने बाद करण्यात आले. शेवटी नदीच्या दिशेला चार पाच किलोमिटर अंतरावर एक गाव आहे. त्या दिशेने चालत रहायचे आणि जागा मिळेल त्या ठिकाणी तीन दगडांची चूल मांडायची असा निर्णय ठरला. त्यानुसार आम्ही कूच केले. एखाद्या मोहिमेवर चाललो आहोत असा आविर्भाव प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर होता.

पुढे काही सांगण्याआधी या गावाची भौगोलिक स्थिती सांगणे उचित ठरेल. बारामहिने दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या तीरावर हे छोटेसे गाव वसलेले होते. संथ वाहणाऱ्या गोदावरीला या भागात प्रचंड पाणी असे आणि यापूर्वी या पाण्यात अनेकजणांना प्राण गमवावे लागले होते. नदीच्या परिसरातील शेतीला गाळपेऱ्याची शेती संबोधले जाते. ही जमीन सुपिक असते आणि कमी पाण्यावर याठिकाणी पिके घेतली जातात. अशा या गाळपेऱ्याच्या शेतातूनच आम्ही चालत असलेली गाडीवाट जात होती. ज्या गावाकडे ही वाट जाई तिथे गेल्यावर होडीन नदी ओलांडून जावे लागत असे. ( आता त्या ठिकाणी पूल झाला आहे.)

तर आम्ही चालत राहिलो. साधारण दीड किलोमीटर अंतरावर आम्हाला हवी असलेली जागा सापडली. नदीच्या मुख्य प्रवाहाला जोडून एक लांबलचक घळी तयार झालेली होती आणि ती थेट रस्त्यापर्यंत येऊन मिळालेली होती. तिच्यात पाणीही होते. त्याच घळईच्या बाजूला असलेल्या खोलगट भागात हिरवळीवर आम्ही आमचा डेरा टाकला. मंडळी कामाला लागली. कोणी चूलीसाठी दगड शोधून आणले. कुणी जळणासाठी वाळलेले गवत, कागद, काड्या वगैरे जमा केल्या. आता बऱ्यापैकी तयारी झाली होती. मुख्य काम सुरू करायला काही अडचण नव्हती. आम्ही आमच्या जवळचे साहित्य बाहेर काढले. गोडेतेलाची किटली, एक कढई, एक पातेले, पावाच्या लाद्या, बेसनपीठ, मीठ,मिरच्या, बटाटे अशा सर्व गोष्टी त्यात होत्या. पण पीठ भिजविण्यासाठी पाणी, तळण करण्यासाठीचा झाऱ्या आणि मुख्य म्हणजे चूल पेटविण्यासाठी काडेपटी या गोष्टीच नव्हत्या. काय करावे ? हा प्रश्‍न पुन्हा आ वासून उभा राहीला. सुदैवाने भीवसन आणि बाळू यांनी सायकली आणलेल्या होत्या. त्यांनी गावात जाऊन आपापल्या घरून (अर्थात घरच्यांच्या नकळत) पाणी भरण्यासाठी बादली, काडेपेटी, तळणाचा झाऱ्या घेऊन यावे असे ठरले. त्याप्रमाणे त्यांना सर्वांनी गावात पिटाळले. ते येईपर्यंत वाट बघणे आवश्‍यक होते.

इकडे उन वाढायला लागलेले होते. मग उरलेल्यानी तेथील जागा साफ करणे वगैरे कामाला सुरवात केली. परिसराची पाहणी करणे अणि फेरफटका मारणे या गोष्टीही काहींनी केल्या. नानाने मात्र चुलीचा ताबा घेऊन, जो सापडेल त्याच्याकडून पुढील व्यवस्था करण्यास सुरुवात केली. आहे ते सामान सोडून घेण्याचे काम मी केले तर कुणीतरी बटाटे चिरून ठेवले. साधारणत: अर्धा पाऊण तासाने गावाकडे पीटाळलेले दोघे धापा टाकत परत आले. त्यांना पाण्यासाठी बादली काही मिळालेली नव्हती पण एक मोठे पातेले त्यांनी बरोबर आणलेले होते. झाऱ्या ही मिळाला नाही एक चमचा होता. आता त्यावरच काम भागवावे लागणार होते. मग सर्व मुले कामाला लागली. नानाने चुलीचा ताबा घट्ट ठेवला होता, त्यामुळे पाववडे बहुदा तोच तळणार हे स्पष्ट होते. मग दोघे -तीघे जवळच्या नदीवर गेलो आणि त्या मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन आलो. तोपर्यंत नानाने एक दोन जणांच्या मदतीने चुल पेटवून सज्ज ठेवली होती पाणी आल्याबरोबर त्याने पीठ भिजवले आणि कढईवर तेल तापत ठेवले.

ज्या प्रसंगाची गेल्या काही दिवसांपासून आम्ही वाट पहात होतो. तो प्रसंग साक्षात आता घडणार होता. भरपेट पाववड्याचा आस्वाद घेण्याचा. पाव बेसनात बुडवून नाना, पुंज्या आणि सुन्या यांनी पाववडे तयार केले. सर्वांना पुरून उरतील एवढे झाले होते. पाववडा तयार होत असताना प्रत्येकाला तो कधी खातो अन्‌ कधी नाही असे वाटत होते. परंतु सर्व पाववडे तयार झाल्यानंतरच खायचे ठरलेले असल्याने तोपर्यंत लाळ गिळत शांत रहाणे भाग होते. पाववडे तयार केल्यानंतर बटाट्याची भजीही तळण्यात आली. तोंडी लावण्यासाठी मिरच्या तळून त्यांना मीठ लावले. तरीही पातेल्यात पीठ उरलेच. कढईतही भरपूर तेल होते. त्यातील काही पुन्हा किटलीत काढून ठेवले. उरलेल्या पीठाबद्दल नानाला पुन्हा झकास कल्पना सुचली त्याने उरलेले पीठ, बटाटे वगैरे पदार्थ कढईतल्या तेलात टाकले. वरून बऱ्यापैकी मिरची पावडर, मीठ वगैरे गोष्टी टाकल्या. त्यातून एक नवाच पदार्थ तयार झाला. मिरच्यांबरोबर तोंडी लावण्यासाठी त्याचा उपयोग केला. अर्थात तयार पाववडे एकत्र करण्यासाठी ताट वगैरे गोष्टी नव्हत्याच मुळी. मग मी आणलेल्या नायलॉनच्या पिशवीवरच ते पाववडे ठेवण्यात आले होते. ( त्यामुळे त्या पिशवीला छिद्र पडले. ते बघून जिची ती पिशवी होती त्या माझ्या लहान बहिणीने प्रचंड भोकाड पसरले आणि मग आईच बोलणे मला खावे लागले ही गोष्ट अलहिदा!) अशा या तयार पाववड्यांचा आम्ही रसभरीत आस्वाद घेतला. त्यातील काही उरले ते दोन तीन जणांनी त्यांच्या लहान भावंडांसाठी घरी नेण्याचे ठरले. दुपारपर्यंत आमची ही पार्टी चालली. त्यानंतर भांडी वगैरे घासून, सर्व आवरासावर करून दुपार कलत असताना आम्ही सर्वजण तृप्त मनाने आणि भरल्या पोटाने गावाकडे परतलो. अनेक अडचणींना तोंड देऊन आमची पाववड्याची पार्टी सफल झाली होती. आणि एक रविवार कारणी लागला होता. पुढे शाळेतील मित्रांसाठी अनेकदिवस तो चर्चेचा विषय होता. वर्गातील आमच्या विरोधी गटातील मुलांचा मात्र या गोष्टीमुळे चांगलाच जळफळाट झाल्याचे आमचे सर्वांचे मत होते.
*******************************

या घटनेला साधारणपणे सहा-सात महिने उलटून गेले होते. आम्ही ते गाव सोडून नव्या गावात दाखल झालो होतो. या नव्या गावातील एक शिक्षक यापूर्वीच्या गावात काही दिवस माझ्या वडीलांच्या जागी बदलीवर होते. त्या वेळेस त्यांनाही आमच्या पाववडा पार्टीची बातमी समजली होती आणि पार्टी करणाऱ्या छोट्या टोळीचा मुख्य हस्तक मी होतो हे ही समजले होते. आम्ही ज्या गावात होतो तेथील शाळेत हे शिक्षक महोदय पुन्हा मूळ जागेवर बदलून आले. एके दिवशी आमच्या वर्गावर असताना त्यांनी नाव घेऊन मला बोलावून घेतले आणि विचारले, " काय रे (अमूक गावी ) तुम्ही सर्वांनी स्मशानाच्या जागेवरच पाववड्याची पार्टी केली होती म्हणे ' माझ्या दृष्टीने तो एक धक्काच होता. आपण असं काही केलेलं नाही या बद्दल आणि आमच्या सतत विरोधी असलेल्या गटातील पोरांचे हे कारस्थान असल्याबद्दल मी ठाम होतो. तरीसुद्धा आजही त्या जागेबद्दल मला थोडीशी का होईना शंका आहेच. पण त्यापेक्षाही पाववड्याच्या पार्टीची आठवण आजही मनात चांगल्या अर्थाने घर करून आहे.

