महाराष्ट्रातील गणेशस्थाने

महाराष्ट्रात अष्टविनायकांबरोबरच प्रत्येक गावाची आणि शहराची खास अशी गणेश श्रद्धास्थाने आहेत। प्रत्येक ठिकाणी त्यांची वैशिष्ट्ये निरनिराळी आहेत. अशा गणेश स्थानांविषयीची माहिती आपण या लेखाद्वारे करून घेणार आहोत.

पुणे परिसरातील गणपती
कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत। इ.स. १६३६ साली शहाजी राजांनी पुण्याला राजवाडा बांधला तेव्हा जिजाबाईंनी समारंभपूर्वक कसबा गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली व दगडी गाभारा बांधून दिला. श्री शिवाजी महाराजांच्या वाड्याला लागूनच हे स्थान असल्याने शिवाजी महाराज व त्यांच्या घराण्यातील मंडळी वारंवार या गणपतीच्या दर्शनास जात असत. प्रथम ही मूर्ती तांब्याच्या आकाराची होती परंतु वारंवार शेंदूर लावीत असल्यामुळे तिची उंची आता सुमारे तीन फूट आणि रुंदी पाच फूट झाली आहे. पुण्यात शनिवारवाड्याच्या बाजूलाच कसबा गणपतीचे स्थान आहे.
सारसबाग - श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांना थेऊरच्या गणेशाद्वारे झालेल्या दृष्टांतानुसार त्यांनी उजव्या सोंडेच्या मूर्ती थेऊरची प्रतिकृती म्हणून इ।स। १७७४ मध्ये सारसबागेच्या तळ्यात स्थापन केली. त्यामुळे हा गणपती पुढे कितीतरी दिवस तळ्यातील गणपती म्हणून ओळखला जात असे. आता सारसबाग तळ्यातील सिद्धिविनायक म्हणून तो ओळखला जातो. पेशवेकालीन मूर्ती खराब झाल्यामुळे एकदा १८८२ आणि एकदा १९९० अशी दोनदा बदलण्यात आली. पर्वतीच्या पायथ्याशी, स्वारगेट जवळ हे स्थान आहे.दशभुज चिंतामणी - पुण्याला पर्वतीच्या पायथ्याजवळ लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये श्रीगणेशाचे हे स्थान आहे. दशभुजा असलेली ही मूर्ती अति प्राचीन आहे. श्री दामोदर खळदकर यांना झालेल्या दृष्टांतानुसार खोदाईकाम करताना ९ ऑक्‍टोबर १९६४ रोजी ही मूर्ती आढळली. हे अत्यंत जागृत ठिकाण असून अनेक श्रीभक्तांना तसे अनुभव आले आहेत.
याशिवाय पुणे शहरात श्रीगणेशाची अनेक स्थाने आहेत। त्यांची माहिती पुढीलप्रमाणे -शनिवार पेठेतील वरद-गुपचूप गणपती, सहकारनगर, पर्वती जवळील दशभुज चिंतामणी, सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती, गणेशखिंडीतील श्री पार्वतीनंदन, कर्वे रोडवरील दशभुज चिंतामणी, पर्वतीजवळ थोरले नानासाहेब पेशवे यांनी स्थापन केलेला सदरेतला गणपती, नारायण पेठेतील मोदी सिद्धिविनायक गणपती।
चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरचिंचवड स्टेशनपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर मोरया गोसावी मंगलमूर्तीचे मंदिर आहे। ही उजव्या सोंडेची गणेशमूर्ती आहे. महाराष्ट्रातील थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी या गणेशाची स्थापना केली. हे एक जागृत गणेशस्थान आहे. इ.स. १६५५ मध्ये मोरया गोसावी यांनी येथे जिवंत समाधी घेतली. त्यानंतर १६५९ मध्ये त्यांच्या चिरंजीवांनी येथे मंदिर उभारले. या क्षेत्राचे वैशिष्ट्य म्हणजे श्री समर्थ रामदास, श्री संत तुकाराम महाराज हेही या स्थानाचे भक्त होते.
मुंबई व ठाणे परिसरातील गणपती
मुंबईमधील अनेक गणपतींपैकी एक म्हणजे सध्या प्रख्यात असलेला प्रभादेवीजवळचा सिद्धिविनायक. लक्ष्मण विठू पटेल यांनी हे मंदिर १८०१ मध्ये बांधल्याचा कागदोपत्री पुरावा सापडतो. मूळचे मंदिर तसे लहान आहे. अक्कलकोटच्या महाराजांचे शिष्य रामकृष्ण जांभेकर यांनी गोविंदराव फाटक यांना मंदिराच्या देखभालीकरीता पाठविले. त्याप्रमाणे श्री फाटक यांनी बरेच कष्ट घेऊन येथील परिसराची सुधारणा केली. एकदा त्यांच्या मनात मूळची काळ्या पाषाणाची असलेली मूर्ती रंगविण्याचे आले. त्यानुसार त्यांनी आकर्षक स्वरूपात ही मूर्ती रंगविली. तेव्हापासून या मंदिरात बदल घडून आला. मंदिराची सध्याची वास्तू नव्याने बांधण्यात आली आहे. १९९४ साली श्रृंगेरी पीठाच्या जगद्‌गुरू शंकराचार्य यांच्या हस्ते या नव्या वास्तूवर विधिवत कलश बसविण्यात आला.
टिटवाळ्याचा महागणपती ठाणे जिल्ह्यात कल्याण तालुक्‍यात मध्य रेल्वेच्या मार्गावर टिटवाळा स्टेशन आहे। स्टेशनपासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर टिटवाळ्याच्या महागणपतीचे मंदिर आहे. येथे महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतभरातून भाविक दर्शनासाठी येतात. असे म्हणतात की महाभारतात वर्णन केलेल्या प्रसिद्ध कण्वमुनींचा आश्रम आजच्या टिटवाळा गावच्या परिसरात होता. दुष्यंत राजाने आपली पत्नी शकुंतला हिला ओळखले नाही तेव्हा कण्वमुनींनी शकुंतलेला गणेशव्रत करण्यास सांगितले. त्यानुसार तिने गणेशाचे पूजन-अर्जन केले. शकुंतला ज्या गणेशाची पूजा करीत असे तीच मूर्ती म्हणजे टिटवाळ्याचा महागणपती. पेशवेकाळापर्यंत ही गणेशमूर्ती गुप्त अवस्थेत होती.
मात्र थोरले माधवराव पेशवे यापरिसरात आले असता त्यांना गणेशमूर्तीबाबत दृष्टांत झाला। दरम्यान त्याचवेळेस पाण्याच्या सोयीसाठी येथील तलावाची दुरुस्ती सुरू असताना तिथे रामचंद्र मेहेंदळे यांना आजची गणेशमूर्ती सापडली। पेशव्यांनी त्यानंतर तिथे तत्काळ छोटेसे गणेशमंदिर बांधले. या गणेशाला "वरविनायक' किंवा "विवाहविनायक' असेही म्हणतात. कारण ज्यांचे विवाह जुळण्यात काही अडचणी असतील अशांचे विवाह या गणेशाच्या भक्तीने जुळून येतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मुंबईमधील इतर गणपती मंदिरांची माहिती पुढीलप्रमाणे - गिरगांवचा फडके गणपती; बोरीवलीच्या वझिरा नाका येथील स्वयंभू गणपती, मुंबादेवीजवळचा गणपती; भुलेश्वरजवळील गणेश मंदिर, वांद्रा येथील सिद्धिविनायक; डोंगरबाग, दादर येथील जोशी यांच्याकडील मांदार गणेश; ठाणे येथील एकवीसमुखी वरदविनायक।
ठाणे जिल्ह्यातील अन्य गणपती मंदिरे अशी - भिवंडी तालुक्‍यातील अणजूर येथील नाइकांचा सिद्धिविनायक; मुरबाड येथील कमलचक्राधिष्ठित गणपती; ठाणे शहरातील जांभळी नाक्‍यावरचा मांदार सिद्धिविनायक।
कोकणातील गणपती
पुळ्याचा गणपती - रत्नागिरी शहरापासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर समुद्रकिनाऱ्यालगत गणपतीपुळे हे स्थान आहे। मुद्‌गलपुराणात या गणपतीचे माहात्म्य विशद केले आहे। देशात चार दिशांना चार मंगलमूर्तींची महास्थाने आहेत. त्यांना द्वारदेवता अशी संज्ञा आहे. त्यापैकी कोकण किनारपट्टीत समुद्रतीरावरील ही पश्‍चिम द्वारदेवता आहे. अष्टविनायकांखेरीज जी काही जागृत गणेश मंदिरे महाराष्ट्रात आहेत त्यांच्यात पुळ्याच्या गणपती मंदिराचा समावेश होतो. इ.स. १६०० मध्ये मोगलाईच्या काळात गणेशभक्त असलेले बाळभटजी भिडे या ठिकाणी येऊन राहिले. त्यांना गणेशाचा दृष्टांत झाल्याप्रमाणे त्यांनी येथील जंगल तोडून जागा स्वच्छ केली. तेव्हा दोन गंडस्थळे आणि दंतयुक्त स्वरूप त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी त्याठिकाणी गवताचे छप्पर उभारून पूजा-अर्चेस सुरवात केली. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी दर्शन घेतले होते. तसेच माधवराव पेशवे आणि रमाबाई यांनी येथे धर्मशाळा बांधली. येथील वैशिष्ट्य हेच की ज्या टेकडीच्या पायथ्याशी ही गणेशमूर्ती आहे तिलाच गणेशस्वरूप समजले जाते. त्यामुळे गणेशाला प्रदक्षिणा घालायची असेल तर संपूर्ण टेकडीलाच अनवाणी प्रदक्षिणा घालावी लागते. अशी प्रदक्षिणा घालणे हा येथील उपासनेचा महत्त्वाचा धार्मिक विधी समजला जातो. खळाळत्या समुद्रकिनाऱ्यालगत आणि गर्द वृक्षराजींच्या सान्निध्यात वसलेले हे गणेशस्थान येणाऱ्या भाविकांना समाधान आणि शांतता प्रदान करत असते.
गुहागरचा उरफाटा गणपती।
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्‍यात गुहागर येथे ही गणेशमूर्ती आहे। ही मूर्ती कोळीलोकांना समुद्रात सापडल्याचे सांगतात। एकदा समुद्राच्या पाण्यामुळे गुहागर बुडण्याची वेळ आल्यावर या गणेशाला संकटनिवारणासाठी लोकांनी प्रार्थना केली. तेव्हा पूर्वाभिमुख असलेली ही मूर्ती पश्‍चिमाभिमुख झाली आणि समुद्र मागे हटला. तेव्हापासून या गणेशाला "उरफाटा' गणपती हे नाव पडले. सुमारे ३०० वर्षांपूर्वी या गणपतीची स्थापना झाली.
विनायक गावचा सिद्धिविनायक
रायगड जिल्ह्यातील उरण जवळ विनायक नावाचे छोटेसे गाव आहे। तिथेच या सिद्धिविनायकाचे स्थान आहे। हे मंदिर हंबीरराज राजाच्या काळचे, सुमारे सातशे- आठशे वर्षाचे प्राचीन मंदिर आहे. येथील सिद्धिविनायकाची मूर्ती साडेतीन ते चार फूट उंचीची असून त्याच्या दोन्ही बाजूस ऋद्धिसिद्धिच्या मूर्ती विराजमान आहेत.
मुरुडचा बल्लाळ विनायक रायगड जिल्ह्यात मुरुड-जंजिऱ्याजवळ बल्लाळ विनायकाचे स्थान आहे। जंजिऱ्यापासून अवघ्या दहा मिनिटाच्या अंतरावर हा गणेश भक्तांसाठी विराजमान झालेला आहे। या गणेशाचे वैशिष्ट्य असे की अष्टविनायकांपैकी एक असलेला पालीचा बल्लाळेश्वर पूर्वी याच स्थानी होता. परंतु मुघल मूर्तीभंजकांच्या भीतीने त्याला येथून पालीला हलविण्यात आले होते. तथापि श्री बल्लाळ विनायकाची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी १९०३ मध्ये गणेश भक्तांनी याच जागी एक पाषाणमूर्तीची स्थापना केली. त्यानंतर १९०९ मध्ये संगमरवरी मूर्तीसह मंदिर बांधण्यात आले. पूर्वीच्या स्थानमाहात्म्यामुळे असंख्य भाविक या ठिकाणी दर्शनास येत असतात.
दिवेआगरचा सुवर्ण गणपती श्रीवर्धन तालुक्‍याच्या मध्यभागी अरबी समुद्रकिनाऱ्यालगत दिवे आगर गाव वसलेले आहे। प्राचीन काळी या ठिकाणी मौर्य व शिलाहार यांचे राज्य होते। त्याकाळी अरब आणि पोर्तुगीज यांचे या परिसरात समुद्रमार्गाने हल्ले होत असत. त्यांच्यापासून रक्षण व्हावे म्हणून हजार वर्षांपूर्वी दिवेआगरची सुवर्ण गणेशाची मूर्ती जमिनीखाली पुरून ठेवली होती. दरम्यान १९९७ साली एका संकष्टी चतुर्थीच्या शुभदिनी श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील यांच्या नारळसुपारीच्या बागेत खोदकाम करताना ही मूर्ती आढळली. त्यानंतर या मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांचे लोंढे या ठिकाणी येऊ लागले.
कोकणातील इतर गणेशस्थानांची माहिती पुढीलप्रमाणे आहे - कनकेश्वर, ता। अलिबाग, जि। रायगड येथील रामसिद्धिविनायक; अलिबाग जवळील आवास गावचा वक्रतुंड; खोपोली ते पाली रस्त्यावरील, जांभूळपाडा गावचा श्री दशभुज सिद्धलक्ष्मी गणेश; उरण जवळील चिरनेर गावचा श्री महागणपती; कर्जत तालुक्‍यातील कडाव गावचा श्री दिगंबर सिद्धिविनायक; अगरगुळे, जि. रत्नागिरी येथील गलबतवाल्यांचा गणपती; चिपळूण तालुक्‍यातील हेदवीचा दशभुज लक्ष्मीगणेश; दापोली तालुक्‍यातील आंबोली गणपती आणि आंजर्लेचा कड्यावरचा सिद्धिविनायक; चिपळूण तालुक्‍यातील परशुराम येथील परशुराम गणेश; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्‍यातील रेडीचा श्री द्विभुज महागणपती.
दक्षिण व पश्‍चिम महाराष्ट्रातील गणपती
कोल्हापूर
शिरोळ तालुक्‍यातील गणेशवाडीचा गणपती - शिरोळ तालुक्‍यात कागलवाडजवळ कृष्णा नदीच्या काठी असलेले हे गणेशस्थान ५६ विनायकांपैकी आहे असे म्हणतात। सरदारकी मिळण्यापूर्वी पटवर्धनांच्या पूर्वजांनी हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या गणेशाला तामसी उपासना चालत नाही. तसे करणाऱ्यांना भयंकर स्वरूपात गणेशाचे दर्शन होते. असे अनुभव आल्याचे सांगितले जाते.
कोल्हापूरचा जोशीराव गणपती किंवा बिनखांबी गणेशमंदिर - कोल्हापूर शहरातील महाद्वार रोडवर हे गणेशस्थान आहे। वाईकर यांच्याकडील विहिरीच्या दुरुस्तीत एक स्वयंभू गणेशमूर्ती सापडली। तेव्हा १८८२ साली कोल्हापूरचे छत्रपती आणि नागरिकांनी मिळून या मूर्तीची मंदिरात स्थापना केली. या मंदिराला खांब नसल्यामुळे त्याला बिनखांबी गणेशमंदिर असेही संबोधले जाते. मूळचे संगमेश्‍वरचे जोशीराव ज्योतिषी छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात येथे राहत असत. जोशीरावांच्या शेजारी असल्याकारणाने या गणपतीला जोशीराव गणपती असेही म्हणतात.
कोल्हापुरातील अन्य गणपतीस्थानांची माहिती पुढीलप्रमाणे - महालक्ष्मी मंदिरातील घाटी दरवाजाकडे तोंड असलेला आणि नवसाला पावतो अशी ख्याती असलेला मोक्षी गणपती; कसबा बीड, जि। कोल्हापूर येथील शिलाहारांचा गणपती. करवीर तालुक्‍यातील चंबुखडी येथील सिद्ध बटुकेश्वर गणेश; गडहिंग्लज तालुक्‍यातील मौजे इंचनाळचा श्री गणेश.
सांगलीचे प्रसिद्‌ध गणेश मंदिर
दक्षिण महाराष्ट्रात सांगलीचे गणेश मंदिर देवस्थान फार प्रसिद्ध आहे। श्री गणेश म्हणजे सांगलीच्या पटवर्धनांचे कुलदैवत. थोरले चिंतामणराव पटवर्धन यांनी १८४३ मध्ये या गणेशाची स्थापना केली. या मंदिराची निर्मिती ज्योतिबाच्या डोंगरावरील उत्कृष्ट प्रतीच्या काळ्या पाषाणापासून करण्यात आलेली आहे. या गणेश मंदिरात भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून पाच दिवस मोठ्या समारंभपूर्वक गणेशोत्सव साजरा केला जातो.याशिवाय सांगली जिल्ह्यात मिरजेतील तळ्यावरचा गणपती आणि तासगावचे गणपती पंचायतन ही गणेशस्थाने प्रसिद्‌ध आहेत.
साताऱ्याचा ढोल्या गणपती
साताऱ्यातील या गणेशाची मूर्ती आकाराने १० ते १२ फूट उंच असल्याकारणाने त्याला ढोल्या गणपती म्हणतात। या गणपतीचे मूळ नाव मात्र "ज्येष्ठराज' असे आहे. हे फार प्राचीन गणेश मंदिर आहे. मराठेशाहीच्या आधी शिलाहार वंशातील राजा भोज याने साताऱ्याचा किल्ला बांधला. त्यावेळी गावच्या रक्षणासाठी त्याने या गणेशाची स्थापना केली. साताऱ्यातील सर्व मंगलकार्यांची पहिली अक्षता या गणपतीला दिली जाते.
या गणपती शिवाय सातारा शहरात; खिंडीतील गणपती, शनिवार पेठेतील फुटका गणपती, चिमणपुऱ्यातील गारेचा गणपती आदी गणेशस्थाने आहेत. तर सातारा जिल्ह्यात वाई येथे कृष्णाकाठावरील ढोल्या गणपती, वाई तालुक्‍यातील ब्राम्हणशाई येथील श्री गणपती देव संस्थानचा गणपती; तसेच सातारा तालुक्‍यातील अंगापूर येथील शाहूकालीन गणेश मंदिर आदी गणेशस्थाने भक्तांमध्ये प्रसिद्‌ध
.अक्कलकोट, जि. सोलापूर येथील स्वयंभू गणेश मूर्तीअक्कलकोट महाराजांच्या समाधी मंदिराजवळच त्यांचे भक्त चोळप्पा यांचा वाडा आहे। चोळप्पांचे वंशज हल्ली या वाड्यात राहतात. त्यांच्यापैकी श्री अप्पू महाराज यांच्याकडे ही स्वयंभू गणेश मूर्ती आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे अक्कलकोटच्या ज्या वाड्यात सर्वप्रथम अक्कलकोटचे स्वामी आले त्याच वाड्यात गणेश चतुर्थीच्या दिवशी ही मूर्ती सापडली. ही गणेशमूर्ती मांदाराची असून सोंड लांब व उर्ध्वगामी आहे. या गणेशाची प्राणप्रतिष्ठा १९६६ रोजी झाली. नवसाला पावतो अशी ख्याती असल्याकारणाने अक्कलकोट स्वामींच्या दर्शनासाठी येणारे अनेक भक्त चोळप्पांच्या वाड्यातील या गणेशाचे आवर्जून दर्शन घेतात.
याशिवाय सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरपासून चार किलोमीटर अंतरावरील पखालपूरचा गणपती प्रसिद्ध आहे।
अहमदनगरमधील अक्षता गणपती - अहमदनगर शहराच्या गुजरगल्लीत दोनशेवर्षांपेक्षाही जुने असे हे गणपतीमंदिर आहे। हे स्वयंभू आणि जागृत स्थान समजले जाते. येथील श्रींची मूर्ती उजव्या सोंडेची आहे. मंगलकार्याच्या प्रसंगी या गणपतीला वाजत-गाजत अक्षता देण्याची प्रथा असल्याने या गणेशाला अक्षता गणेश हे नांव पडले.
माळीवाडा गणपती - नगर शहराच्या दक्षिणेकडे माळीवाडा वेशीने आत जात असताना हे पुरातन गणेश मंदिर लागते। येथील गणेशमूर्ती १० फूट उंच, उजव्या सोंडेची आहे। असे सांगतात की सुमारे साठेक वर्षांपूर्वी या गणेशमूर्तीला घाम आला होता. तेव्हा यज्ञयागादीक करून तो थांबविण्यात आला. तेव्हापासून हे मंदिर भक्तांमध्ये विशेष प्रसिद्ध पावले आहे.
आव्हाने येथील "निद्रिस्त' गणपती अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी गावापासून १७ किलोमीटर अंतरावर अवनी नदीच्या तीरावर आव्हाने बुद्रूक नावाचे गाव आहे। या गावी हा "निद्रिस्त' गणपती वसलेला आहे। महाराष्ट्रात अशी दुर्मिळ मूर्ती अन्यत्र कोठेही नाही. अष्टविनायकांपैकी एक स्थान असलेल्या मोरगावच्या गणपतीचे अंशात्मक स्थान म्हणून हा गणपती ओळखला जातो.
उत्तर महाराष्ट्रातील गणपती
नाशिकचा मोदकेश्वर
नाशिक शहरात गोदावरी नदीच्या तीरावर मोदकेश्वराचे पुरातन मंदिर आहे। याचा आकार मोदकाच्या आकाराचा असल्यामुळे त्याला मोदकेश्वर असे नाव पडले। जागृत स्थान म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे. गणपतीच्या ५६ स्थानांपैकी हे एक स्थान आहे. या गणपतीला हिंगण्यांचा गणपती म्हणूनही ओळखले जाते. याविषयी पुराणात एक आख्यायिका सांगितली जाते, की श्री शंकरांनी मदनाला शाप दिल्यानंतर त्याला पूर्ववत होण्यासाठी गणेशोपासना सुचविली। त्यावेळी रतिसह मदनाने कठोर गणेशसाधना करून श्री गणेशाचा कृपाप्रसाद मिळविला. मोदकेश्वर म्हणजे मदनाने आराधना केलेले "कामवरद' महोत्कट क्षेत्र होय.
साताऱ्या प्रमाणेच नाशिकमध्येही एक ढोल्या गणपती आहे। नाशिक शहराच्या मध्यवर्ती अशोक स्तंभ चौकात या गणपतीचे मंदिर आहे। ही गणेशमूर्ती सात ते आठ फूट उंचीची आहे।
नाशिकपासून साधारणतः: आठ किलोमीटर अंतरावर आनंदवल्ली गाव आहे. या ठिकाणी गोदावरीच्या तीरावर गणेशाचे पेशवेकालीन मंदिर आहे. याला नवश्‍या गणपती असे म्हणतात. हे स्थान फारच रम्य आणि शांत स्थान आहे. या ठिकाणी मंदिराच्या सभागृहात अष्टविनायकांच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. अशा या आठ मूर्ती आणि गाभाऱ्यातील मूळ मूर्ती असे मिळून एकूण नऊ गणपती होतात म्हणून याला नवश्‍या गणपती हे नाव पडले असे म्हणतात. तर काही भक्‍तांच्या सांगण्यानुसार नवसाला पावतो म्हणून या गणपतीचे नाव नवश्‍या गणपती असे.
याशिवाय नाशिक शहरात सोमवार पेठेतील पेशवेकालीन खांदवे गणपती, काळाराम मंदिरातील गणपती; गोरेराम मंदिराच्या पश्‍चिमेकडील दशभुज सिद्धिविनायक; पंचवटीतील गणेशवाडी येथील पुरातन तिळ्या गणपती; कपालेश्‍वर मंदिराजवळील उजव्या सोंडेचा गणपती; दूध बाजारातील त्र्यंबक दरवाजा चौक गणपती; उपनगर, नाशिक रोड येथील इच्छामणी गणपती; भद्रकाली मंदिराजवळील साक्षी गणेश; रविवार कारंजा चौकातील श्री सिद्धिविनायक अशी अनेक गणेशस्थाने आहेत।
नाशिक जिल्ह्यातील गणेश मंदिरांची नावे अशी - श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथील पूर्व दरवाज्याकडचा सिद्धिविनायक; सिन्नरच्या भैरवनाथ मंदिरातील श्रीगणेश; अंजनेरी येथील पुरातन गणेश मूर्ती; सप्तश्रृंगी गडा खालील गणेश कुंडाजवळचा श्रीगणेश।
धुळे शहरात पेशव्यांच्या काळचा उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाचे मंदिर आहे। तसेच येथील पांझरा नदीकाठचे गणेशमंदिर गणेशभक्‍तांमध्ये प्रसिद्ध आहे.
श्रीगणेशाचे अर्धपीठ अर्थात एरंडोलजवळील "पद्मालय'जळगाव जिल्ह्यातील "पद्मालय' हे प्रसिद्ध गणेश क्षेत्र आहे। श्रीगणेशाच्या अडीच पीठांपैकी "अर्ध' पीठ म्हणून "पद्मालय' क्षेत्र ओळखले जाते. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गावाजवळ एक मैल अंतरावरील एका डोंगरावर पदाय गणेशाचे स्थान आहे.
या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे येथील गाभाऱ्यात श्रीगणेशाच्या दोन स्वयंभू मूर्ती आहेत। पैकी एक उजव्या सोंडेची तर एक डाव्या सोंडेची आहे। भक्तगणांत हे स्थान नवसाला पावणारे म्हणून प्रसिद्ध आहे. या गणेशस्थानापासूनच सुमारे पाच किलोमीटर अंतरावर भीम-बकासूर युद्धाची जागा आहे.
विदर्भातील गणपती
यवतमाळ जिल्ह्यातील कळंबचा श्री चिंतामणी यवतमाळहून वर्धा - नागपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर कळंबचा चिंतामणी आहे। हे स्थान विदर्भातील कदंबपूर म्हणून ओळखले जाते. गणपतीच्या २१ क्षेत्रांमध्ये हे स्थान गणले जाते. गणेशपुराण आणि मुद्‌गल पुराणात या क्षेत्रासंबंधीचे आणि तेथील चिंतामणी संबंधीचे वर्णन आलेले आहे. अष्टविनायकांपैकी थेऊर येथील चिंतामणी गणेशाची जी कथा वर्णिली आहे; तीच याही गणेशाची आहे. या गणेशाची स्थापना इंद्राने केली असल्याचा पुराणात दाखला आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर खूप खोलात आहे. त्यामुळे जवळ गेल्याशिवाय मंदिराचे दर्शन होत नाही. मंदिरासमोरच दर्शनी बाजूस उजव्या हाताला चौमुखी गणेशाची मूर्ती आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच पाषाणातून ही मूर्ती कोरलेली आहे. या मंदिराच्या काही पायऱ्या उतरल्यानंतर मध्येच एक चौकोनी कुंड आहे. यालाच पावनकुंड असे म्हणतात. या कुंडाला जिवंत झरे आहेत.
विदर्भातील अन्य गणपतींची स्थाने अशी - वर्धा जिल्ह्यातील केळझरचा एकचक्रा गणेश; नागपूर जिल्ह्यातील आधासा (क्षेत्र अदोष) येथील शमी विघ्नेश; नागपूर शहरातील सीताबर्डी किल्ल्याचा गणपती; नागपूर शहरातील टिळक पुतळ्यासमोरचा श्री सिद्धिविनायक; बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील स्वयंभू वटसिद्ध गणेश; पायानील, ता। अहेरी, जि. गडचिरोली येथील सागाच्या जंगलातील गणेश मंदिर; अकोला शहरातला स्वयंभू श्री मांदार गणेश; चंद्रपूर जिल्ह्यातील आवारपूर, ता. गोंडपिंपरी येथील श्री सिद्धिविनायक; पवनार, वर्धा येथील श्रीचिंतामणी.
मराठवाड्यातील गणपती
औरंगाबादजवळील वेरूळचा लक्षविनायक - औरंगाबादपासून सुमारे २२ किलोमीटर अंतरावरील वेरूळ गावी गणेशाचे हे स्थान आहे। गणेशाच्या एकवीस स्थानांपैकी एक स्थान समजले जाते। शिवपुत्र स्कंदाने या गणेशाची स्थापना केल्याचा पुराणात उल्लेख सापडतो.सेंदूरवाड्याचा सिंदुरान्तक गणेशऔरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्‍यातील सेंदूरवाडा येथे या गणेशाचे स्थान आहे. खाम नदीच्या काठावर हे गाव वसलेले आहे. खाम नदीत हेमाडपंती बांधणीचे श्रीगणेशाचे मंदिर आहे. हे एक अत्यंत जागृत स्थान समजले जाते. याच ठिकाणी श्रीगणेशाने सिंदूरासुराशी युद्ध केले. त्यावरून या गणेशाला सिंदुरान्तक गणेश हे नाव पडले. येथील गणेशमूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीच्या पाठीमागे डाव्या बाजूला त्याच दगडात म्हसोबाची मूर्ती कोरलेली आढळते. याठिकाणी उंदीर हे गणपतीचे वाहन नाही. उंदीर आणि गणपतीचे याच ठिकाणी युद्ध झाले होते अशीही एक आख्यायिका येथे प्रसिद्‌ध आहे.
मराठवाड्यातील अन्य गणेशस्थाने पुढीलप्रमाणे - अजिंठ्याची गणेशलेणी; सातारा येथील द्वादशहस्त गणेश; औरंगाबाद शहरातील समर्थ नगर येथील श्री वरद गणेश मंदिर; मराठवाड्यातील स्वयंभू सिद्‌धस्थान नांदेड येथील त्रिकुट गणेश; नांदेड शहरातील जोशीगल्लीतील श्रीगजानन; नांदेड शहरातील नवसाला पावणारा आखाड्याचा गणपती; कंधार, जि. नांदेड येथील साधुमहाराजांचा गणपती; दाभाड,ता.नांदेड येथील श्री सत्य गणपती मंदिर; नवगण राजुरी, जि. बीड येथील नवगणपती; अंबाजोगाई, जि. बीड येथील पाराचा गणपती; बीड जिल्ह्यातील नामलगांव गणेश; राक्षसभुवन, जि. बीड येथील विज्ञानगणेश क्षेत्र; गंगामसले, जि. बीड येथील भालचंद्र गणेश; गणेशाच्या साडेतीन पीठांपैकी पूर्णपीठ असलेले जालना जिल्ह्यातील राजूर, ता. भोकरदन येथील वरेण्यपुत्र गणपती क्षेत्र.

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
ऐतिहासिक नसले तरी लातूरचे अष्टविनायकाचे मंदिर प्रसिद्ध आहे.
Devendra म्हणाले…
माझ्या सारख्या गणेश भक्ताला श्री गणराया विषयी इतकी सविस्तर माहिती महाजालावर उपलब्ध आहे याचा आनंद झाला. एक ’राज’कीय खेळी हा लेखही आवडला.

लोकप्रिय पोस्ट