आन्याबाई !

आन्याबाई ! तू आता या जगात नसली तरीही का कोण जाणे? तुझी आठवण मात्र नेहमी येत असते. तसा तुझा नी माझा काही संबंधच नव्हता. रक्ताचे नाते सोड पण तू तर माझी शेजारीही नव्हती किंवा माझ्या आई-आजी वगैरेंची मैत्रीण नव्हतीस. एका गल्लीत राहायचो इतकाच काय तो संबंध….आणि मी तर कित्ती कित्ती लहान होतो तेव्हा.. अगदी बालवाडीत जायचो. तरीही तू माझ्या पक्की लक्षात आहेत. आठवणीत आहेस?


आन्याबाईऽऽऽ ! असे कसे गं तुझे नाव? गल्लीतील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे तुला आन्याबाईच म्हणायचे. आजी- काकू- मावशी असे शब्द कधी ऐकण्यात आले नाहीत. आणि तूही मोठ्या मनाने त्यांना प्रतिसाद द्यायची.

तुला माहिताय की आम्ही तुला गल्लीत नेहमीच बघायचो? तशी तू चारचौघात उठून दिसणारी म्हातारी नव्हतीच गं. चेहऱ्यावर सर्वत्र सुरकुत्या पडलेल्या. कमरेतून वाकलेली. जुनाट लुगडे नेसणारी. बुटक्‍या उंचीची आणि परिस्थितीने खूप गरीब असशील असे वाटणारी…. पण तरीही तुझ्याविषयी आकर्षण वाटायचे आम्हा मुलांना. तुला नेहमी बघायचो आम्ही.

रोज सकाळी तुझा नियम ठरलेला असायचा. तो म्हणजे नळावरून पाणी भरणे. तुझ्याइतकेच जुने, कळकट आणि ठिकठिकाणी चेपलेले अल्युमिनियमचे पातेले घेऊन तू पाणी भरायला यायचिस; मुळात तुझ्याच्याने ते पातेलेही उचलायचे नाही इतकी तू थकलेली असायची. पण तू तरी काय करणार तुला सर्व करावेच लागायचे कारण एकटीच राहायचीस ना तू ! … तुझ्या त्या पाणी भरण्याचे मला काय कौतुक वाटायचे म्हणून सांगू…!

तसा आपला दोघांचा संवाद झालाच नाही गं कधी… तुझ्याशी बोलायचं कसं हाच माझ्या मनात प्रश्‍न असायचा. मग तुझ्याविषयी कुतूहल वाटायचे सारखे. पण एकदा आपला संवाद झालाच. एकदा मी अंगणात खेळत असताना तू मला बोलावून घेतलेस. अन्‌ मीही धावत माडीवर असलेल्या तुझ्या घरी आलो. अन्‌ तू मला मातीचे बैल दिलेस खेळण्यासाठी. एकूण ६ बैल होते ते. पण ते बैलही कसे गं, तुझ्यासारखेच गरीब. ना त्यांना रंग ना रूप ! नुसता गेरू फासलेला. पण तरीही तू मोठ्या प्रेमानं मला ते देऊ केलेस. अन्‌ मी ही मोठ्या आवडीने ते घेतले. तुला माहितीये की पुढे कितीतरी दिवस त्या मातीच्या बैलांशी मी खेळत होतो.

तर आन्याबाई..! तुझ्यात आणि माझ्यात झालेला हा एकमेव पहिला आणि शेवटचा संवाद. मी मात्र मनाच्या कोपऱ्यात तो जपून ठेवलाय. तुला माहिताय का? मी त्यावेळेस हळूच तुझे घर पाहून घेतले होते. पण मला नाही आवडले ते… किती गरीब होतीस गं तू! तुझ्याकडे रोजच्या गरजेइतक्‍याही वस्तू असू नये.. शिवाय तू एका पोटमाळ्यावरच्या अंधाऱ्या खोलीत राहायचीस, अगदी गैरसोयीची होती ती खोली.

त्यावेळेस अगदी लहान असलो ना तरीही तुझ्याविषयी मला का कोण जाणे उगाचच कणव आला आणि तुझा चेहरा आणि तुझे नांव कायमचे माझ्या मनात कोरले गेले.

नंतर नंतर आन्याबाई तू गल्लीत येईनाशीच झाली. कुणी म्हणे तू घरातच पडून असते. मग एके दिवशी गल्लीत एक गाडी आली. त्यात खूपशी माणसं होती. त्यांनी तुला उचलले आणि गाडीत टाकून घेऊन गेले. मी पाहिले होते तेव्हा तुला. तू फारच आजारी आणि थकलेली होती. स्वतः:ची शुद्धही तुला नव्हती. तुला चालताही येत नव्हते. तुला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी ती माणसं आली होती.

मला वाटलं की तू आता लवकरच बरी होऊन येशील. नेहमीप्रमाणे पोचे आलेलं पातेलं घेऊन नळावर पाणी भरण्यासाठी येशील. पण तू कधी आलीच नाहीस गं…. नंतर कुण्या मोठ्या माणसांकडून कळले की तू आता कधीच येणार नाहीस म्हणून… खूप वाईट वाटले तेव्हा. तुझा माझा काही संबंध नसताना रडावेसे वाटले मला…

आणि आता? मला माहितीय की तू या जगात असणं शक्‍यच नाही. पण तरीही माझ्या मनाच्या कोपऱ्यात मी तुला अजूनही जपून ठेवलंय. गेली कितीतरी वर्षे तू माझ्या आठवणीत येत असतेस.. येत आहेस.

पण आन्याबाई… तू अशीच आठवणीत येत रहा… असं वाटतंय की प्रत्यक्षात आपण एकमेकांशी नातं जोडू शकलो नाही पण आठवणीतील आपले नाते मात्र पक्के आहे. !

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
khup sari manas apalya ayushyat yet astat ani jat astat pan kahi manas ek vegalach nat jadun jatat... tyanchya athvani man halav kartat..

लोकप्रिय पोस्ट