कॉलेज तरुणाईही गावठी दारूच्या विळख्यात

तपोवन परिसरात रस्त्यावरच असलेल्या एका घरात घसून एका 50 वर्षीय दारूड्याने अल्पवयीन मुलीची छेड काढली. त्या मुलीच्या वडीलांनी त्या इसमाला रस्त्यावरच चोप दिला तेव्हा इतरांना खरा प्रकार समजला....

सरकारी खात्यात काम करीत असलेल्या येथीलच एका इसमाला वाघाडी परिसरातील गावठी दारूचे व्यसन लागले आणि ऐन पंचेचाळीशीतच दारूमुळे त्याला कुटुंबाला उघड्यावर सोडून जगाचा निरोप घ्यावा लागला.

अनेकांचे संसार उध्वस्त करणाऱ्या अशा दुर्घटना केवळ पंचवटीतच नाही, शहरातील बऱ्याच भागात घडत असून त्याला कारणीभूत आहे वाघाडी परिसरात खुलेआम होत असलेली गावठी दारूची विक्री ! याठिकाणी उसाच्या गुऱ्हाळाप्रमाणे गावठी दारूचे अनेक अड्डे असून भल्या पहाटेपासूनच तेथे राजरोसपणे दारू विक्रीला सुरवात होते.


जुना आडगांव नाक्‍यावरून निमाणी बस स्टॅंडकडे जाताना वाघाडी नाल्यावर एक पूल लागतो. या पूलावरून उजव्या हाताच्या पायऱ्यांनी खाली असलेल्या वसाहतीत शिरले की समोर जे दृश्‍य दिसत, ते पाहून कुणीही चांगला माणूस चक्रावतो. पायऱ्या संपल्या की नाल्याच्या कडेलाच अनेक दारूडे अस्ताव्यस्त पडलेले दिसतात. बाजूलाच काही हातगाड्यांवर अंडी, भेळ अशा पदार्थांची विक्री सुरू असते. तिथेही काही दारूडे खरेदीसाठी उभे असतात. सायंकाळी तर या गर्दीत आणि पिऊन पडलेल्या माणसांच्या संख्येत बरीच वाढ झालेली असते. मध्येच एका अति-प्यायलेल्या माणसाला दोन जण कचऱ्याचे पोते फेकावे तसे पायऱ्यांजवळच्या कोपऱ्यात फेकत असतात. जवळच एक चांगले कपडे घातलेला, पर चेहऱ्यावर रगेलपणाचे भाव असलेला इसम त्या दोघांना फेकण्यासंदर्भात सूचना करत असतो, "दूर टाका त्याला, इथे टाकले तर त्रास देईल.'
महापालिकेने या भागात सिमेंटचे पक्के रस्ते, नाल्याला जाळ्या बांधलेल्या असल्यामुळे नवख्या माणसाला येथे दारूचे अनेक अड्डे असतील याचा अंदाज बांधणे कठीण जाते. मात्र येथील काही झकपक दिसणाऱ्या घरांच्या शेजारच्या बोळातून आत घुसले की दारूच्या अड्ड्याचे "टिपीकल' दर्शन होते.

एका पत्र्याच्या शेडमध्ये जमिनीवरच अस्ताव्यस्त कपडे घालून, पुढ्यात प्लॅस्टिकचा मग घेऊन काही जण बसलेले असतात. त्यातील काहींचे पिणे सुरू असते. तर काही मटकी वगैरे खात असतात. आतून एक प्रौढ बाई त्यांना या पदार्थांचा पुरवठा करत असते. शेजारीच असलेल्या भिंतीशी 20 ते 25 लिटर क्षमतेचे पाच ते सहा ड्रम गावठी दारूने भरलेले असतात. एका पत्र्याच्या खुर्चीवर बसलेला शेठ "मग्ग्या'च्या हिशेबाने गावठी दारूची विक्री सुरू असते. पार्सल सेवाही इथे पुरवली जाते. 16 ते 18 रुपये दराने एक मग्गा (सुमारे अर्धा लिटर) गावठी दारू विकली जाते. शौकिनांना सोडाही विकला जातो. याच पद्धतीचे पाच ते सहा अड्डे येथे खुले आम सुरू असतात.

आपण दोन मग्ग्यांची मागणी करतो. प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये व्यवस्थित दारू पार्सलमधून दिली जाते. पार्सलला फुगा असे म्हणताता. "भाऊ तू कुठल्या कॉलेजचा? इथे बाजूच्या अनेक कॉलेजची पोरं येतात नेहमी'' पार्सल देणारा शेठ माहिती पुरवतो. ""पोलिसांचं काही टेंशन असलं, इतर काही प्रॉब्लेम असला तर बिनधास्त सांग, आपण कधीही मदत करू'' असे आश्‍वासन देत गिऱ्हाईक पटविण्याचा प्रयत्न करतो. आपण "फुग्यां'चे पार्सल घेऊन निघतो, तेव्हा दारात अनेक दारूडे अस्ताव्यस्त झिंगत पडलेले दिसतात.

वाघाडी नाल्यातील हातभट्टीची गावठी दारू तयार करण्याचा हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून रासरोसपणे सुरू असल्याची माहिती येथील रहिवाशी पुरवतात. पहाटेपासून रात्रीपर्यंत येथे दारूची विक्री चालते, तर रात्री उशीरा आणि पहाटे दारू गाळपाचा कार्यक्रम चालतो. विशेष म्हणजे या व्यवसायात राजकारण्यांसह अनेक बड्या मंडळींचा हात गुंतलेला असल्याची दबकी चर्चा येथील नागरिक करतात. अनेक वेळा हा प्रश्‍नही चव्हाट्यावर येतो, पण त्याकडे दुर्लक्षच करण्याचे सोयीस्कर धोरण राजकारण्यांसह प्रशासनही राबवित असल्याने, गावठी दारूचा हा व्यवसाय आता अनेकांनी रोजीरोटीचे साधनच केला असल्याचे चित्र आहे.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट