दभिंशी मुक्त संवाद



मागच्याच आठवड्याची गोष्ट.
संध्याकाळच्या वेळेस घराजवळ अचानकच दभिंची भेट झाली. ओघाओघाने गप्पा मारणेही आलेच. बऱ्याच विषयांवर अनौपचारिक गप्पा झाल्या. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने गेल्या दीड महिन्यात त्यांनी बऱ्याच गावांना, संस्थांना भेटी दिल्या. त्याविषयी बोलणे झाले. बोलण्याच्या ओघात त्यांच्या प्रकाशित होऊ घातलेल्या आत्मचरित्राचा, "अपार्थिवाचा यात्री'चा उल्लेख आला. दभिंसारख्या ज्येष्ठ साहित्यिकांचे आत्मचरित्र म्हणजे माझ्यासारख्या सामान्य वाचकासाठी एक जिज्ञासेचाच विषय. त्यात हे आत्मचरित्र विरळा.


यात आयुष्यातील घटना आणि प्रसंग यापेक्षा वास्तू आणि स्थळे यांना केंद्रस्थानी ठेवले आहे. पण तुमच्या आयुष्यात काही तरी घटना, प्रसंग घडले असतीलच ना? असे त्यांना जरा धीर धरूनच विचारले. मग त्यांनीही मोकळेपणाने एक दोन प्रसंग सांगितले. शेवटी न राहवून त्यांना यासंदर्भात बोलण्यासाठी खास वेळ मागितली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी वेळ दिली.

मनात अनेक प्रश्‍न आणि कुतूहल घेऊनच सकाळी नऊच्या सुमारास त्यांच्या घरी गेलो. ते तयारच होत होत. अनौपचारिक बोलणे झाल्यानंतर मी पुन्हा आदल्या दिवशीचाच प्रश्‍न विचारला. म्हणालो की तुमच्या येणाऱ्या आत्मचरित्रात ज्याचा उल्लेख आला नाही, ते तुम्ही वाचकांना सांगायचे आहे. त्यावर ते हसले. म्हणाले,"माझ्या आयुष्यात सनसनाटी असे काही घडले नाही, तरीही साहित्याच्या प्रवासासंदर्भात काही प्रसंग आणि घटना सांगतो.' (अर्थात मी कान टवकारलेच होते)

त्यांनी पुढे बोलायला सुरवात केली. "हे पहा, वयाच्या बाराव्या वर्षांपासून आज शहात्तराव्या वर्षापर्यंत मी लिहितोय. सुरवातीला शाळेमध्ये निबंध आणि लघुनिबंध लिहिले, ते काही प्रकाशित केले नाही. माझे जे शिक्षक होते, मधुकर आणे गुरुजी, त्यांना ते लघुनिबंध आवडायचेत. ते म्हणायचे इतके सुंदर निबंध मी सुद्धा लिहू शकत नाही. म्हणायचे, हा मुलगा मोठा साहित्यिक होणार आहे. माझ्याबद्दल पहिलं साहित्यिक भविष्य या आणेगुरुजींनी वर्तविले. इथेच ते थांबले नाहीत तर मला नाना प्रकारची पुस्तके त्यांनी वाचायला दिली. वाङमयावर त्यांचं खूप प्रेम होतं. पण ते कधीही म्हटले नाहीत, की तू मेळ्यात ये, नाटकात ये. कारण त्यांना माझी अंतर्मुख वृत्ती माहीत होती. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक शिक्षक असतो, की जो सुप्त गुण ओळखतो. आणे गुरुजी बी.ए. झालेले होते.आश्‍चर्य म्हणजे मी जेव्हा विद्यापीठात एम.ए. शिकवायला लागलो, तेव्हा ते म्हणाले की मला तुझ्या वर्गात बसायचे आहे. मुद्दा हा की लहानपणापासून असं वाटायचं, की जेव्हा लिहिता वाचता येत नव्हतं, तेव्हापासून वाटायचं की आपण लेखक व्हावं. इतर लहानसहान गोष्टी करत होतो, पण त्या आपद्‌धर्म म्हणून करत होतो. हे कुठून आलं? कसं आलं? हे आज मी सांगू शकेल, त्या काळात असं काही नव्हतं. कारण माझे बहिणभाऊ काही लिहीत नव्हते. वाचनाचं वेड तसं साऱ्यांनाच होतं पण लेखनाचं वेड माझ्यात उपजतच आहे, असं म्हटलं पाहिजे. अजूनही शहात्तराव्या वर्षी मी लिहितो. मला अजून खूप लिहायचंय आणि शेवटच्या क्षणापर्यंत मी लिहीत राहीन, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कारण स्फुरण येतंच असतं, काहीतरी नवनवीन सुचतंच असतं.