टिप्पण्या

Yogesh म्हणाले…
फारच छान लिहिलंय...

माझ्या लहानपणी दोन मित्रांमध्ये एक पैज लागली होती. स्मशानात अमावस्येच्या रात्री जळत असलेल्या प्रेताजवळचे भाताचे उंडे खाऊन दाखवण्याची!

एका बहाद्दराने ते काम फत्ते केलं खरं पण त्याला खाल्लेलं परत "दाखवता" आलं नाही. त्यामुळं तांत्रिकदृष्ट्या तो पैज हरला.

तुमचा लेख वाचून ही आठवण आली...
Abhijit Bathe म्हणाले…
cool dude.
he post pan chhaan lihilays.
अनामित म्हणाले…
zakkas!
jagya zalya punha athavani.
Durga Moghe म्हणाले…
मुलांना अशा गोष्टीचं कौतुक, आम्हा मुलींना हे घरीच करावं लागतं. त्यामुळे कालांतराने त्यातील मजा कमी होते, विसरायला होते.

अर्थात पहिल्या पदार्थाची गोष्टच और असते. ती तुझ्या लेखाच्या निमित्ताने आठवली.

मी लहानपणी भातुकली कधीच खेळले नाही. स्वयंपाकाचीही विशेष आवड नव्हती. त्यामुळे काही करून पहावं असं मला कधी वाटलं नव्हतं. त्यावेळी शिक्षणासाठी मी काका- काकूंकडे रहात होते. मला काहीच येत नाही हे माहिती असूनही एका पाहुण्यांसमोर माझ्या काकांनी माझी स्तुती केली, ""आमची दुर्गा चहा आणि पोहे छान बनवते बरं का!'' हे ऐकून तर पाहुणाही हटून बसला, "मी खाईन तर दुर्गानेच केलेले!'' बहुतेक दोघांमध्ये जणू मॅच फिक्‍सिंग झालेले! नाइलाजाने उठले, स्वयंपाकघरात जाऊन काय कसे करायचे त्याचा विचार करू लागले. काहीच सुचेना. काकू बाहेर पाहुण्यांबरोबर बोलत होती. मी मध्येच यूेन काकूच्या कानात ""याचा डबा कुठेय, त्याचा कुठेय?' असे प्रश्‍न विचारत होते. मग सगळी रेसिपी सांगण्यात दहा खेपा झाल्या. पाहुण्याला जणू काहीच माहिती नव्हते. त्याने आपल्याला काही कळलेच नाही असे दाखवले. पोहे धुताना स्वच्छ धुण्यासाठी असे काही चोळले की नंतर कांदा पोह्यातले पोहे शोधूनही सापडत नव्हते. सगल्याचं पीठ झालं होतं. सगळ्याचं प्रमाण काकूने सांगितल्याने चव मात्र चांगली होती. पाहुण्याने अगदी तोंडभरून कौतुक केलं, आणि मग स्वयंपाकघरात विविध प्रयोगांना माझी सुरवात झाली.
नंतर मी बरेच पदार्थ करून पाहिले. जवळजवळ सगळे उत्तम झाले. नवा पदार्थ घाबरत करत असल्याने थोडाच केला जायचा आणि अनेकदा तर पुन्हा पुन्हा चव घेण्यातच संपून जायचा! पण यातून स्वयंपाकामागचे शास्त्र आणि कला माझ्या लक्षात आली. आणि आई व आईंपेक्षा उत्तम पदार्थ करते अशी दादही मिळू लागली.

स्वयंपाक किंवा एखादा पदार्थ मन लावून केला, दुसऱ्याला खाऊ घातला, त्याला आवडला तर त्यातले समाधानही मोठे आहे. समाजाने स्वयंपाकाशास्त्रातला स्त्री-पुरुष भेदभाव बाजूला ठेवला तर पुरुषांनाही मन प्रसन्न ठेवणारी ऍकिटीव्हटी मिळेल, असे माझे प्रांजळ मत आहे!

लोकप्रिय पोस्ट