मी बाप

आज बर्‍याच दिवसांनी लिहितोय. दिवस कसले वर्षच झाले म्हणा ना. गाववाल्याचा ब्लॊग या नावाने सुरवात करण्याचे कारण म्हणजे माझे बालपण आणि संपूर्ण शालेय जीवन खेड्यांमध्ये गेलेले. काही खेडी अशी की दवाखानेही तिथे नव्हते. तर काही ठिकाणी पाण्याचे प्रश्न ! शहर आणि शहरी जीवन माझ्यासाठी स्वप्न होते. आज ग्रामीण भाग सोडून तब्बल २० वर्षे झाली असतील. पण मनातुन आणि कधी कधी वागण्यातूनही गावाच्या आठवणी काही केल्या पुसत नाहीत. किंबहुना त्या माझ्या जगण्याचाच एक भाग बनल्या आहेत. त्यामुळेच ब्लॉगवर लिहिताना गावाचे संदर्भ येत गेले.


शिक्षण आणि नंतर नोकरी यामुळे नाशिक, पुणे आणि आता औरंगाबाद असा गेल्या २० वर्षातला प्रवास. तसा अगदीच वाईट नव्हता तो. पण आज मात्र या सर्व गोष्टींची प्रकर्षाने आठवण येतेय. कारणही तसंच घड्लय. कामावरुन घरी आलो, तेव्हा बायकोची तब्येत बर्‍यापैकी बिघडली होती. कालपासूनच ती ठिक नव्हती. स्वयंपाकिनबाई आमचा स्वयंपाक करून गेल्या, प्रश्न होता तो आमच्या सव्वा वर्षाच्या मुलीचा. अर्थात मी जरा आळस झट्कून साधी खिचडी बनवायला घेतली. तयारी झाली, फोडणीत साखर टाकायला गेलो, तर काय? संपलेली. घरात साखरच नव्हती. तशीच खिचडी केली. थोडी शंका आली म्हणून पिठाचा डबा बघितला, तर तोही रिकामाच. गेल्या आठ दिवसांपासुन ही स्थिती आहे. विकत आणायला जवळ पैसे कुठे? बँकेतही खड्खडात. कारण पगार जमाच झाले नाही. मी खुप गरिब आहे. पगार कमी आहे, हा काही प्रश्नच नाही. पण खर्चच तसा झाला या महिन्यात ३० ते ३५ हजारांचा. यात एकही पैसा वायफळ गेला नव्हता. लग्नानंतरच्या गेल्या ७ वर्षात अशी स्थिती आली नव्हती. विशेष म्हणजे तेव्हा आम्हाला दोघांना मिळूनही १० हजार पगार नव्हता,  पण पुण्यासारख्या ठिकाणीही मजेत चालले होते. महिनाअखेर आली तरी जाणवायची नाही. मग आजच असे का व्हावे. आज मी खूप हतबल समजतोय स्वताला. माझ्यातला बाप तर मनात ढ्साढ्सा रडला. सगळं चांगलं असुनही हे का घडावं? बचत केली असती तर.. पगार वेळेवर झाला असता तर... अनेक प्रश्न तयार झाले. एका बापाची घालमेल काय असते त्याचा अनुभव आला.

या सगळ्या प्रकारामुळे नकळत गावाकडचे दिवस आठवले. नववीत होतो तेव्हा. वडील शिक्षक. २ हजारही पगार नव्हता. त्यात आमची भविष्याची तळमळ म्हणून नाशिकला फ़्ल्याट घेतला. कर्ज काढावे लागले. महिन्याला १५०० रुपये कर्जाचा हप्ता. त्यामुळे पगार कमी यायचा वडिलांना. काट्कसर सुरु झाली. शेजार्‍यांचे रेशन कार्ड जमवून रेशनचे धान्य सुरू झाले. पगार झाल्यावर किराणा भरण्याची पद्धत होती. महिनाअखेर खूप कडक असायची. तेल, तूप, साखरेसह अनेक पदार्थ संपलेले. आणायचे तर पगाराची वाट बघावी लागे. शाळेतून आल्यावर भूक लागलेली असे. सकाळच्या पोळ्या असत. काळा मसाला आणि त्यात तेल-मीठ टाकून खात असू. हा मेन्यू फ़ारच गोड लागे. (आजही आठवण आल्यावर मी हा प्रकार आवर्जून खातो) कधी तेल संपलेले असे, तेव्हा कांद्याच्या फोडींवर मसाला-मीठ टाकून खात असू.  आई मग तेलाऐवजी पाण्यालाच फ़ोडणी देऊन वेळ निभावून नेई. पैसे नसल्याने कधी कधी उधारीवर वस्तू आणाव्या लागत. वडीलांच्या मानी स्वभावाला उधारी मान्य नसे. त्यामुळे आमच्या दाराशी आजवर कुणी पैसे मागायला आलेले नाही. कारण त्याआधीच प्रत्येकाचे बिल अदा होई. (हा स्वभाव माझाही आहे. त्यामुळे माझाही दारात कुणी थकलेले पैसे मागायला आलेले नाही.) एकदा साखर संपली. तेव्हा समोरच्या दुकानात गेलो. पण साखर असूनही त्याने साखर संपली असे सांगितले. त्याला उधार द्यायचे नव्हते. फ़ार राग आला, वाईटही वाटले.... असा प्रसंग पुन्हा आला नाही, अनेक यातना सोसून वडीलांनी तो येऊ दिला नाही. पण या सगळ्यात त्यांची घालमेल मला तेव्हाही जाणवत होती. आज तर ती प्रकर्षाने जाणवली. कारण आता मीही संसारी झालोय. बाप झालोय आणि म्हणूनच तर मला आजच्या प्रसंगाने हेलावून सोडले.


....पण हेलावून चालणार नव्हते. कारण माझ्या सव्वा वर्षाच्या मुलीला भूक लागल्यावर, पगार झाला नाही, असे सांगणार का? खिसे चापसले,  बरीच चिल्लर होती.  ३० रुपये भरली. पाकिटात १० आणि २० च्या नोटा होत्या. एकूण ६० रुपये झाले. कारच्या ड्याशबोर्ड जवळ १५ रु सापडले. एक. जुने एटीएम कार्ड होते. त्यातून १०० रुपये मिळाले. त्यात दोन किलो पीठ, दोन किलो साखर, १ किलो पोहे आणि मुलीला खाऊ म्हणून १० रुपयांचा बिस्किटचा पुडा, इतके पदार्थ विकत मिळाले. थोडे पैसे उरलेही. रोजंदारीवरचे लोक रोज अशाच पद्धतीने खर्च करतात. आज मला तोही अनुभव आला.

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
Prakash Ji,
:( :(
kalaji karu naka. He hi divas jatil.

Kalaji ghya.
Shilpa Datar म्हणाले…
To hindolemanache
Thaks for your comment

लोकप्रिय पोस्ट