मी कोण?

खरंच मी कोण आहे? असा प्रश्न पडतो, तेव्हा माझ्या बद्दलच्या या प्रतिक्रिया लक्षात घेणे गरजेचे होऊन बसते.

" तू ना खूप भोळा आहेस. अरे तुझ्या स्वभावाचा सगळे फायदा घेतात हे तुला कळत नाही.' – इति आई.

'' लॉलीपॉप आणून देते तुला एक. रुद्रापेक्षाही लहान आहेस तू.'' – अर्थातच बायको.

'' बघ तू काय तो योग्य निर्णय घे. मला तुझ्या क्षेत्रातलं काहीच कळत नाही." – वडील

'' पक्का व्हीम्जीकल आहेस, येथे काम करताना तुझ्या सगळ्या व्हीम्स बाजूला ठेव.'' – एक संपादक

'' रोज देवाजवळ दिवा लाऊन एक माळ जप करावा. '' – आजोबा ( आईचे वडील )

'' जोश्या तू तर आपला मित्रहे'' – मामा

'' हां ! काही पण सांगतो का '' – बहिण.

''... पण काही म्हण तू एका जागी टिकू शकत नाहीस. आपले नाव प्रयोग नाही, तर रिसल्ट असायला हवे'' – एक साहित्यिक संपादक

'' माझा बच्चूये गं तो'' – मावशी

'' ए हिऱ्या...'' – आजी (वडिलांची आई )

'' पंक्या तू खूप स्वार्थी आहेस'' – एक दिवंगत मित्र

'' देखो, मै कौन हुं ये जब तक पता न चलता, तब तक शादी न करना '' – तपोवनात भेटलेला साधू .
'' ये चल ना यार, थोडा वेळ झोपू ना एकत्र'' – कॉलेजच्या जमान्यात बसमध्ये भेटलेला एक गे प्रवासी .

'' हमरे पंकज...'' – कुंभमेळ्यातील साधू

'' पंक्या, वाईट वाटून घेऊ नको पण तुला बोलायचं धोरण नाही ये '' – एक जिवलग मित्र.''

'' ये बालक तो बहुत पराक्रमी है ''- कुंभमेळ्यातील आणखी एक साधू.

'' तू लोखंड लागून किंवा एखाद्या अक्सिडेंटमध्ये मरणार बहुतेक'' – काही वर्षांपूर्वी मला बिनपगारी राबवून घेणारा एक ज्योतिष अभ्यासक.

'' दादा मला खूप आवडतो''- माझी एक गोड छोटी बहिण.

'' तू विमानतळावर असा घाबरून का वागत होतास '' – एक आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्त्या.

'' आधी हे काय लिहिले ते वाचून दाखव, मग तुला मार्क देतो.'' – रसायन शास्त्राचे प्रोफेसर.

'' पुन्हा कागदाचा पिशव्या विकताना दिसला तर तंगडे तोडील '' – कागदी पिशव्या विकणारी एक खडूस म्हातारी.

'' बाब्बा माझ्या '' – मुलगी.

'' तुम्हाला काहीच इच्छा नाही म्हणता, पण तुम्ही अहंकार सोडला आहे का? – माझे सद्गुरू.

'' आमच्या जर्न्यालिसम डिपार्टमेंटचा हिरो '' – एक वर्गभगिनी.

'' मेहनत करावी लागती तेव्हा पैसे मिळतात '' – काका.

'' तू पत्रकार म्हणून चांगलाये, पण तुला व्यवहार कळत नाही '' – माझ्याकडून खंडणी उकळणारा एक गुंड.

'' पन्क्या तू नक्की चारचाकी घेणार '' – मावस मामा.

'' उद्या माझ्या बायकोचा फोटो आला पाहिजे बातमीत '' – मला पैसे देण्याचा अपयशी प्रयत्न करणारा एक आदर्श शिक्षिकापती.

'' दादा तू व्हाटस अपवर का नसतो '' – माझी एक टेकनोसाव्ही बहिण.

'' तुम्ही चाळीशीनंतर नक्की बियर घ्याल '' – एक दिवंगत थियेटर मालक.

'' शानपना करतो का? प्रक्टिकलनंतर बाहेर भेट, मग सांगतो '' – एफ. वाय. बी एस्सीचा एक सोबती.

'' हा हिऱ्याचा हार आणि ही तुळशीची माळ, काय पाहिजे यातले तुला '' – स्वप्नात भेटलेला अवलिया.

'' मी पण तुझ्यावर प्रेम करते, हे नाही कसे म्हणू '' – प्रेयसी

'' तू ही चिट्ठी वाचशील तेव्हा मी या जगात नसेल '' – एक दिवंगत जिवलग मित्र.

'' वेबसाइटवरील लोकांशी आयुर्वेदाबद्दल चाटिंगची कल्पना चांगली आहे, पण त्यामुळे आमच्या आयुर्वेदिक उत्पादनांचा खप वाढणे गरजेचे आहे – पुण्यातील एक फ्यामिली आयुर्वेदाचार्य.

*** आणि***

'' कोण आहोत आपण? आपल्या जन्माचा उद्देश काय? मेल्यावर मी कसा दिसेन'' – इति मी.

मी कोण हे शोधण्यासाठी मला आतापर्यंत जगलेल्या बऱ्याच गोष्टी सांगाव्या लागतील. त्या तुम्हाला ब्लॉगवर सांगाव्या असे ठरवलेय आता.


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट