जिंका जिंका परिस्थिती ( विन-विन सिच्युएशन)

मोठमोठ्या कॉर्पोरेटस्‌ मधून "जिंका जिंका परिस्थिती( विन-विन सिच्युएशन) हा शब्दप्रयोग मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. शहरातून थेट खेड्यापर्यंत हा शब्दप्रयोग पोहोचला आहे. मनुष्यांच्या सान्निध्यात राहून गाई-म्हशीही आता या शब्दप्रयोगाचा वापर करून बऱ्यापैकी फायदा पदरात पाडून घेऊ लागल्या आहेत. तो कसा? ते पाहू.

एका खेडेगावात एक प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकरी राहत होता. शेतीपासून, जनावरांपर्यंत विविध गोष्टीत चांगले प्रयोग राबवून त्याने बरीच प्रगती साधली होती. अशा या शेतकऱ्याची बऱ्यापैकी शेती होती. शेतात छानशी आमराई होती. राहत्या घराजवळच गुरांचा गोठा होता. या गोठ्यात हौसा नावाची म्हैस, गौरा नावाची गाय आणि करडा नावाची शेळी आपापाल्या परिवारासह सुखेनैव नांदत असत. कुठेही चरायला, फिरायला जायचे झाले की हे सर्व सोबतच जात असत. मग त्यांच्या मैत्रीत गाय, म्हैस, शेळी असा जातीभेद नसे.

पण अलीकडे मात्र या तिघींच्याही परिवारात एक प्रकारची तेढ निर्माण झाली होती. एकमेकांना मिळणारा हिरवा चारा, चंदी यांच्या वाटपातून त्यांच्यात मतभेद उदभवले होते. त्यातूनच हवेदावेही केले जात. गौरा गाईचे म्हणणे असे होते की, हौसा म्हशीला डुंबण्यासाठी अतिरिक्त पाण्याची सोय करून देऊन आपला मालक "स्पेशल ट्रिटमेंट देतो'. याऊलट हौसा म्हशीला असे वाटायचे की गाईंना पूज्य मानण्याच्या हिंदू धर्मातील पद्धतीमुळे मनुष्यप्राणी या गौरापुढे नाक घासतो, तिला खास दिवशी पुरणपोळी वगैरे दिली जाते. याशिवाय तिला मारहाण करणे वगैरे पाप समजतात आणि असे जर कोणी केले तर त्याविरुदध वेगवेगळ्या मानवी संघटना आवाज उठवतात. शासनानेही गाईच्या जातीला विशेष सवलती दिल्या आहेत. काही राज्यात तर गोवंश हत्याबंदी सारखे कायदेही करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही गाय जास्तच भाव मारते.

या दोघींप्रमाणेच शेळीचेही काही मुद्दे होते. तिच्या आकारामुळे तिला हीन लेखले जाते अशी तिची तक्रार होती. शिवाय गाई, म्हशीच्या दूधाचे सध्या बऱ्यापैकी "ब्रॅंडीग' होते त्यामुळे शेळीच्या दूधाला कुणी विचारत नाही. मग आपला मालकही आपल्याला गौरा-हौसा प्रमाणे खायला घालत नाही. त्यासाठी आपल्याला गावाजवळच्या टेकड्यांवर, माळरानावर भटकावे लागते. करडा शेळीचे गौरा आणि हौसा बद्दल जसे संयुक्त मत होते, तसेच त्या दोघींचेही करडा बद्दल तसेच विरोधी मत होते. त्यांच्या मते करडा शेळी आकाराने लहान असल्याने तिच्यावर शेतीकामाची काहीच जबाबदारी नसते. त्यामुळे तिला वेगवेगळ्या ठिकाणी मस्त दौरे वगैरे करायला मिळतात. आपल्याला मात्र गोठ्यात किंवा शेतातच रहावे लागते. आपण जेव्हा दावणीला बांधलेले असतो तेव्हा ही करडा छानपैकी वेगवेगळ्‌या दौऱ्यांना जाते. मालकही तिला फिरण्यासाठी प्रोत्साहन देतो.

तर असे हे मतभेद वाढत जाऊन विकोपाला पोचले होते. त्यामुळे तिघींचाही स्वभाव आकडू बनला होता. तसेच "इगो प्रॉब्लेम' का काय म्हणतात, त्याचीही लागण त्यांना व्हायला लागली होती. त्यांच्यातला संवादच हरवला होता. शेवटी या सर्वांचा परिणाम व्हायचा तोच झाला. तिघींचीही कार्यक्षमता कमी झाली. गौरा-हौसा पूर्वीसारख्या दूध देईनाशा झाल्या तर दूरवर खाणे शोधायचा कंटाळा केल्याने करडाच्या तब्येतीवर परिणाम होऊन ती बारीक दिसायला लागली. ही सर्व गोष्ट चाणाक्ष शेतकऱ्याच्या ध्यानात यायला वेळ लागला नाही. त्याने आपल्या गोठ्यामधली परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी आपल्या अमित नावाच्या मुलावर सोपवली. अमित हा पदवीधर आणि हुशार मुलगा होता. शेतीची त्याला आवड होती. शहरात राहून त्याने "कार्पोरेट शेती' सारख्या विषयांचा अभ्यास केला होता, त्याच्या जोडीला मनुष्यबळ विकास ( एच. आर.) विषयातील प्रशिक्षणही त्याने घेतले होते. मनुष्यांप्रमाणेच प्राण्यांचेही एक मानसशास्त्र असते हे त्याला एका शेतीच्या दैनिकातील लेखमालेवरून माहिती झाले होते. गोठ्यातील प्राण्यांच्या मानसशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करून त्याठिकाणी "एच. आर. (मनुष्यबळ विकास)' च्या काही कल्पना राबविल्या तर त्यांच्या उत्पादन क्षमतेवर निश्‍चित चांगला परिणाम होईल असा त्याने निष्कर्ष काढला. मनुष्यबळासाठी जसा "एच. आर.'सारखा प्रकार असतो तसाच प्राण्यांसाठी एखादी "ऍनीमल रिसोर्स' सारखी गोष्ट असते का? यासाठी त्याने शोध सुरु केला. कोणत्याही नवीन गोष्टी केवळ पुण्यातच केल्या जातात असे तो ऐकून होता. त्यादृष्टीने त्याने पुण्यातील मित्रांकडे संपर्क साधून चौकशी केली, तर त्याला चक्क अशी संस्था कार्यरत असल्याचे समजले. इतकेच नाही तर प्राण्यांचा विकास करण्यासाठी ही संस्था सर्वेक्षण वगैरे करून देते आणि आवश्‍यकता असल्यास आपल्याकडील क
ाही प्रशिक्षित प्राणी संबंधीत गोठ्यात " ए. आर.' म्हणूनही पाठवते. अमितला यामुळे फारच आनंद झाला. त्यासंस्थेशी संपर्क साधून आपल्या गोठ्यातील जनावरांची परिस्थिती सांगितली. संस्थेने त्याला सर्वेक्षण करावे लागेल असे सांगितले. अमित त्यासाठी तयार झाला.

लवकरच पुण्याहून गावाकडे असलेल्या हौसा-गौरा-करडा यांच्या सर्वेक्षणासाठी "ए. आर( अर्थातच ऍनीमल रिर्सार्स) चे पथक दाखल झाले. सर्वेक्षणाअंती त्यांनी असा निष्कर्ष काढला की, " या सर्व जनावरांमध्ये "कम्युनिकेशन प्रॉब्लेम' आहे, तो घालविण्यासाठी आमच्या संस्थेतून नुकतेच "ए.आर.' चे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या एका अरबी घोड्याला तुम्हाला प्रशिक्षक म्हणून नेमावे लागेल. हा घोडा पूर्णपणे प्रशिक्षित आहे. त्याला प्राण्यांमधील संवादशास्त्राची चांगली जाण आहे. त्यामुळे तो तुमच्याकडील जनावरांची मानसिकता समजावून घेऊन त्यांची उत्पादनक्षमता निश्‍चितच वाढवू शकेल.' मग त्या "ए.आर.' झालेल्या घोड्याला शेतकऱ्याच्या गोठ्‌यातील प्राण्यांबरोबर काही दिवस ठेवण्यात आले. काही दिवसातच चांगले परिणाम दिसून आले. गोठ्यातील जनावरे काही प्रश्‍न, मतभेद असतील तर त्या घोड्याला सांगायच्या आणि तोही आपले ज्ञान वापरून त्या समस्या सोडवायचा. लवकरच गौरा, करडा आणि हौसा यांच्यात "कम्युनिकेशन' निर्माण झाले. त्याचा परिणाम त्यांच्यातील मतभेद कमी होण्याला झालाच शिवाय त्यांची "प्रॉडक्‍टीव्हिटी' सुधारण्यासाठीही मदत झाली. हौसा-गौराला तर सर्वाधिक दुग्धोत्पादनाचे पुरस्कारही मिळाले. शेतकरीही खूष झाला. सर्व काही सुरळीत झाले असल्याने "ए.आर.'वाल्या घोड्याला आता परतावे लागणार होते. तो परतत असताना गोठ्यातील सर्व प्राणी त्याच्याभोवती जमा झाले आणि "आम्हाला काहीतरी दोन चांगले युक्तीचे शब्द सांग' असा त्यांनी आग्रह धरला. मग त्याने या सर्वांना "विन-विन सिच्युएशन' ( अर्थातच जिंका जिंका परिस्थिती) बद्दल सांगून एकत्र काम केले तर कसा फायदा होतो तेही सांगितले. सर्वांना ते पटले. मग त्यांनीही यापुढे गुण्या गोविंदाने नांदायचे ठरवले. विन-विन सिच्युएशनमध्ये जगायचे ठरवले. त्यांचे जीवन पुन्हा पहिल्यासारखे झाले
.
**********************

ते असेच आनंदाने जगत असताना मे महिना उजाडला. दिवस आंब्याचे होते. गोठ्याशेजारच्या आंब्याच्या आढीतून आंब्यांचा मस्तपैकी घमघमाट सुटला होता. या सर्वांनाच आंबे खावे असे वाटत होते. पण हे शेतकऱ्याला सांगायचे कसे? मग त्यांना युक्ती सुचली. गौरा- हौसा- करडा यांनी एक दिवस "विन विन सिच्युएशनचा' प्रयोग करण्याचे ठरवले. हौसा म्हैशीने मोठ्याने " आम्म्या? आम्म्म्याऽऽऽ? असा आवाज काढून शेतकऱ्याच्या अमित नावाच्या मुलाला बोलावले. आणि चक्क तो आलाही. तो आल्यावर करडा शेळी मोठ्याने " मे, मेऽऽऽ मेऽऽऽ( अर्थात मे महिना या अर्थाने) ओरडली. करडा अशी म्हणाल्याबरोबर गौराने ठेवणीला "हंबाऽऽऽ, हंबाऽऽऽ, ...बाऽऽऽआंबाऽऽऽऽ (म्हणजे आंबे हवेत)' असे ओरडायला सुरवात केली. शेतकऱ्याच्या चाणाक्ष मुलाला ते लगेच समजले आणि त्याने खूश होऊ तिघांना आणि त्यांच्या परिवाराला आंबे आणून दिले. मनसोक्त आंबे खाल्यावर "विन विन ?च्यिुएशन' चे असेही परिणाम होतात या विषयावर मग तिघींनीही छानपैकी गप्पा मारल्या.

************************

या अनोख्या प्रयोगाची माहिती मीडियापर्यंत पोहोचलीच. त्यांनी चक्क त्यावर ब्लॉग, वेबसाईटमधून लेख लिहीले.

टिप्पण्या

Vidya Bhutkar म्हणाले…
Mastach ekdam. :-) छानच लिहीले आहेस आणि कल्पनशक्तीला तर तोडच नाही.

लोकप्रिय पोस्ट