जेव्हा मी सोळा-सतरा वर्षांचा झालो, अर्थातच पूर्ण वयात आलो, तेव्हा अर्थातच तारुण्याच्या लहरी माझ्या मनामध्ये उठायला लागल्या आणि लघुनिबंधाबरोबर मी कविता लिहायला लागलो. त्या कविता मला माझ्या आत्मस्वरासारख्या वाटत. त्या मी कुणाला दाखवत नसे, अगदी आणेगुरुजींना सुद्धा कविता दाखविल्या नाहीत. त्यात प्रेमकविता, निसर्गकवितांचा समावेश होता. वाचन अर्थातच लहानपणापासून खूप अफाट होतं. त्यामुळे कविता सहज स्फुरत होत्या. त्याकाळात आधार कुलकर्णी नावाचा माझा मित्र होता. त्यालाही वाचनांच खूप वेड होतं आणि दुसरा मित्र होता मधू वाजगावकर, पुढे तो माझा सहकारी सुद्धा राहिला. हे दोघे रामकृष्ण मठातील वसतिगृहात राहात होते. तिथे आध्यात्मिक प्रवाह सुरू झाला. त्यांच्या सहवासाने माझ्यामध्ये एक शिस्त येत गेली; वाचनाची-लिखाणाची. ते साहित्याबद्दल, छंदाबद्दल बोलायचे. त्यामुळे माझ्या त्या मुक्त वृत्तीला या दोघांच्या सहवासामुळे छान आकार येत गेला. कविता तर मी लिहीतच होतो. तेव्हा नागपूर आकाशवाणीने युवकांसाठी खूप मोठी काव्यस्पर्धा घेतली होती. तेव्हा सगळे म्हणायला लागले की तू कविता पाठव. मला वाटलं कशाला पाठवायचं? कारण मला याचे आकर्षण नव्हतं. माझी मोठी बहीण शिक्षिका होती, आणि आदर्श शिक्षिका होती. तिला आम्ही जीजी म्हणायचो. अक्षर अगदी सुंदर, शुद्धलेखन अगदी चोख. मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी या भाषांवर तिचं प्रभुत्व होतं. वक्तृत्व उत्तम होतं आणि चारित्र्यसंपन्न. जुन्या पिढीतील शिक्षक जसे असत की नाकासमोर चालायचं आणि आपल्या आयुष्याचं उद्दीष्ट विद्यार्थी घडवणं हेच असे. अशी ती होती. तर ती म्हणाली, की तू कविता लिहितोस तर स्पर्धेकडे का नाही पाठवत. मी म्हणालो की मला काही त्या स्पर्धेसाठी पाठवायच्या नाहीयेत. पण तिने माझी कवितांची वही घेतली. त्याच्यातली एक कविता निवडली आणि ती आकाशवाणीला पाठवली. नंतर त्या कवितेला प्रथम पारितोषिक मिळालं.

त्या कवितेचं नाव होतं "बारा आणि तास शलाका'. घड्याळाकडे पाहून मला सुचलेली ती कविता आहे. त्यातील बारा म्हणजे प्रियकर आणि तास काटा (की ज्याचे मी तास शलाका असे स्त्रीलिंगी रूप केले) प्रेयसी. आधुनिक युगाशी संबंधित आणि प्रेमाच्या भावनेवर आधारित ही दोन भागांमध्ये ही कविता होती. कविता परीक्षकांना फारच आवडली आणि माझा मोठा सत्कार झाला. नागपूर आकाशवाणीवर माझी मुलाखत, मोहन नगरकर नावाच्या आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांनी घेतली. मला प्रश्‍न विचारला, कोणता कवी विशेष आवडतो? क्षणाचाही विलंब न करता मी म्हणालो, की मला बा.सी. मर्ढेकर हा कवी आवडतो. तर सगळेच उडाले. कारण बा.सी. मर्ढेकर तेव्हा वादग्रस्त समजले जायचे. माझ्या कवितांवर तेव्हा बालकवी आणि मर्ढेकर यांचा संस्कार होता.

या घटनेनंतर माझे प्रकाशनपर्व सुरू झाले. माझ्या कविता दैनिकांत, नियतकालिकांत प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यातील काही द.भि. कुलकणी या नावाने तर काही दत्ता कुलकर्णी या नावाने प्रसिद्ध होत असत. असे असले तरीही माझी कविता मला कधीही समाधान देत नव्हती. कारण माझ्या कवितांवर बालकवी, मर्ढेकर यांच्यासारख्या कवींचा संस्कार होता. त्यामुळे एक कवी म्हणून नाही, तर एक रसिक म्हणून मी त्या लिहिल्या असे मला वाटते. माझी पत्नी शिवरंजनी (आता ती हयात नाही) एकदा एका नियतकालिकाला मुलाखत देताना म्हणाली, की ज्या शक्तीच्या प्रेरणेमुळे कवी लोक कविता लिहितात, त्याच शक्तीच्या प्रेरणेमुळे दभि समीक्षा लिहितात. हे तिचे माझ्याबद्दल आणि समीक्षेबद्दलचे मत. ते ऐकल्यावर मी पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडलो.

तुम्ही सुरवातीलाच प्रेमकवितांचा उल्लेख केला. आता पुन्हा एकदा प्रेमात पडलो असे म्हणालात, याचा अर्थ तुमचा प्रेमविवाह झालाय का? तसे असेल तर त्याबद्दल आम्हालाही सांगा.

असे विचारल्यावर दभिंचा चेहरा जरा खुलतो. थोडेसे हसूनच सांगायला लागतात, "त्यावेळेस मी एम.ए.चा बहिःस्थ विद्यार्थी होतो आणि एका कॉलेजमध्ये शिकवत असे. तिथे रजनी गाडगीळ नावाची एक विद्यार्थिनी होती. गोरी, घारी, दिसायला सुंदर. तेव्हा तिचे वय 19 असेल आणि माझे 24 वर्षे. ती आमच्या घराजवळच राहायची. बरेचदा ती आमच्याघरी येत असे. एकदा अशीच आलेली असताना, घराच्या जिन्याजवळच तिने मला विचारले की तू माझ्याशी लग्न करशील का? माझ्या अंतर्मुख स्वभावामुळे मी तिला लग्नाबाबत विचारणार नाही, असे तिला वाटले असावे. अर्थात मलाही ती आवडत होतीच. मग दोघांनीही या विषयी एकमेकांच्या घरी सांगितले. तिला वडील नव्हते. ती कोकणस्थ आणि मी देशस्थ यामुळे दोघांच्याही घरच्यांनी थोडी कुरकूर केली. मला तेव्हा काही मोठ्या पगाराची नोकरी नव्हती, शिवाय मी दिसायला बारीक, सावळा. त्यामुळेही तिच्या घरून थोडा विरोध झाला. पण नंतर मी एम. ए. ला पहिला आलो. मी प्राध्यापक होऊन स्थिरावणार म्हणून मग दोन्हीकडचा विरोध मावळला आणि आमच्या लग्नाला संमती मिळाली आणि रजनी गाडगीळची शिवरंजनी कुलकर्णी झाली. आमच्या बाबतीत आणखी एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते. ती म्हणजे त्या काळी आम्ही लग्नापूर्वीच कुटुंबनियोजनाचा निर्णय घेतला होता. कारण माझे पीएचडीचे आणि माझ्या बायकोचे बीएचे शिक्षण सुरू होते. ते पूर्ण झाल्यावर लग्नानंतर चार वर्षांनी आम्हाला मुलगा अभिनंदन झाला. तोपर्यंत आम्हाला मूल होत नाही म्हणून घरच्यांना काळजी वाटायची.

दभि आपल्या प्रेमाच्या आठवणीबद्दल सांगत असताना, मध्येच माझ्या मनात प्रश्‍न आला. कविता, समीक्षा, प्रेम वगैरेमधून हा माणूस आध्यात्मिकबाबीकडे कसा पोचला असावा? ज्ञानेश्‍वरीचे उल्लेख यांच्या बोलण्यातून वारंवार का येतात? त्यांचे एकमेकांशी काय नाते आहे. हा प्रश्‍न त्यांना विचारला.

मग ते थोडे गंभीर होऊन सांगू लागले, " नागपूरला आमच्या घराजवळच रेल्वेचा दवाखाना होता. रेल्वेखाली येऊन अपघात झाल्यावर जखमींना, मृतांना तेथे आणत. अनेकदा त्या दवाखान्याच्या अंगणात प्रेतं ठेवलेली असत. एका तर एक मरणोन्मुख माणूस त्याही अवस्थेत म्हणत होता - मले पेरू पाहिजे, मले पेरू पाहिजे. तो काही पेरूचा हंगाम नव्हता. पण मरतानाही त्याची इच्छा कायम होती. एकाच क्षणी चालणारी बोलणारी माणसं, दुसऱ्याच क्षणी अशी कशी संपतात, हे पाहून माझ्या मनावर खूप परिणाम झाला आणि नंतर मीही माणसाच्या या प्रवासाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. तुला सांगतो, माझ्या सगळ्या साहित्यावर या गोष्टीचा सतत प्रभाव राहिला आहे. हा माझा अधिबंध झाला आहे आणि इथूनच खऱ्या अर्थाने माझ्या अध्यात्माच्या प्रवासाला सुरवात झाली.

आता तुमच्या ज्ञानेश्‍वरीच्या प्रेमाबद्दल सांगा, मी मध्येच त्यांना छेडतो. मग तेही आपले बोलणे सुरूच ठेवतात, "माझी आई धार्मिक वृत्तीची होती, तिला दासबोध, ज्ञानेश्‍वरी वगैरे ग्रंथांची आवड होती. ती निरक्षर होती. त्यामुळे माझ्याकडून ती ज्ञानेश्‍वरीचे वाचन करून घेई. ते वाचताना मला ज्ञानेश्‍वरीची गोडी लागली. दरम्यान आईच्या बरोबरीच्या बायका तिच्याबरोबरच ज्ञानेश्‍वरी ऐकण्यासाठी येऊ लागल्या. नंतर नंतर तर त्या तांदूळ आणि नारळ आणायला लागल्या. माझ्या वडिलांना हे समजल्यावर त्यांनी माझा "बुवा' होऊ नये म्हणून वाचन बंद केले. असे असले तरी ते मला ज्ञानेश्‍वरी वाचू नको असे म्हणाले नाही. त्यांनी बुवाबाजीला शह दिला पण माझे वाचन चालू ठेवले. त्यानंतरच्या काळात मी ज्ञानेश्‍वरी शिकलो, दुसऱ्यांनाही शिकवायला लागलो, नंतर त्यावर ग्रंथही लिहिले. इतकेच नाही तर माझा ज्योतिषाचाही अभ्यास आहे.

ज्योतिष शब्द ऐकल्यावर मला जरा धक्का बसला. मी त्यांना हा काय प्रकार आहे? ते विचारले. यावर ते हसून म्हणाले, मी भविष्य पाहतो, हात पाहतो, माझ्याकडे अनेक कुंडल्या अभ्यासाला आहेत. हे बघ, या समोरच्या मांडणीत सर्वांत खाली ज्या फाइल ठेवल्या आहेत ना, त्या सर्व कुंडल्या आहेत आणि या मांडणीच्या सर्वांत वरच्या कप्प्यात ज्योतिषाची पुस्तके आहेत. तुला आश्‍चर्य वाटेल पण, साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याच्या एक वर्ष आधी मी डोंबिवलीत झालेल्या ज्योतिष संशोधक संमेलनाचा अध्यक्ष होतो. त्यातील माझे भाषण सर्वांना आवडले. मुळात भविष्य वगैरे यावर माझा विश्‍वास नव्हता. माझे वडील बंधू हस्तरेषातज्ज्ञ होते. त्यांच्याशी या विषयावर वाद घालण्यासाठी मी हस्तरेषाशास्त्र शिकलो. त्यानंतरच्या काळात मी मुंबईला "पब्लिसिटी' विभागात नोकरीला असताना माझ्याबरोबर एक सहकारी होते. त्यांनी माझी पत्रिका पाहून काही भविष्य वर्तविले. पुढे ते खरे ठरत गेले. त्यामुळे मीही ज्योतिषाचा अभ्यास करायला लागलो. गेले तीस वर्ष हा अभ्यास मी करतोय. माझ्यामते ज्योतिष विद्या ही भविष्य सांगणारी विद्या नाही, तर तो एक अध्यात्माचा आविष्कार आहे. अध्यात्म मानवजातीचे विश्‍वातील स्थान काय? हे सांगते; तर मानव जातीतील एकेका व्यक्तीचे स्थान काय? हे ज्योतिष सांगते. पण ही गोष्ट आधी सांगितली असती तर लोकांनी माझ्याकडे रांगा लावल्या असत्या. आता मी पंचाहत्तर वर्षांचा आहे, त्यामुळे तुला सांगायला काही हरकत नाही. (ते मिस्कील हसतात.)

मी मात्र एकाच व्यक्तीचे कवी, शिक्षक, समीक्षक आणि ज्योतिषी असे पैलू असू शकतात? याबद्दल मनातल्या मनात आश्‍चर्य करतच त्यांचा निरोप घेतो.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट