विचार "पांढरपेशी'...

सकाळची गडबड सुरु. रोजचीच आवरसावर. दुसऱ्या मजल्यावरच्या मला अचानक एक आवाज येतो. मी कान टवकारतो...
आता स्पष्ट आवाज, "" भंग्याऽऽरवालेऽऽय्य,...रद्दी पेपऽर.... भऽऽयंग्यारवालेऽऽय्य''..
"रद्दी देवू या का बऱ्याच महिन्यांची?', माझा विचार. मी बायकोला विचारतो.
सकाळच्या गडबडीत कश्‍श्‍याला उगाच, या अर्थानं तिचा त्रासिक चेहरा. मी दुर्लक्ष करतो.
"रद्दीचे ओझे तर जाईल' या विचाराने मी खिडकीत जातो.
दरम्यान पुन्हा तो आवाज... जोडीला चेहराही... विटलेला लाल शर्ट आणि मळकट चेहरा; खिडकीखाली उभा असलेला...!
"शुक... शुऽक', वरच्या खिडकीतून मी.
खालून त्याची नजर माझ्याकडे...
"काय द्यायचंय?' त्याचा प्रश्‍न.
"रद्दी आहे, दुसऱ्या मजल्यावर ये', दोन बोटं दाखवून मी खूणावतो.
तो यायला तयार. अन्‌ मी रददी शोधण्याच्या कामाला..

दारावर टक टक.
मी सावध.माझ्या डोक्‍यात विचारचक्र, जोडीला संशयही..
माझा डोळा "सेफ्टी होल'वर. बाहेर तो.
मी पुन्हा सावध..
"आत जा तू' बायकोला माझे फर्मान. वैतागून ती आतल्या खोलीत.
मी दार उघडतो. समोर तो. पंचविशीचा; दाढी वाढलेला; काळ्या-मळकट चेहऱ्याचा; अंगावर लाल शर्ट- काळी विजार; हातात तराजू...
माझ्या नकळत डोक्‍याची शीर तडकलेली...
"याला घ्यायचा का आत?, चांगली नसतात अशी माणसं; चोऱ्याही करतात; घरात बायको आहे आपल्या...' , एका क्षणात असंख्य विचार.
मी दार उघडतो. तो रेटून आत. माझा पारा चढलेला. शांत राहण्याचा माझा प्रयत्न..
मी विचारतो," काय भाव देणार?'
"किलोला पाच रुपये', त्याचे "प्रोफेशनल' उत्तर.
"... रद्दी न देता हाकलून द्यावा का याला, असाच?...' माझ्या मनात पुन्हा विचार.
पण मी तसं करत नाही....


मग मी त्याच्याशी "उच्च लेव्हलचं' बोलतो..."खरं तर, तुझ्या सारख्याला मी रद्दी देतच नसतो; दुकानात देतो... पण ओझं वाहायचा कंटाळा आला म्हणून तुला बोलावलं..'
त्याची शून्य प्रतिक्रिया, पण नजर भिरभिरती.
मी त्याला "ऑब्जर्व्ह करतो.
"झोपडपट्टीछाप..; .... साले, चोर असतात हे...' माझं विचारचक्र सुरु तरीही त्याच्या पुढ्यात रद्दी टाकतो.
"आणखी काही आहे? भंगार सामान... जुनी भांडी...?' त्याचा धंदेवाईक प्रश्‍न.
त्याचा प्रश्‍न मला आवडत नाही. मी अस्वस्थ.
"नाही... एवढंच आहे,' माझं तुटक उत्तर.
तो पेपर मोजायला वळतो.
" आता हा वजनात मारणार.. हे.... लोक असेच फसवतात.. इथं दहा किलोचे पाच किलो वजन भरवतील अन्‌ बाहेर पंधरा किलो करुन विकतील.. शेवटी चोराचीच वृत्ती,' माझे सावध विचार....


"जुने कुकर घेता का तुम्ही?' आतून बायकोचा आवाज. मग तिचं बाहेर येणं
तो रद्दी मोजायचा थांबतो.
"वस्तू बघून सांगतो,' त्याचे आगाऊ उत्तर.
आता मात्र माझ्या डोक्‍याची शीर तडकलेली.
"" या "थर्डक्‍लास' माणसासमोर बाहेर येण्याची हिला गरज काय?.. स्साली, ही माणसं चांगली नसतात,' मी मनातून भडकलेला. तरीही मी संयम बाळगतो.
" किती रुपये देणार, मोडीचे?' माझा त्रासिक प्रश्‍न.
" वीस रुपये किलोप्रमाणे...' त्याचं अनपेक्षित उत्तर.
... आता मात्र मला राहवत नाही. "काहीतरी सांगू नको; राहू दे ती मोड; द्यायची नाही मला', मी डाफरतो.
तो अस्वस्थ होतो, चुळबुळतो...
"तेवढी रद्दी घे अन्‌ जा.. बाकी, पुन्हा कधीतरी..' माझा आवाज थोडा चढलेला..
".. आणखी आहे का काही?' त्याचा चिवटपणा.
" न्नाही रे बाऽबा ! कश्‍श्‍याला माझा वेळ घेतोस..? माझे चिडके उत्तर.
तो मुकाट रद्दी मोजतो.
माझ्या डोक्‍यात राग गेलेला... "झक मारली अन्‌ हया टीनपॉट माणसाला बोलावलं,' मी स्वत:लाच शिव्या देतो.


"रद्दी नीट बघ, काही वस्तू - फाईल वगैरे असतील तर, त्या बाजूला काढ' माझी दरडावून सूचना.
दरम्यान त्याचं काम संपतं.
"चाळीस रुपये होतात रद्दीचे' माझ्या चेहऱ्याचा वेध घेऊन तो बोलतो.
"काऽऽय? फक्त चाळीऽस? शंभर व्हायला पाहिजे एवढी रद्दी आहे ती.. लुटतोय स्साला..' माझ्या डोक्‍यात विचार सुरु.
"जाऊ देत... देवून टाकू तेवढ्याला रद्दी.. ही ब्याद तर जाईल इथून..' माझा सुजाण विचार.
"ठिकाय ! दे चाळीस, अन्‌ लवकर आवर ते' माझं निर्वाणीचं बोलणं
"धा रुपये सुट्टे आहेत?' त्याचा प्रतिप्रश्‍न.
"आहे', त्रासिक मी.
माझी लगबग. त्याच्याकडून पन्नासची नोट घेऊन व त्याला दहा रुपयाची नोट देवून, मी त्याला कटवतो.
मी दार आदळून बंद करतो. माझा सुटकेचा निश्‍वास...
"त्याला बोलवायलाच नको होता...; हे लोक चोऱ्याही करतात..; इथून पुढे सावध राहिले पाहिजे..: दरवाजे वगैरे व्यवस्थित बंद केले पाहिजे...' माझ्या डोक्‍यात विचारांचे थैमान.
पंधरा मिनिटे मी विचारात..


दारावर पुन्हा टक टक. मी सावध. डोळा "सेफ्टीहोल'वर.
दारात पुन्हा तोच,.. कळकट...थर्डक्‍लास..!
मी धडधडत दार उघडतो...
"काय आहेऽऽ?', सेफ्टीडोअरच्या आडून मी सुरक्षितपणे डाफरतो.
तो विचकट हासतो. खिशात हात घालून दहाची नोट काढतो... माझ्या पुढे सरकावतो.
माझा हात नकळत पुढे...
"मघाशी तुम्ही धा रुपायची नोट दिली नाऽऽ, तिला चिकटून एक नोट जास्त आली', त्याचे चाचरत उत्तर.
माझा शून्य प्रतिसाद...
माझ्या हातात नोट कोंबून तो सर्रकन जीना उतरलेला...सेफ्टी डोअरला लागून मी तसाच उभा. सून्न...


आता मला विचार करायलाही सूचत नाही...!

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट