मातीचा गणपती !

खेडेगांवातील मुलांची कुतुहलाची आणि आकर्षणाची जी काही ठिकाणे असतात, त्यापैकी एक म्हणजे गावातल्या कुंभाराचा वाडा. त्याची कलाकुसर तासोनतास पहात राहवी अशी. मग ते दिवाळीच्या निमित्ताने फिरत्या चाकावर पणत्या तयार करणे असो किंवा उन्हाळ्याची चाहूल लागल्यावर गाडगे, मडके तयार करणे असो. त्याच्या या कामाकडे कितीही पाहिले तरी कंटाळा येत नाही. परंतु गावातल्या आम्हा मुलांना मात्र यासर्वांबरोबरच एक विशेष आकर्षण असायचे ते म्हणजे बैल पोळा आणि गणेशोत्सव या काळातील कुंभाराचे सुबक काम.

अर्थातच त्याच्यासारखेच आपणही मातीचे बैल किंवा गणपतीची मूर्ति तयार करावी असे फार वाटे. मग सुटीच्या दिवशी आम्ही मुले गावाजवळील शेतातली माती आणून त्याचा गोळा तयार करुन वेगवेगळे आकार तयार करण्याचा प्रयत्न करत असू! कुणाला ते जमायचेही. मला मात्र तुळशीवृंदावनापलीकडे फार काही जमत नसे. पण तरीही मातीशी खेळायची हाव काही कमी होत नसे. गणपती हा तर आमचा आवडता देव ! लहानग्यांना आपल्यातलाच वाटावा इतका तो जवळचा ! मला तर खूपच आवडायचा. अशा या लाडक्‍या देवाची मूर्ति तयार करता आली तर !

प्रयत्न केला. नाही असे नाही मात्र फार काही सुबकता त्या मुर्तित नसे. शिवाय कुंभाराकडील माती "स्पेशल' फॉर्मुला वापरुन बनवलेली असे. आम्ही मात्र शेतातली काळी मातीच वापरत असू. तरीही मी आपल्या लाडक्‍या गणपतीची मुर्ति तयार करावी हे ठरवलेच.

त्यानंतर कुंभाराच्या वाड्यात जमेल तेव्हा वारंवार जाऊन त्याचे मातीकाम बघणे हा माझा छंद नेहेमीच्या उद्योगात परिवर्तीत झाला. त्यावेळेस चौथीत असेल. शाळा सुटली की बाजूलाच असलेल्या गल्लीत जायचे आणि मातीकाम बघत बसायचे. आणि चौकशाही करायच्या. अर्थात तोही काही विशेष बोलत नसे. एक दिवस मात्र गणपती कसा तयार करतात, त्याची जादूची कांडी मिळाली. ही प्रक्रिया आपण विचार करतो त्यापेक्षा फारच सोपी आहे असे त्यावेळेस वाटले. त्याचं असं झालं की त्या दिवशी सहजच म्हणून मी कुंभारबुवांच्या घरी चक्कर मारली.

साधारण 14 ते 15 वर्षे वयाचा त्याचा मुलगा घरी होता. त्याने मला गणपती कसे तयार करतात? याचे रहस्य सांगितले. आणि ते रहस्य म्हणजे- मातीचा साचा. मातीचा साचा वापरून गणपती आणि वेगवेगळी मातीची चित्रे तयार करता येतात याचे ब्रम्हज्ञान मला झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीच्या मी शोधात होतो तो दिवस एकदाचा आला म्हणजे. तसा मी खूप नसलो तरी बऱ्यापैकी हुशार होतो. म्हणजे साचा मिळविण्यासाठी त्या अडाणी मुलाला गुंडाळण्याइतका तरी. शेवटी काही झाले तरी चौथीतले मुलं तशी सुशिक्षितच असतात.

असो. तो बाजाराचा दिवस होता. माझे आईवडील जवळच्याच गावाला बाजारसाठी गेले होतो. संध्याकाळी पाचपर्यंत तरी ते परतण्याची शक्‍यता नव्हती. घरी मी आणि माझी धाकटी बहीण दोघेच. म्हणजे जर या मुलाकडून साचा घेतला, चटकन जवळच्याच शेतातून माती आणून तिचा गोळा केला तर साच्यातून भराभर 25 ते 30 मुर्ति तयार होतील असा मी विचार केला.( आणीबाणीच्या काळात माझं डोकं तसं फार वेगाने धावतं. लहानपणची सवय!) कुंभाराच्या घरी तो मुलगा एकटाच होता. त्यावेळेस साडेअकरा-बारा वाजले असतील. मी त्याला काही काळापुरता तो साचा देण्याविषयी गळ घातली. तो काही तयार होईना. कारण सरळ होतं. तो साचा मातीचा होता आणि त्याचे आई-वडीलही घरी नव्हते. मी जर फोडला तर? . परंतु कांही केल्या हा साचा घरी न्यायचाच या इरेला मी पेटलो होतो. माझ्या डोळ्यांसमोर मी स्वत: तयार केलेल्या गणेशाच्या मुर्तिंचे निर्माणकार्य दिसत होते.

त्यावेळेस मला चटकन एक कल्पना सुचली. मला खाऊला म्हणून माझ्या वडीलांनी एक रुपया दिला होता. तो मी काही खर्च केला नव्हता. मग हाच रुपया या मुलाला साच्याचे भाडे म्हणून दिला तर? वस्तू भाड्याने देता- घेता येतात या गोष्टी मला मोठ्यांकडून माहिती झालेल्या होत्या. पण माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या त्या साध्याभोळ्या मुलाला कुठलं माहित असणार? तरीही मी प्रयत्न करायचा ठरवला. एक रुपयात दुपारी चार पर्यंत तुझा साचा देशील का? मी फोडणार नाही आणि परत आणून देईन असे त्याला सांगितले. मी एक प्रामाणिक आणि सज्जन छोटा मुलगा असल्याचेही त्याला पटवून दिले. बऱ्याच वेळाने आढेवेढे घेत का होईना तो तयार झाला. झालं मला आकाश ठेंगणं झालं. माझ्याकडे असलेला एकुलता एक रुपया देऊन त्याच्याकडून तो साचा ताब्यात घेतला. आणि उड्या मारतच घरी आलो.

आता लवकरच पावले उचलायला हवी होती कारण वेळ फार कमी होता. बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या. सर्वप्रथम गल्लीत असलेल्या सर्व मुलांना तुम्हाला लवकरच एक-एक मुर्ति देतो असे आश्‍वासन देऊन टाकले. घरी लहान्या बहीणीने कुतुहलाने तो साचा बघीतला. परंतु मी पुढे घराच्या ओट्यावर खूप सारा चिखल ( तब्बल पोतंभर) आणि घरभर मूर्ति तयार करणार असे तिला सांगितल्यावर मग मुळच्या स्वभावाने तिने आई-दादांना येऊ देत? अशी धमकी दिली. शेवटी सर्व पसारा मी आवरुन व नंतर तिला चक्क एक रंगवलेली ( माझ्या शाळेसाठी असलेल्या रंगपेटीचा वापर करुन) गणेशमुर्ति आणि वरती एक तुळशी वृंदावन देण्याचे ठरले. एवढे सर्व मिळणार म्हणून मग तीही गप्प राहिली. चला एक मोठा प्रश्‍न मिटला होता.

मग थोडी घाई करुन दुसऱ्या एका गल्लीत राहणाऱ्या नानाला मी बोलावून घेतले. तो आणि मी जवळच एका शेतात जाऊन भल्या चांगली पिशवीभर काळी माती आणली. शाळेच्या दप्तराचीच होती ती पिशवी. आई ओरडू नये म्हणून मी ती नंतर गुपचूप धूणार होतोच. झाले माती आली. तोपर्यंत दीड वाजला होता. मग भराभर सर्व माती ओतून आम्ही चिखल तयार करण्याच्या कामाला लागलो.

आम्ही म्हणजे मी एकटा हात भरवत होतो आणि बाकीचे गंमत बघत होते. पण मध्येच नाना की कोणीतरी शंका काढली की कुंभार जी माती वापरतो त्यात घोड्याची लीद वगैरे वापरतात. तरच ती चांगली होते. आता ऐनवेळी घोडा कुठून आणायचा हा प्रश्‍न निर्माण झाला. तेव्हा समोरच गोठ्यात बांधलेल्या गाईचे शेण वापरून बघू असा एक पर्यायी विचार माझ्या मनात आला. मी तो लगेच अमलात आणला. थोड्याच वेळात गोळा तयार होता. मला मूर्ति तयार करायची खूपच घाई झालेली होती. दरम्यान आमच्या घरासमोरील ओट्यावर एका बाजूला शेण, एका बाजूला माती, एका बाजूला सर्वच चिखल असे दृश्‍य तयार झाले होते. मी घाईने त्या साच्यात मातीचा गोळा भरला आता लगेच मुर्ति तयार होणार होती. मग मी साचा जमिनीवर पालथा केला व मूर्ति बाहेर येण्यासाठी प्रयत्न केला.

पण काही केल्या तो मुर्ति बाहेर येईना. काय करावे. काही कळेना खूप प्रयत्न केला पण मूर्ति काही बाहेर पडत नव्हती. मातीचा गोळा त्या साच्याला घट्ट चिकटून बसला होता. त्यामुळे क्षणातच पुढचे भविष्य माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेले आणि माझ्या पोटात भीतीने गोळा आला. त्या कालावधीत पुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना येऊन तेथे जमलेले बालमित्रमंडळ हळूच गायब झाले. आई येऊ दे मग सांगतेच ! अशी धमकी देऊन बहिणही घरात गेली आणि अभ्यासाचे पुस्तक घेऊन बसली. शेवटी उरलो आम्ही दोघेच मी आणि माझा तयार न झालेला साच्यातला गणपती.

शेवटी फार जड मनाने मी तो साचा त्यातील मातीसह त्या मुलाकडे घेऊन गेला. त्याचा साचा सुस्थितीत असला तरी त्याने तो खराब झाला असे सांगितले व ठेवून घेतला. त्या साच्यात घालण्यासाठी फक्त कुंभाराकडचीच माती चालते असेही सांगितले. मी मात्र फारच हिरमुसलो. घरी येऊन पटापट सर्व माती, चिखल वगैरे आवरुन पुन्हा सर्व काही चकाचक करुन ठेवले. दिवसभर यातायात करुन गणपती मिळाला नाहीच पण बऱ्याच दिवसांनी मिळालेला रुपयाही गमवावा लागल्याचे दुहेरी दु:ख मला झाले होते. अर्थात मुर्ति तयार न होण्याचे रहस्य असे होते की, त्या साच्यात मी खूप घटट मातीचा गोळा अतिशय दाबून घातला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साच्यात माती घालण्याआधी साच्याला आतून पाणी लावायला पाहिजे होते म्हणजे मुर्ति न चिकटता चटकन बाहेर पडली असती.

हे मला मागावून कळाले. त्यावयात इतके व्यवहारज्ञान मात्र माझ्याकडे नव्हते. पण आजही त्या घटनेचा विचार करताना मला फार वाईट वाटते. वाटते आज नाशिक-पुण्यासारख्या शहरांमध्ये लहान मुलांसाठी गणपतीच्या मुर्ति तयार करण्याची खास शिबिरे होतात. आपल्या वेळी तशी असती तर...

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
mast anubhavkathan! punha kadhi ganapati banavun pahilat ki nahi? ashi shibire hotat he mala mahit navhate. ata mihi ashi ekhadi ganeshamurti banavanyacha prayatn karen.
Abhijit Bathe म्हणाले…
Good one. This was a very unique experience and very well expressed!
Keep it up.
अनामित म्हणाले…
आम्ही बैलपोळ्याला बैल वगैरे बनवण्याचा (मातीचे!) प्रयत्न केला होत... पण गणपती बनवायची डेअरिंग कधी झाली नाही.

अर्थात आम्ही बनवलेले बैल हे मोहेंजोदडो-हडप्पा संस्कृतीतील बैलांच्या मूर्ती म्हणूनही खपल्या असत्या. ;)


माझ्या घरापासून कुंभारवाडा जवळच असल्यामुळे तुम्हाला माझ्याकडे गाढवाची लीद मिळाली असती आणि साच्याला आधी पाणी लावावे लागते ही बहुमूल्य माहिती (काहीही भाडे न देता) मिळाली असती ;)


बाकी छान लिहिलंय तुम्ही. असेच गावाकडचे अनुभव कळवत राहा.
Durga Moghe म्हणाले…
मातीचा गणपती बनवण्याचे उद्योग आम्हीही केले. पण आमच्या कोकणातल्या मातीला चिकटपणाच नसतो. त्यामुळे सगळे फुकट जायचे. आमच्या शेजारच्या घरातच शाडूचे गणपती बनवण्याचा कारखाना होता व आजही आहे. त्यात साच्यातले गणपती रंगवताना पाहण्यात मोठी मजा असायची. गणपती करायचे सोडून मी टीव्हीवर पाहून सिरॅमिकच्या भांड्यांसाठी करतात तशी फुलं केली होती. आणि मजा म्हणजे ती चांगल्या तयार झालेल्या गणपतीच्या पायावर ठेवली गेली होती. व अनेक दिवस कौतुकाचा विषयही ठरली....

माझ्या मते गणपती रंगवणे ही साच्यातला गणपती बनवण्यापेक्षा अधिक किचकटीची कला आहे. त्यात बरेच बारकावेही आहेत, त्याचे वेगळे टेक्‍निक आहे. ते जमले तर त्यातला आनंद वेगळाच!

लोकप्रिय पोस्ट