वास्तव पत्रकारीतेचे आणि आयुष्याचेही

पुण्यातील ऑफीसमध्ये बसून मी हा ब्लॉग लिहीतोय. आज २९ एप्रिलचा बुधवार आहे. आता दुपारचे ४.३० वाजलेत. साधारणत: सहा किंवा साडेसहाच्या दरम्यान महाराष्ट्राच्या विविध भागातून पुण्याच्या मुख्य आवृत्तीकडे बातम्या यायला सुरुवात होईल. त्यात मुख्यत: वाढत्या उन्हाळ्याच्या बातम्या असतील. उन्हामुळे होणाऱ्या त्रासाच्या बातम्या असतील. उष्माघाताच्या त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या बातम्याही त्यात असतील. कदाचित त्यात मालेगांव परिसरातील उष्माघाताची बातमीही त्यात असेल. आणि त्या बातमीत उष्माघाताने आज सकाळीच दगावलेल्या माझ्या लाडक्‍या मामाचेही नाव असेल. मात्र नेहमीच्या सवयीने मी ती बातमी कदाचित सहजरित्या संपादित करू शकणार नाही किंवा कदाचित मी ती वेबसाईटवर जलदरित्या "अपडेट' ही करू शकणार नाही.


नेहमी इतरांच्या बातम्या निर्विकारपणे देणाऱ्या माझ्यासारख्या पत्रकारासाठी हा मोठाच धक्का असेल. मग मी या सगळ्या विषयावर विचार करेल.... कदाचित स्वत:ला समजावेलही.... जगात रोज कितीतरी घटना घडतात त्यावेळेस आपल्याला काहीच वाटत नाही पण त्यात आपले कुणीतरी असले तरच आपण हेलावतो वगैरे वगैरे. अशीच स्वत:ची समजूत काढेल... किंवा हळूच बाजूला जाऊन कुणाच्या नकळत पोटभर रडून घेईल. मात्र हे दु:ख मामा तरुणपणातच तडकाफडकी गेल्याचे असेल की पुण्यापासून १५ तासांच्या अंतरावरील त्याच्या गावी गेलो तर त्याची राख तरी बघायला मिळेल की नाही याचे असेल; किंवा ही घटना बातमी म्हणून समजली या पत्रकारीतेल्या वास्तवाचे; ते मला स्वत:लाच नेमकेपणाने सांगता येणार नाही... हतबल आणि असहाय अशी माझी अवस्था असेल.

पण एक गोष्ट मात्र पुन्हा पुन्हा मला जाणवेल; ज्याच्या भरवशावर आपण अनेक गोष्टी करतो, अहंकार करतो त्या आयुष्याच्या बेभरवसेपणाची, दगाबाज वृत्तीची...!

टिप्पण्या

साळसूद पाचोळा म्हणाले…
.... जगात रोज कितीतरी घटना घडतात त्यावेळेस आपल्याला काहीच वाटत नाही पण त्यात आपले कुणीतरी असले तरच आपण हेलावतो ......

.

जवळच्यां बद्दलच आपल्याला आपुलकि, प्रेम, जिव्हाळा वाटतो.........

आपलयाकडे "नातं" म्हंजे रक्ताने येते ते, पाहुणे आणि सोयरिकीने येते ते किवां फार फार तर स्वजातीमुळे येते ते ... यापलिकडिल समाजाशी असलेलं नातं आपनास जवळचे वाटत नाहि.. .. याउलट बाबा आमटे, मदर टेरेसा अश्या काही व्य्क्ती असतात कि त्यांना सारा समाजच नात्या-गोत्यातला वाटतो... जगातल्या कुनासाठिही त्यांचे मन हेलावते...

लोकप्रिय पोस्ट