ऑपरेशन कलंक' : स्टींग की ऍक्‍टींग?...

पाच वर्षांपूर्वी घडलेल्या गुजरात दंगलींमधील "सत्य' ऐन निवडणूकांच्या तोंडावरच एखादे तहलकासारखे एखादे माध्यम जेव्हा उघडकीस आणते. त्यात मागील स्टींग ऑपरेशनमध्ये केलेल्याच पक्षाला लक्ष्य केले जाते. तेव्हा सर्वसामान्य माणसाच्या मनात संबंधित माध्यम आणि संबंधित पक्ष दोघांविषयीच्या शंकेला वाव निर्माण होतो. याशिवाय संबधित "स्टींग' मुळे सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन आयुष्यातील शांतता व स्थैर्यालाही हानी पोहोचू शकते.

घटना तशी पूर्वी घडलेली, पण अलीकडचीच वाटावी इतकी ती आजही लक्षात राहते. ती घटना म्हणजे "तहलका' च्या वेबसाईटवर प्रसारित केलेले "स्टींग ऑपरेशन'. शोध पत्रकारितेचा दृश्‍य नमूना असणाऱ्या या ऑपरेशनमुळे तत्कालीन भाजप सरकारमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला होता. इतकेच नाही तर त्यावेळच्या भाजपचे अध्यक्ष बंगारु लक्ष्मण यांनाही स्टींग ऑपरेशनमध्ये रंगेहाथ पकडले होते. देशात आणि परदेशातही या ऑपरेशनमुळे एकच खळबळ उडवून दिली होती. त्याचा परिणाम म्हणून भाजपचे तत्कालिन अध्यक्ष बंगारु लक्ष्मण यांना पदच्यूत करण्यात आले. नंतर या ऑपरेशनचे प्रसारण वेबसाईट व्यतिरिक्त एका खाजगी दूरचित्रवाणीवरुनही नंतर दाखविण्यात आले. या सर्वांचा एकत्रित परिणाम असा झाला की तहलका नावाची माध्यमसंस्था आणि तिचे प्रवर्तक तरुण तेजपाल यांचे नाव एका रात्रीत प्रसिद्‌धीझोतात आले. त्यानंतर तहलका चे नाव कमी-अधिक प्रमाणावर अधून मधून लोकांच्या समोर येतच राहिले. त्यांनी मध्यंतरी स्वत:चे साप्ताहिक सुरु केले, तेव्हा त्यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले.

आता पुन्हा एका "स्टींग ऑपरेशनमुळे' तहलकाचे नाव गाजत आहे. यावेळीही त्यांनी पुन्हा भाजपलाच आपले लक्ष्य बनवले असल्याचे या ऑपरेशनमधून दिसून येते. या स्टींग ऑपरेशनला त्यांनी "ऑपरेशन कलंक' असे नाव दिले आहे. विशेष म्हणजे गुजरातमध्ये होऊ घातलेल्या निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर तहलकाची ही शोध पत्रकारिता जास्त "लक्ष्यवेधी' ठरते. विशेष म्हणजे यावेळेसही तहलकाचे "स्टीग ऑपरेशन' एका खाजगी वाहिनीवर दाखविण्यात येत आहे. पाच वर्षांपूर्वी गुजरातमध्ये ज्या काही धार्मिक दंगली उसळल्या त्या पूर्वनियोजित होत्या, इतकेच नव्हे तर त्यामागे तत्कालिन (आणि आताचेही) मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा छुपा पाठिंबा होता, पोलीसही त्यात सक्रीय होते, शिवाय काही हिंदूत्ववादी संघटना सामिल झाल्या होत्या; अशा प्रकारचे तथ्य तहलकाला आपल्या नव्या ऑपरेशनमधून उघड करायचे आहे. खरे तर गुजरात दंगलींविषयी तथ्य, सत्य वगैरे सांगणारे शेकडो अहवाल अनेक संस्थांनी त्याचवेळेस तयार केले होते. आपलाच अहवाल कसा सत्य सांगतो याचे दावे-प्रतिदावेही केले होते.त्यात काही माध्यमेही आघाडीवर होती. या अहवालांमधूनही तत्कालीन मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले होते. अर्थात त्यातून काहीच हशील झाले नाही. दंगलीमध्ये बळी पडलेले परत आले नाहीत की त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जे काही नुकसान झाले ते भरुन निघाले नाही. माध्यमांनी आणि अहवालांनी नरेंद्र मोदींविषयी एवढा ओरडा करुनही, दंगलींनंतर थोड्याच काळात झालेल्या विधानसभा निवडणूकांतमध्ये भाजपला सत्ता मिळाली आणि नरेंद्र मोदी पुन्हा मुख्यमंत्री बनले.

आता पुन्हा गुजरातमधील विधानसभा निवडणूका तोंडावर आहेत आणि त्याचवेळेस तहलकाने आपले स्टींग ऑपरेशन केले आहे. खरे तर गुजरात दंगलीनंतर लगेचच त्यांना हे "स्टींग ऑपरेशन' करुन नरेंद्र मोदी हे भारतीय लोकशाहीला आणि घटनेला अपेक्षित असे धर्मनिरपेक्ष मुख्यमंत्री नाहीत असे दाखविता आले असते. शिवाय त्यावेळी निवडणूकांची पार्श्‍वभूमीही त्यांना उपलब्ध होती. म्हणजेच त्यांच्या या "सत्यशोधन'(?) अहवालाला सामान्य जनतेसमोर मोठ्या प्रमाणात जाण्यासाठी त्यावेळी योग्य परिस्थिती उपलब्ध होती. परंतु त्यावेळी त्यांना असे ऑपरेशन करायचे सुचले नसले पाहिजे किंवा त्यात हवे तसे "पोटेंशियल' मिळाले नसले पाहिजे, की जे आता मिळाले असावे कदाचित! किंवा एखाद्या विशिष्ट पक्षाला सत्तेवर येण्यासाठी तेव्हा इतर माध्यमांनी योग्य ती "परिस्थिीती' तयार केली आहेच, त्यात आपले आणखी काय प्रयोजन? असाही सूज्ञ विचार "तहलका' वाल्यांनी केला असला पाहिजे. आणि म्हणूनच आपल्या "स्टींग ऑपरेशन'साठी गुजरात विधानसभा निवडणूकांची सध्याची वेळ त्यांनी निवडली असली पाहिजे.

काही माध्यमांनी अशा तऱ्हेने केलेल्या "सत्य(?) शोधनातून' गुजरातमध्ये कोण निवडून येणार? कोण जाणार? हे याठिकाणी महत्त्वाचे नाही. तर त्याचा सर्वसामान्य लोकांच्या रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होणार? काय परिणाम होऊ शकतील? कोणती राजकीय गणिते मांडली जातील आणि त्यातून कोण फायदा-गैरफायदा उपटेल? हे इथे महत्त्वाचे वाटते. त्यातील एक मुद्दा म्हणजे सर्वसामान्य जनतेवर होणारे परिणाम. या "स्टींग ऑपरेशनमध्ये' जी काही सत्ये उघडकीस आणली आहेत, त्यातून एका बहुसंख्य धर्माच्या लोकांनी अल्पसंख्याक धर्माच्या लोकांवर ठरवून अत्याचार केले असे सूचित होते. याचा परिणाम म्हणून संबंधित अल्पसंख्याक समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. एक सुप्त असंतोष त्यांच्या मनात निर्माण होऊ शकतो. त्याला हवा देण्याचे काम काही कट्टरपंथी नेते आणि धूर्त राजकारणी करु शकतील. त्याचा परिपाक म्हणून देशात पुन्हा सामाजिक अस्थैर्य माजविण्यात हे लोक यशस्वी होतील. तसे झाले तर दोन धर्मांच्यामधील तयार झालेल्या दुफळीरुपी तव्यावर हे राजकारणी आपली सत्तेची पोळी भाजून घेतील आणि हपापल्यासारखे पुन्हा सत्तेवर येतील. आपल्या भारतीय समाजाचे आतापर्यंतचे दूर्दैव असे की आपण विनाकारणच जात-पात-धर्म वगैरेमध्ये गुंतून पडतो. प्रसंगी भावूकही होतो. त्यातूनच मग जातिय-धार्मिक दंगली उसळतात आणि त्याचा थेट फायदा समाजकंटक आणि संधीसाधू राजकारण्यांना होतो. धार्मिक दूफळी हा राजकारण्यांना मतांसाठी मिळालेला एक हूकूमी एक्का आहे. संधी सापडताच त्याचा वापर ते करुन घेतात. तहलकाच्या "स्टींग' मुळे तशी परिस्थिती केवळ गुजरातमध्येच नाही तर देशामध्येही उदभवू शकते. अर्थात त्यात संधीसाधू राजकारणी आपली पोळी भाजतीलच परंतु सामान्य जनतेचा त्यात नाहक बळी जाईल. हा झाला सर्वसामान्यांच्या काळजीचा मुद्दा. राजकीय घडामोडीचा विचार करायचा झाला तर सत्तेचा पिपासू असणारा कोणताही पक्ष देशभर या घटनेचे भांडवल करु शकतो. गुजरातमध्ये त्याचा उपयोग करता येईलच येईल शिवाय देशातही त्याचा वापर करता येईल. कारण बऱ्याच राजकारण्यांना याघडीला मध्यावधी निवडूकांचे वेध लागले आहेत. जनतेच्या प्रश्‍नापेक्षा केंद्रातील सत्तेचा प्रश्‍न त्यांना जिव्हाळ्याचा वाटू लागला आहे. अशा लोकांसाठी असे "स्टींग ऑपरेशन' म्हणजे आयताच कळीचा मुद्दा होईल. विशेष म्हणजे या "स्टींग ऑपरेशनचा दोन्ही बाजूने वापर करता येऊ शकतो.

याठिकाणी मग पुन्हा मुद्दा उपस्थित होतो की माध्यमांनी तर आपले जागृतीचे काम करायचे नाही का? तसे तर करायलाच हवे परंतु त्यासाठी वेळेकाळेचे योग्य ते भान ठेवायला हवे. निवडणूकांत कोण योग्य? कोण वाईट या गोष्टी मतदारांवर सोपवायला हव्यात वाटल्यास काही मार्गदर्शन जरूर करावे परंतु सामाजिक शांततेवर आणि एकीवर गदा येऊ शकेल अशा गोष्टी मात्र करु नये असे कोणालाही कळकळीने वाटेल.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट