बुट चोरीच्या एफआयआरची खरी गोष्ट

नवा बुट चोरीला गेल्याची घटना माझ्या मनाला खूप लागली. त्यामुळे मी थेट पोलिस स्टेशन गाठून बुट चोराला पकडण्याबद्दल तक्रार दिली. त्यांनी तक्रार नोदंविली खरी, पण नंतर मला अनेक भन्नाट गोष्टींचा सामना करावा लागला...

गोष्ट अगदी खरी आहे. मागच्या दिवाळीत (२०१२) घडलेली. तर झालं असं शुक्रवार ९ नोव्हेंबर २०१२ ची रात्र होती. आमच्या दोन वर्षांच्या मुलीने रात्री अकराच्या सुमारास रडून रडून घर डोक्यावर घेतलं होतं. हिचं काहीतरी बिघडलं असणार म्हणून तातडीने आम्ही तिला जवळच्याच हॉस्पिटलमध्ये नेलं. काळजीसारखं नसल्याचं डॉक्टर म्हणाले. त्यामुळे काळजीमुक्त होऊन परतलो तेव्हा रात्रीचे बारा वाजून गेले होते. डोळ्यावर बर्‍यापैकी झोप होती. गाडी पार्किंगचे सोपस्कार पटकन उरकून पायातला बुट तसाच बाहेरच्या गॅलरीत काढून मी घरात आलो.

दुसर्‍या दिवशी सकाळी ८ च्या सुमारास उठलो. बाहेरच्या खुल्या गॅलरीत पेपर आणि दूध येऊन पडलेले असते. ते घेण्यासाठी दरवाजा उघडला. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली. माझा बुटाचा जोड जागेवर नव्हता. घरात असेल म्हणून शोधले. पण तिथेही तो नव्हता. घराच्या आजूबाजूला शोधले, झाडू मारणार्‍याला, गाडी धुणार्‍याला विचारले, कुठे पडला असेल, तर दिसला का म्हणून? पण त्यांनीही नकारार्थी मान हरवली. हे सर्व करण्यात तासभर गेला. बुट काही सापडत नव्हता. तेव्हा एक गोष्ट कळून चुकली. त्याची चोरी झालेली असावी. होय चोरीच होती ती. दीडच महिन्यापूर्वी मी १८०० रुपयांना विकत घेतलेल्या नव्या कोर्‍या आणि महागड्या बुटाची चोरी झाली. माझे नुकसान झाले होते.

मी एकदम सुन्न झालो. आयुष्यात पहिल्यांदाच इतका महागडा बुट मी विकत घेतला होता किंवा विकत घेऊ शकलो म्हणा फार तर. लहानपणी शेतकरी संघटनेच्या एका मोठ्या सभेला गेलो होतो. तिथल्या गडबडीत वडिलांनी घेऊन दिलेली नवी कोरी चप्पल हरवली. हे समजल्यावर तुला पुन्हा चप्पल बुट घेऊन देणार नाही अशी वडिलांनी प्रतिज्ञा केली आणि आयुष्यभर पाळली. त्यामुळे पुढे कॉलेजला असतानाही ५० ते १०० रुपये किंमतीचे प्लॅटिकचे बुट वापरायचो. ते चामड्याचे दिसावेत म्हणून चमक येण्यासाठी त्यांना खोबरेल तेल चोपडायचो. त्यामुळेच की काय? नोकरीला लागल्यानंतरही फार महागडे बुट विकत घेण्याची हिंमत झाली नव्हती. जास्तीत जास्त ४०० ते ५०० रुपयांपर्यंतचे ते असायचे. पण मागच्या वर्षी थोडेफार पैसे शिल्लक होते. त्यातच औरंगाबाद येथील प्रोझोनमॉलमध्ये सहकुटुंब फिरायला जाणे घडले. पायातला जुना बुट बर्‍यापैकी झिजला होता. नवीन घेणे आवश्यक होते. बायकोच्या आग्रहास्तव एका चकचकीत बुटाच्या दुकानात गेलो. डिस्काऊंट मिळेलअशी पाटी तिथे लावलेली होती. दुकानाचे नाव होते इंक ५’ (मी ते इंच ५असे वाचले होते.) त्याने विविध बुटजोड्या दाखवल्यात. त्यातली सर्वात कमी किंमतीची बुटजोडी होती केवळ १८०० रुपयांची. खूप वेळ विचार करून ती घेतली. घरी आणली. मात्र एवढे पैसे बुटावर घालविल्यामुळे पुढे १५ दिवस मन खात राहिले. एवढा महागडा बुट वापरण्याचा प्रश्‍नच नव्हता. म्हणून तो महिनाभर कपाटात जपून ठेवला होता. दरम्यानच्या काळात एक दोन मित्र- जवळचे नातेवाईक घरी आले, तेव्हा त्यांना कपाटातील नवा कोरा बुट कौतुकाने दाखवला होता. पण पायात काही घातला नाही. नंतर कधी तरी एक दोन वेळा बुट घालून ऑफिसला गेलो. त्याचदरम्यान रात्री हॉस्पिटलमध्ये जावे लागले आणि परतल्यावर बुट गॅलरीत ठेवला आणि नेमक तोच चोरीला गेला. गंमत म्हणजे बुटाबरोबर मोजेही होते. पण चोराने ते काढून बाजूला ठेवले आणि बुट मात्र पळवला.

चोरीनंतर बुटखरेदीची ही पार्श्‍वभूमी आठवली आणि अधिकच अस्वस्थ झालो. त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे माझ्या आयुष्यातील ही पहिलीच चोरी होती. तिचा चांगलाच धक्का बसला होता. त्यातही आयुष्यातील पहिला महागडा बुट चोरीला जाण्याची गोष्ट माझ्या पचनी पडत नव्हती. दुसरे कारण हे की, चोर माझ्या दाराशी येऊन गेला होता. तो जर घरात आला असता आणि आणखी काही पळवले असते तर? सुरक्षेच्या दृष्टीने ही सुद्धा महत्त्वाची बाब होती. विचार करून डोके फुटायची वेळ आली. दुसरीकडे ऑफिसला जाण्याची वेळ झाली होती. मी कसाबसा तयार होऊन ऑफिसला जायला निघालो. पण बुट चोरीची गोष्ट मनाला प्रचंड लागली असल्याने आणि चोर माझ्या घरापर्यंत आला असल्याने मी शेवटी झाल्या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदविण्याचा निर्णय घेतला. एक कागद घेऊन त्यावर पुढील प्रमाणे तक्रार अर्ज केला.
----

प्रति,
मा. पोलिस निरीक्षक,
उस्मानपुरा पोलिस ठाणे,
औरंगाबाद

विषय : चोरांचा सुळसुळात आणि बंदोबस्ताबाबत
महोदय,
मी अमूक अमूक या परिसरात राहत असून दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर आमच्या भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. माझ्याही घरी काल रात्री साडेबारा ते सकाळी ८ च्या दरम्यान चोरी झाली आहे. माझा नवा कोरा इंच ५ कंपनीचा महागडा १८०० रुपये किंमतीचा बुट चोरट्यांनी घराच्या गॅलरीतून चोरीला नेला. बुटाचा रंग काळा असून आधुनिक फॅशनचा आहे. बुटचोरीमुळे माझे नुकसान झाले आहे. तरीही मेहरबान साहेबांनी या प्रकरणी लक्ष घालून बुटचोरीचा तपास करावा. शिवाय आमच्या भागातील चोरीच्या घटनांचीही गंभीर दखल घेऊन कायवाई करावी. ही नम्र विनंती. कळावे.

आपला नम्र,

दिनांक: १० नोव्हेंबर १२
ठिकाण : औरंगाबाद.
-------
वरील प्रमाणे अर्ज घेऊन मी थेट पोलिस स्टेशन गाठले. मात्र त्याआधी अर्जाच्या चांगल्या दोनचार छायाप्रती (झेरॉक्स) काढल्या. झेरॉक्स काढणारा म्हातारा माझ्याकडे उगीचच विचित्र पद्धतीने बघत असल्याचा मला भास झाला. पण मी पर्वा केली नाही. शेवटी नुकसान माझे झाले होते, त्याला बघायला काय लागते. एका बंद पडलेल्या कार्पोरेट ऑफिसमध्ये भाडेतत्त्वावर हे पोलिस स्टेशन थाटले होते. त्यामुळे तेथील वातावरण एरवीच्या पोलिस स्टेशनसारखे नव्हते. जरा सुसह्य होते. प्रत्येक कर्मचार्‍याला एक कॅबीनेट होते. मला तर एखाद्या कॉलसेंटर मध्येच आल्याचा भास झाला. ते पाहण्यात दंग असतानाच रिशेप्शन टेबलवर बसलेल्या दोन पोलिसांपैकी एका ज्येष्ठ पोलिस कर्मचार्‍याने विचारले, बोला काय काम? ‘मला 

चोरीची तक्रार द्यायची आहे’, मी संकोचत म्हणालो.
या, बसा,’अगदी आदबीने ते पोलिस गृहस्थ म्हणाले.

मग मी त्यांना तक्रार अर्ज दाखवला, थोडक्यात बुट चोरी आणि माझे झालेले नुकसान याबद्दल माहिती दिली. मी बोलत असताना हा माणूस हसायचा प्रयत्न करतोय, पण चेहर्‍यावर गंभीर भाव आणतोय, असे मला उगाचच वाटू लागले. त्यामुळे माझ्यावर एकदम दडपण आले. पण त्यांनी माझा तक्रार अर्ज घेतला. त्यावर शिक्का आणि सही मारून पोहोच दिली. त्यांच्या जवळच्या स्टेशन डायरीत नोंद केली. माझा पत्ता आणि फोन क्रमांक नोंदवून घेतला. तुमच्या भागात गस्त वाढवू असे सुहास्य वदनाने आश्‍वासनही दिले. त्यांची ती वागणूक बघून माझ्यावरचे दडपण दूर झाले. एकंदरीत मला त्यांचा चांगला अनुभव आला होता. मग मीही पोलिस स्टेशनची रचना किती चांगली आणि वेगळी असल्याचे स्तुतिपर बोललो आणि मनातल्या मनात हवेत उड्या मारत ऑफिसला पोचलो.

मी ऑफिसमध्ये असतानाच सायंकाळी सहाच्या सुमारास मला पोलिस स्टेशनमधून एक फोन आला. सकाळचीच व्यक्ती बोलत असावी. 
आमच्या साहेबांना तुम्हाला भेटायचेय, तेव्हा पोलिस स्टेशनला या’. त्यांचा आवाजात सकाळी दाखविलेले सौजन्य नव्हते. त्यामुळे मी चरकलो. पण तसे न दाखवता तिथे जाण्याचे त्यांना आश्‍वासन दिले आणि दहाच मिनिटांत पोलिस स्टेशनला पोहोचलो. तेव्हा सायंकाळी साडेसहा वाजले होते. पोलिस स्टेशन आता पोलिस कर्मचार्‍यांनी बर्‍यापैकी गजबजले होते. सकाळचेच गृहस्थ अजूनही ड्यूटीवर होते. जरा त्रस्त आणि चिडलेले वाटले.

साहेब येतील, बसा म्हणाले. मी बसलो. केवढ्याचा होता तुमचा बुट? काही लाखांचा होता ना?...’ त्यांच्याच्याने बोलवेना. बहुदा राग अनावर झाला असावा. कारण बोलत असतानाच डोळे लाल झाले असावेत. मी मनातून चरकलो आणि टरकलोही. पण तीही संयम आणि हिंमत ठेवत म्हणालो, १८०० रुपयांचा होता, साहेब. अर्जात मी तसं लिहिलंयत्यानंतरही ते काहीतरी बोलले, ते आता आठवत नाही. पण चिडलेले होते, हे नक्की. एकवेळ अशी आली की आता हा भाऊ आपल्याला हाणतो की काय असेही मला वाटलं. कुठे काम करता तुम्ही? त्यांच्या प्रश्‍नांची सरबत्ती पुन्हा सुरू. आता जास्त ताणणे योग्य नाही म्हणून मग मीही जोर लावून म्हणालो, ‘पत्रकार आहे मी. एका साप्ताहिकाचा सहसंपादक आहे.  मागच्याच आठवड्यात तुमच्या कमिशनर साहेबांनी आवाहन केले होते. नागरिकांनी न घाबरता तक्रारी नोंदवाव्या. म्हणून चोरीची तक्रार मी नोंदविली. पण तुमचा अनुभव मात्र चांगला आला हं आपल्याला...असे म्हणून मी त्यांच्या हातात आमचा ताजा अंक आणि माझे कार्ड ठेवले. त्यानंतर मात्र हे गृहस्थ एकदम नॉर्मलला आले, पुन्हा सौजन्याने बोलू लागले. पाणी वगैरे देऊ का म्हणाले. मीही उगाच काही बोललो नाही. शक्य तो शांतपणे त्यांच्याशी बोलत राहिलो.

 एव्हना आमच्या टेबलजवळ रात्रीच्या ड्युटीवर आलेल्या पोलिस कर्मचार्‍यांची बर्‍यापैकी गर्दी जमली होती. समोर बसलेले ठाणे अंमलदार साहेबांनी त्यापैकी अनेकांशी माझी ओळख करून दिली. (बहुतेक बुटचोरीची तक्रार आणि त्याबद्दलची माहिती सगळ्यांपर्यंत पोचली असावी. त्यामुळे कोण तो विचित्र माणूस? म्हणून सर्वांना उत्सुकता असावी.) मीही हसत सगळ्यांची हस्तांदोलन करत राहिलो.

इतक्यात दारावर एकदम गडबड झाली. सर्व माझ्यासमोरचे आणि माझ्या बाजूचे पोलिस कर्मचारी एकदम उभे राहिले. त्यांनी कडक सॅल्यूट ठोकला. कारण पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ठाण्यात प्रवेशले होते. नकळतच मी ही उभा राहिलो. मग पुन्हा मघाच्या कर्मचार्‍याने (ठाणे अंमलदार) मोठ्या अदबीने साहेबांना माझी ओळख करून दिली. पत्रकार आहेत हेही सांगितलं. एव्हाना मीही दडपणातून मोकळा झालो होतो. त्यामुळे मी थेट त्यांना म्हणालो, ‘बुट चोरीची तक्रार नोंदविणारा मीच तो विचित्र माणूस. तुम्हाला विचित्र वाटत असेल ना की मी असे का केले?’ माझ्या प्रश्‍नावर साहेब गडबडले. थोडे रागावल्याचे त्यांच्या चर्येवरून दिसत होते. पण वरवर त्यांनी तसे दाखविले नाही. मग त्यांनी मला त्यांच्या दालनात बोलावले आणि बंद दरवाज्याआड आमची चर्चा सुरू झाली. मी माझी ओळख करून दिली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकारितेत आदराने नाव घेतले जाण्याचा समृद्ध वारसा लाभलेल्या परंपरेतील माझे संपादक असल्याचे त्यांना सांगितले. हे नावच इतके मोठे आणि आदरणीय आहे, की साहेब एकदम नॉर्मलला आले.

मग मी त्यांना सविस्तर समजावून सांगितले, ‘बुट चोरी झाली असली, तरी माझ्या दृष्टीने नुकसान झाले आहे आणि तुमच्या दृष्टीने क्षुल्लक घटना असली तरी अनेक लोक असे आहेत, की ज्यांना रुपयासुद्धा मोलाचा असतो. त्यामुळे चोरी लाखाची असो किंवा दोन हजाराच्या बुटाची, चोरी ती चोरीच. शिवाय चोर माझ्या घरापर्यंत आला, ही गोष्ट गंभीर आहे.इत्यादी गोष्टी त्यांना सांगितल्या. 

दरम्यानच्या काळात त्यांनी चहा वगैरे मागवला. मी एवढं पोटतिडकीने सांगूनही त्यांना तसे पटलेले दिसत नव्हते.  मग मी त्यांना माझ्यासाठी महागडा बुट विकत घेणे किती अप्रुपाची गोष्ट होती. ते पोटतिडकीने समजावून दिले. तेव्हा ते पुन्हा उपरोधिकपणे बोलले, ‘ मग तक्रार अर्ज कशाला देता? आपण थेट एफआयआरच नोंदवू. नाही तुम्ही नोदंवाच एफआयआर.त्यांच्या बोलण्याचे मी सटपटलो. पण नंतर धीर धरून म्हणालो, ‘ठिक आहे तर मग, नोंदवाच एफआयआर’. एकंदर आमचा चांगलाच संवाद झाला आणि एकमेकांच्या व्हिजिटिंग कार्डची देवाणघेवाण करून मी त्यांचा निरोप घेतला. ते स्वत: 
दालनाबाहेर आले आणि माझी बुटचोरीची एफआयआर नोंदविण्याबद्दल मघाच्याच ठाणे अंमलदारांना सूचना केली.

त्यानंतर ठाणे अंमलदारांनी एफआयआर नोदंणीचा फार्म माझ्याकडे दिला. प्राथमिक माहिती भरून दिल्यावर मग त्यांनी पुन्हा कधी चोरी झाली? कसा होता बुट? किती नुकसान? वगैरे गोष्टी सराईतपणे त्यात नोंदविल्या. त्यावर कायद्याप्रमाणे गुन्ह्याचा प्रकार आणि कलमे टाकली. हे सर्व होईपर्यंत रात्रीचे साडेआठ वाजले होते. मी घरी का आलो नाही म्हणून बायकोचे फोन सुरू झाले होते. मी पोलिस स्टेशनला आल्याचे सांगितल्यावर ती आणखी काळजीत पडली. दरम्यान एफआयआर लिहून पूर्ण झाला आणि प्रोसिजरप्रमाणेत्या गृहस्थांनी मला तो मोठ्याने वाचून दाखविला. त्यावर वेळ वगैरे टाकून माझी सही घेतली. त्यांनीही सही केली आणि अखेर रात्री पावणेनऊच्या सुमारास माझ्या तक्रारीची एफआयआरची प्रत माझ्या हातात पडली. तेव्हा मला किती आनंद झाला म्हणून सांगू. खरे तर गेले दोन दिवस मीही सर्दी आणि फ्ल्यूने आजारी होतो. शनिवारी तर जास्तच त्रास होत होता. पोलिस स्टेशनमध्ये गेलो तेव्हा माझ्या अंगात बर्‍यापैकी ताप होता. त्यामुळे मी गाडी काढली आणि थेट जवळच्याच रस्त्यावर असलेल्या डॉक्टरांच्या दवाखान्यापुढे पार्क केली. त्यांनी तपासले तेव्हा तापाने शंभरी ओलांडली होती. त्यांच्या चिठ्ठीप्रमाणे औषधे घेऊन घरी पोचलो तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. सकाळी दहा ते रात्री दहा असे बारा तास मी बुटचोरीच्याच विचारात आणि प्रक्रियेत वावरलो होतो. हा प्रकार बायकोला सांगितल्यावर तिने नाराजी व्यक्त केली. मी उगाचच रिकामे उद्योग करतो असे तिचे म्हणणेे होते. पोलिस स्टेशन ऐवजी डॉक्टरकडे का नाही गेला? असेही तिने झापले. मी तिचे बोलणे ऐकून घेतले. कारण फ्ल्यूने मला पूर्णपणे वेढले होते. माझ्यात काहीच करण्याची ताकद नव्हती. जेवणानंतर गोळ्या औषधे घेऊन मी झोपलो.

सकाळी आठच्या सुमारास बायकोचा ओरडण्याचा आवाज आला, ‘शीऽऽऽ तू अगदी वेडा आहेस, हे पाहिलं का काय झालंय ते? ऊठ पटकन.डोळे चोळत मी ऊठलो तसा तिने माझ्या हातात पेपर कोंबला. त्यातील औरंगाबाद पुरवणीच्या पहिल्या पानावर चौकटीत बातमी होती, ‘बुट चोरीप्रकरणी पोलिसांत तक्रार’. माझ्या बुटचोरीबद्दल त्यात सविस्तर छापले होते. वर स्वतंत्र चौकटीत या तरुणाला पोलिसांचा चांगला अनुभव आला वगैरेही लिहिले होते. त्यात कळस म्हणजे या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक करणार असल्याचेही खोडसाळपणे ठोकून देण्यात आले होते. ती बातमी वाचून हसावे की रडावे तेच कळेना. त्यानंतर सकाळची आन्हिके उरकल्यावर मी जवळच्या पेपर स्टॉलवर पोचलो.  असतील नसतील ते सर्व वर्तमानपत्रे विकत घेतली. घरी आल्यानंतर एक एक उलगडून पाहू लागलो. जवळपास तीन-चार वर्तमानपत्रांत बुट चोरीची तिखट-मसाला लावून रंगवून लिहिलेली बातमी छापलेली होती.  एकाने तर फारच गंमत केली होती. चक्क बुट आणि चोराचे कार्टून बातमीत टाकले आणि बातमीचा मथळा होता,‘ नवा कोरा बुट चोरून चोराची दिवाळीएकंदरीत माझ्या बुटचोरी मुळे मला मनस्ताप झाला असला तरी दोघांना खुपच लाभ झालेला दिसत होता. त्यापैकी एक होता. बुट चोरणारा चोर आणि दुसरे होते सनसनाटी आणि रंजक बातम्या छापणारे पेपरवाले. हे सर्व होत असताना बातम्या वाचून ओळखीचे एक दोन फोनही येऊन गेलेत. त्यापैकी एक आमच्या संपादकांचा होता. बरे केले तक्रार नोंदविली असे ते गंभीरपणे बोलत होते.

खरे तर हा रविवारचा निवांत दिवस पण बुटचोरी प्रकरणात तोही संपल्यातच जमा होता. दुसरीकडे तब्येत अजूनही ठिक नव्हती. मग जेवणानंतर औषधे घेऊन मी पुन्हा झोपून राहिलो. त्याला तास-दोन तास उलटले असावेत. दुपारी साडेतीनच्या सुमारास फोन वाजला. पोलिस स्टेशनमधूनच होता. एक सदगृहस्थ तुमच्या घराचा पत्ता सांगा, अशी वैतागलेली विनवणी करत होते. मी झोपेतच  त्यांना पत्ता सांगितला आणि पुन्हा झोपलो. जरा कुठे डोळा लागतोय तोच दरवाजा खडखडला. इच्छा नसताना उठावे लागले आणि दरवाजा उघडला. तर दारात साक्षात एक पोलिस जमादार उभे. सोज्वळ चेहर्‍याचे, हातात डायरी असलेले. त्यांना बसायला सांगून झोप घालविण्यासाठी मी तोंडावर पाणी मारून आलो. आमच्या आवाजाने पलिकडच्या खोलीत झोपलेली बायको आणि मुलगीही जागी झाली. तिने त्या गृहस्थांना पाणी वगैरे दिले. खरे तर मला चहाची आवश्यकता होती. पण ड्युटीवर असताना चहा घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. मग बरे दिसणार नाही म्हणून आम्हीही चहा टाळला. का येणे केले? असे मी विचारले. काल चोरी झाली ना तुमच्याकडे, त्याबद्दल पंचनामा करायचा आहे, असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी डायरी काढली आणि माझ्यावर पुन्हा प्रश्‍नांची सरबत्ती सुरू केली.

कधी झाली चोरी? कसा होता बुट? तुम्हाला कधी कळले? किती रुपयांचा होता? तुमचा कुणावर संशय आहे का? यापूर्वी कुणाशी काही भांडण वगैरे झाले होते का? बिल्डिंगमध्ये कोण कोण राहतात? वाचमन नाही का तुमच्याकडे.. इत्यादी अनेक प्रश्‍न त्यांनी विचारले. माझ्याकडे बुटाचे रिकामे खोके होते. ते मी त्यांना दाखविले आणि या कंपनीचा बुट होता असे सांगितले.  त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पंचनाम्याला सुरुवात केली. मी आणि बायको दोघांच्या साक्षीने. सर्वप्रथम ज्या गॅलरीतून चोरी झाली. तिची त्यांनी पाहणी केली. तिला पायर्‍या होत्या आणि तिथून चोर आला असावा. (आमचे घर तळमजल्यावर आहे.) असा तर्क लावला. मग त्यांनी इमारतीच्या चतु:सीमा विचारल्या. पूर्वेकडे कोण राहते? उत्तरेकडे कोण? इत्यादी. पूर्वेकडे एक डेप्युटी कलेक्टर राहतात. उत्तरेकडे एका पंजाबी गृहस्थांचा बंगला आहे. पश्‍चिमेकडे दुसरी एक सोसायटी आहे आणि दक्षिणेकडे महापालिकेचे उद्यान आणि त्याच्या पलिकडे हायकोर्टाचे एक जज्जसाहेब राहतात, अशी माहिती मी त्यांना दिली. मग त्यांनी इमारातीची पाहणी केली. इमारतीचे तळघर बघितले. तिथे जाऊन आले. त्यानंतर आमच्या आजूबाजूला एक चक्कर मारून त्यांना हव्या असलेल्या खुणा आणि त्याच्या नोंदी केल्या. अखेर तासाभरानंतर पंचनामा तयार झाला. दरम्यान ते बाहेर पाहणीसाठी गेले असताना बायकोने केलेला चहा मी गुपचूप पिऊन घेतला. सर्व झाल्यानंतर ते पुन्हा आले आणि म्हणाले,‘पंचनाम्यासाठी पंच हवेत’.
मी म्हणालो,‘‘ आम्ही दोघे आहोत. त्यावर भागवा.’’
ते म्हणाले, ‘तुमच्या बायकोची सही चालेल, तुमची चालणार नाही. आणखी दोघे पाहिजेत. शेजार्‍यांना बोलवा
आम्ही नवीन आहोत, आमच्या फार ओळखी नाहीत. शेजारही तसे सहकार्य करणारे नाहीत. पोलिस पाहिल्यावर तर ते अजिबात मदत करणार नाहीत’, मी म्हणालो.
मग मला एक कल्पना सुचली. आमच्या दिवाळी अंकाच्या पार्सलचे काम ऑफिसात सुरू होते. सहा-सात कर्मचारी होते तिथे. त्यांना फोन लावून दोघा तिघांना बोलावले. पोलिस आले आहे, असे फोनवर सांगितल्याने आमच्या ऑफिस सहायकाला काळजी वाटली आणि दहाच मिनिटांत दोन कर्मचार्‍यांना घेऊन ते हजर झाले.
मला काळजीने म्हणाले, ‘साहेब काय झाले? पोलिस कशासाठी.
काही नाही काल चोरी झाली ना आमच्याकडे, त्याचा पंचनामा करतायत पोलिस’ , मी उत्तरलो.
काय चोरीला गेलं....त्यांचा प्रश्‍न. चेहर्‍यावर आणखी काळजी.
माझा बुट’, माझे थंड उत्तर.
यावर काय बोलावे ते त्यांना समजेना पण अखेर त्यांनी पंचनाम्यावर सह्या केल्या आणि प्रोसिजरपूर्ण झाली.
दरम्यान सायंकाळचे पाच वाजले होते. आमच्या घरापुढची गडबड ऐकून समोरच्या बंगल्यातले एक ओळखीचे गृहस्थ बाहेर आले. तेव्हा तीन चार व्यक्ती, मी आणि माझी बायको आणि पोलिस असे दृश्य त्यांना दिसले.
काय झाले? त्यांनी तिथूनच खूण करून विचारले. चोरी झाली आमच्याकडे असे मी ओरडून सांगितलेे. मग ते थेट आमच्या इमारतीजवळ आले.
काय सांगताय? कधी झाली? काय चोरीला गेलं?’... त्यांची विचारले.
अहो बुट गेला ना माझामी जोरात आणि गंभीर चेहर्‍याने उत्तर दिले. त्यावर चक्कर येऊन पडतात की काय असा भाव त्यांनी चेहर्‍यावर आणला. अशा प्रकारची चोरी आणि त्याचा तपास हे त्यांच्या ५० आयुष्यात ते प्रथमच पाहत असावेत. त्यानंतर मग इतरहीजण गोळा झाले आणि माझ्या बुट चोरीची वार्ता हा: हा: म्हणता सगळ्या गल्लीत पसरली. मग या भागात कशा चोर्‍या होतात, वगैरे तक्रारी या सर्वांनी त्या पोलिस जमादारांना सांगितल्या. दुसरीकडे माझ्याबद्दल त्यांना गंमत आणि कौतुकही वाटत असल्याचे जाणवले.

एकंदर बुटाची चोरी ही गंभीर गोष्ट आहे आणि चोरांपासून संरक्षण होण्यासाठी आमच्या कॉलनीत गस्त वाढविण्याची गरज आहे, हे त्या जमादार साहेबांना मनोमन पटलं. काही लागले तर माझ्या मोबाईलवर फोन करा असे आश्‍वासन देऊन ते सद्गृहस्थ निघून गेले. त्याच रात्रीपासून मोटारसायकलवरील पोलिसांची गस्त आमच्या कॉलनीत सुरू झाली. पुढे दहा पंधरा दिवस ही गस्त सुरू होती. रात्री काठी आपण्याचे आणि पोलिसांच्या शिटीचे आवाजही येऊ लागले. बुट सापडला नाही पण नंतर येणार्‍या चोरांचे भय कमी झाले. दुसर्‍या दिवशी मी निवांत मनाने ऑफिसला गेलो, अर्थातच जुना बुट घालून. तेव्हा एका चॅनलच्या प्रतिनिधीचा मला फोन आला. तुमची बुटाची चोरी झाली ते खरंय का? मी हो म्हणालो. मग आम्हाला तुमचा बाईटघ्यायचाय, कधी येऊतो चिकटपणे म्हणाला. पण मी सुद्धा एक पत्रकार असून आता ही घटना जुनी झाली आहे, इत्यादी सांगून मी त्याला कटवले. कारण मला या प्रकरणाचा खरंच कंटाळा आला होता आणि त्या दिवशी आमच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन होते.

या घटनेला दहा दिवस उलटून गेले. मला पुन्हा एकदा त्याच जमादारसाहेबांचा फोन आला, ‘एक नोटीस तुम्हाला द्यायचीय? कुठे येऊ?’ आता काय पुन्हा उदभवलंय, असा विचार माझ्या मनात आला. मी त्यांना ऑफिसचा पत्ता सांगितला. दुपारनंतर ते आले आणि एक नोटीस मला त्यांनी दिली. त्यावर लिहिले होते की बुटचोरी सारखी क्षुल्लक गोष्ट आमच्या तपासात येत नसल्याने तुमची तक्रार फेटाळण्यात येत आहे.ती नोटीस मला देऊन त्यांच्या रजिस्टरवर त्यांनी सही घेतली. का कोण जाणे मला मात्र उगाचच सुटका झाल्यासारखे वाटले. आज मात्र त्यांना मी आग्रहाने चहा पाजला. जाताना त्यांच्या साहेबांसाठी आमचा दिवाळी अंकही दिला. दरम्यानच्या काळात मी एक बुटही विकत घेतला होता. अर्थातच कमी किंमतीचा. त्यामुळे बुट चोरीचे दु:खही मी विसरलो होतो. त्यातच तक्रार फेटाळल्याने व्याप वाचला, अशी माझी मध्यमवर्गीय प्रतिक्रिया उमटली. मी एकदम रिलॅक्सझालो.

***
या घटनेला साधारणत: महिना उलटला. एके दिवशी पुन्हा एकदा वर्तमानपत्रात एक गंमतीदार बातमी पहिल्या पानावर प्रसिदध झाली. मथळा होता, ‘तीन अज्ञान श्‍वानांवर गुन्हा दाखल’. घडले असे होते की औरंगाबादच्या सिडको परिसरात एका गरिब महिलेने एक शेळी पाळली होती. ती चरण्यासाठी म्हणून जवळच असलेल्या महापालिकेच्या ओसाड बागेत गेली. तिथे तीन भटक्या कुत्र्यांनी मोका साधून तिच्यावर हल्ला चढवत तिचा फडशा पाडला. त्या बिचार्‍या गरिब महिलेचे नुकसान झाले. त्याविरोधात ती जवळच्या पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवायला गेली. पोलिसांनीही अतिकार्यक्षमता वापरून तत्काळ तक्रार दाखल केली. एफआरआयमध्ये गुन्हा नोंदविताना तीन अज्ञान कुत्र्यांवरवहिम ठेवला. हा किस्सा नंतर पोलिस आयुक्तांनी पोटभर हसत दुसर्‍या दिवशी पत्रकारांना सांगितला. नव्याने आलेल्या या पोलिस आयुक्तांनी पोलिसांवर सर्वसामान्यांचा विश्‍वास वाढावा म्हणून कुठलीही तक्रार तत्काळ नोंदविण्याचा आदेश आपल्या कर्मचार्‍यांना दिला होता. पण सरकारीपण मुरलेल्या पोलिस कर्मचार्‍यांनी मग कुठल्याही तक्रारीची अशा पद्धतीने नोंद करायला सुरवात करत आयुक्तांच्या चांगल्या योजनेला वेगळ्या प्रकारे खीळ घालण्याचा प्रकार केला. माझ्या बाबतीत हेच घडले असावे. तक्रारीऐवजी एफआरआय दाखल करा, असे ते मुद्दामच म्हटले असावेत. मात्र पोलिसांचा हेतू काहीही असो. माझ्या बुटाची चोरी झाल्याची बाब मनाला प्रचंड लागल्यानेच मी प्रामाणिकपणे पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यामागे चेष्टा-मस्करीचा मुळीच हेतू नव्हता. माझ्यासारख्या पत्रकाराकडून कायद्याची अशी थट्टा कधी तरी होईल का?

आज या घटनेला वर्ष होईल आणि मी विकत घेतलेल्या स्वस्त बुटालाही. पण अजूनही तो वर्षभर तरी टिकेल असं मला वाटतंय. मी त्याला अनेकदा गॅलरीत ठेवतो. पण या बुटाकडे कुठल्याही चोराची आजवर वाईट नजर पडलेली नाही. माझा स्वस्त बुट शाबूत आहे. औरंगाबाद येथील शहागंजच्या बाजारात मी तो केवळ ३०० रुपयांना घेतलाय. त्यामुळे आपल्याला असे बुट जास्त लाभदायक ठरतात असा एक ज्योतिषी तर्कही मी लढविला आहे. चोरीला गेलेल्या बुटाची आठवण होते कधी-तरी. मात्र मी आता ठरवलेय,‘गड्या आपला स्वस्त बुटच बरा’...
copyright : Pankaj P Joshi


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट