टाईप टू ए- तेवीस चौदा !

 -------

प्रकरण एक : 


प्रिय पंकज,

तू जेव्हा हे पत्र वाचशील तेव्हा कदाचित मी या जगात नसेल. जेव्हा केव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा चंद्राकडे पाहत जा, मी तूला दिसेल. तुला मुलगा होईल तेव्हा त्याचे नाव विलास ठेव. खूप मोठा हो. मायडीला त्रास देऊ नको. ..


तुझाच,

विलास



 ती पौर्णिमेची रात्र होती का? आता आठवत नाही. समोरच्या आकाशात चंद्र उगवला होता. चांगला मोठा. पांढराशुभ्र. सगळीकडं चांदणं पडलं होतं. हिवाळा सरत आला होता, पण तरीही हवेत बºयापैकी गारठा होता. कारण उघडं रान. रानातल्या पिकाची सोंगणी होऊन गेलेली होती आणि ते सपाट करण्यात आलं होतं. तीही मातीत धसकटं शिल्लक होतीच. बसल्यावर ती टोचत होती.  रानातच एका कोपºयावर सगळ्यांना दिसेल असा तिरपा मंडप उभारला होता. त्यात शंभरचा दिवा भणभणत होता. खाली ताडपत्री होती. मंडपाच्या वरच्या बांबूलाच भोंगा बसवला होता. आत माईक होता आणि त्यातून थोडं जरी बोललं, तरी सगळ्या रानात घुमेल असा आवाज येत होता. या मंडपाच्या भोवती असलेल्या रानात अनेक तंबू उभारलेले होते. उजवीकडे मुलींचे आणि डावीकडे मुलग्यांचे. आठवी ते दहावीच्या. शेजारच्या गावाजवळच्या रानात आमचा स्काऊट-गाईडचा कॅम्प लागला होता. कॅँम्पची ती पहिलीच रात्र होती. जेवणानंतर शेकोटीच्या कार्यक्रमाला सर्व मुले शेकोटी समोरच्या जागेत येऊन बसलो होतो, स्वेटर घालून..पण तरीही थंडी वाजतच होती. म्हणून मग माझ्यासह अनेकांनी गोधडी, चादरी, कांबळी असं काहीबाही पांघरलेलं होतं. काही मुलं स्टेजवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत होती. सर्वात मागच्या बाजूला जमिनीवर मागे दोन हात टेकवून मी निवांत बसलो होतो. हरवल्यासारखा. माझ्याशेजारी एकदोन वर्गमित्रही होते...रानातली माती थंड होती आणि त्यातले खडे, धसकटे हाताला टोचत होती. अर्धा एक तास तसाच गेला असावा. कदाचित रात्रीचे नऊ वाचून गेले असावेत. 


मला उगाचच शांत बसलेला पाहून शेजारी बसलेल्या कृष्णानं विचारलं...

तुला कळलं का?

काय?...

विलास गेला अरे...

हो, सकाळीच. बस स्टॅँडवर भामरे सरांच्या संज्यानं सांगितलं...माझं थंड उत्तर...

तुझा खूप चांगला मित्र होता ना?....

हं ऽऽ.. मी पुन्हा थंडच...

माझा असा प्रतिसाद पाहून तो परत तो कार्यक्रमात गुंतलेला.. आणि मी समोरच्या काळ्याशार आकाशात दिसणाºया तेजस्वी चंद्राकडे पाहत हरवलेलो. माझ्या मनात काय विचार येत होते? नाही ! काहीच नाही. माझ्या मनात कोणत्या भावना दाटल्या होत्या? कोणत्याच नाही.. किंबहुना आता मी त्या भावनांच्या आणि विचारांच्या पलीकडे गेलो होतो. पुढे कितीतरी वेळ मी केवळ चंद्राकडेच पाहत राहिलो... मख्खपणे, सुन्नपणे...असा कितीवेळ गेला मलाच कळलं नाही. माझ्या पुढे, आजूबाजूला असंख्य मुलं होती, वर्गमित्र होते, पण या गर्दीतही आज मी एकटा होतो. सुन्न होतो, बसून होतो....

मी नक्की काय करायला पाहिजे होतं? रडायला पाहिजे होतं का? खालच्या मातीत तोंड खुपसून हमसून हमसून रडायला हवं होतं का? ओरडायला हवं होतं का? माझ्या भावनाच मरून गेल्या होत्या. ज्याच्यामुळं भावनांना बहर येत होता, तोच तर आज सकाळी मरून गेला होता. मग कशा जागतील भावना. मी आता साडेपंधरा वर्षांचा झालेला होतो आणि लवकरच पाचेक महिन्यात दहावीत गेल्यावर मला सोळावं लागणार होतं..बदलणारं वय, हळवं मन...त्यात एक जबरदस्त मानसिक आणि वैचारिक आधार होता. तोच आज सुटला. कितीतरी मोठा धक्का. इतका की आधीच्याच वर्षात माझे आजोबा आणि नंतर आत्या गेली, तेव्हाही न बसलेला...

...मध्येच मंडपातला भोंगा किंचाळला. माईकमध्ये काहीतरी तांत्रिक अडचण झाली असावी.. मी भानावर आलो... काही कळायच्या आतच कार्यक्रम संपल्याचे आणि सर्वांनी झोपायला जाण्याचे आवाहन करण्यात येत होते... सर्वांसोबत मी धडपडत उठलो आणि अवघ्या काही पावलांवर असलेल्या माझ्या संघाच्या तंबूत परतलो. यंदा मी संघनायक होतो. पण हे कौतुक आई-वडिलांव्यतिरिक्त ज्याला आवडणार होतं, तोच तर नव्हता ऐकायला....तो तर सकाळीच निघून गेला होता अनंताच्या प्रवासाला...झोपताना मी त्याचं ते पत्र आठवत राहिलो. शेवटचं. फक्त आणि फक्त मलाच लिहिलेलं.  त्याच्या सुंदर टपोºया अक्षरात. पोस्टाच्या पिवळ्या पाकिटात त्यानं ते व्यवस्थित घडी घालून ठेवलं होतं, सोबत एक एक्सलेअर्सचं चॉकलेट आणि एक सोनेरी रंगाचा क्रॉस... होता माझ्यासाठी ठेवलेला. पण ते पत्र मला कुणी दिलं नाही.. त्या त्याच्या शेवटच्या आठवणीला मी स्पर्शही केला नाही...त्याच्या घरी पलंगावर मी बसलो होतो. माझ्या शेजारी एका बाजूला त्याची आई आणि दुसºया बाजूला माझी आई... समोर इतर कुणी बायका...हे टाऊनशिपमधलं त्याचं घर..दोन मजली इमारतीतील पहिल्या मजल्यावरचं...त्याच्या वडिलांना मिळालेलं क्वार्टर... त्याचा पत्ता होता टाईप टू ए-तेवीस चौदा, बॉंम्बे गोवा मार्ग, ओझर टाऊनशिप, ओझर... सगळीकडे रडारड आणि काळजी...

पंकज, तुझ्यासाठी हे पत्रंय... त्याची आई म्हणजेच सावंत मावशी म्हणाल्या.

मी ते पिवळं पाकिट हातात घेतलं, त्यावर माझा पत्ता होता. आणि डाव्या कोपºयात प्रेषक म्हणून त्याचं नाव. उघडलं. आत वहीचे एक पान घडी घालून ठेवलेलं, सोबत चॉकलेट आणि क्रॉस....मी पत्र वाचतो, दोन मिनिटं, पाच मिनिटं... एकदा, दोनदा, तीनदा... सगळ्यांच्या नजरा माझ्याकडं.

‘काय लिहिलंय रे आॅँ.. बोलत का नाही...सांग? काय लिहिलं?  शेजारी बसलेल्या आईनं मध्येच मला विचारलेलं असतं.. मी काही न बोलता ते पत्र तिच्याकडे देतो. मग ते ती वाचते, शेजारी बसलेल्या मावशींना देते, त्या वाचतात.. रडत राहतात...रडतच राहतात...

‘तुझ्यावर फार जीव आहे, त्याचा...’ रडता रडता सांगतात. मी ढिम्म शांत. अजिबात प्रतिक्रिया न देता थंडच...


तो अतिशय हळवा, भावनाप्रधान, कवी, लेखक, चित्रकार, चांगला खेळाडू.. आणि याच्या जोडीला सायन्सचा विद्यार्थी...बारावी सायन्सला होता...पण एकदा मध्येच काही कारणानं गॅप घेतलेला...कधी कधी मला बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्रीबद्दल सांगत राहायचा. इलेक्ट्रॉनिक्सच्या नव्या गमती जमती सांगायचा, कॉलेजमधल्या गमती सांगायचा. त्याच्याकडे डिसेक्शन बॉक्स होता. याने बेडकावर डिसेक्शनचे प्रयोग करतात, असं सांगायचा... मी डोळे मोठ्ठे करून ऐकत राहायचो. कुठल्यातरी भविष्याच्या स्वप्नात रमायचो...सायन्सच्या, इलेक्ट्रॉनिक्सच्या.. कवितेच्या, लिखाणाच्या, चित्रकलेच्या.. पण आज त्या गर्दीत, स्वत:च्या घरात तो नव्हता. एचएएलच्या प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल होता. त्याच्या नाकातोंडाला नळ्या होत्या. घसा फोडला होता, त्याचा आणि त्यातूनही एक मोठी नळी घातली होती. आई आणि मी सोबतच्या एकदोन आयाबायांसोबत त्याला पाहायला मग त्याच्या घरून थेट हॉस्पिटलला गेलो होतो. पण आम्हाला सोडलं नाही... दुरूनच त्याला पाहिलं. तो नळ्यांनी आता हतबल झालेला होता. त्याचा उंचपुरा, सावळा देह सगळ्या नळ्यांनी जखडून गेला होता आणि भान हरपलं होतं. जणू कालच संध्याकाळी त्यानं जगाशी नातं तोडायचं ठरवलं होतं. मग एक विषाची बाटली  आणली, तोंडाला लावली. संध्याकाळ झाली होती. त्याच्या तोंडातून फेस आल्यावर आणि हातापायाला त्याने झटके दयायला सुरवात केल्यावर त्याचा मोठा भाऊ, वडील, लहाना भाऊ-बहिण सगळेच घाबरले.  ‘आप्पा, मला आता जगण्याची इच्छा नाही राहिली...’ तो सांगत होता, त्याही अवस्थेत. त्याचा मोठा भाऊ वीजेच्या वेगानं इमारतीच्या खाली आला होता आणि प्रचंड वेगानं सायकल दामटत हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. अ‍ॅम्बुलन्स आणण्यासाठी. तो पर्यंत याची अवस्था बिघडत चालली होती. अ‍ॅम्बुलन्स आली, त्याला न्यायला लागले तेव्हा त्याची पकड पलंगावर इतकी घट्ट की ती सुटेना, त्याच्यासोबत बाहेरच्या खोलीतला लोखंडी पलंगही दरवाजापर्यंत ओढत गेला... पण शेवटी वेळेत त्याला रुग्णालयात नेले गेले.. वेळेत उपचार सुरू झाले आणि अजूनही त्याच्या शरीरातला श्वासाचा भाता वरखाली करत होता... दुसºया दिवशी ही बातमी समजल्यावर हट्ट करून मी आईला घेऊन त्याच्याकडे गेलो होतो... मुळात असं कसं असतं मित्रप्रेम..एका लहान मुलाची मोठ्या मुलाशी मैत्री होऊ शकते का? या सनातनी विचारतच अख्खं गाव आणि माझं कुटुंबही. पण मला नेण्यात आलं. मी आता दरवाजाच्या काचेतून त्याला पाहिलं बरीच यंत्र त्याच्याभोवती होती. तो शांतपणे पहुडलेला होता. माझ्यासह, त्याच्यासह सगळ्या जगाचा त्याला विसर पडलेला होता. मुळात तो शुद्धीतच नव्हता..

‘पंक्या, माझी ही कवितांची, कथांची पेटी आहे ना, ती तू माझ्या घरच्यांकडून मागून घे...’ काहीच दिवसांपूर्वी तो म्हणाला होता...

पण का?

‘मी मरणारे आरे पंक्या...’ त्यावर त्याचं उत्तर

‘पळ  काहीपण सांगतो का...’ मी हसून त्याला उडवून लावलं...मग माझ्या डोळ्यात डोळे घालून भेदक नजरेनं त्यानं पुन्हा तेच सांगितलं... त्याच्या त्या नजरेनं मी चरकलो..., पण मी पुन्हा उडवून लावलं त्याला... मी सगळं आठवत होतं.

‘त्याला म्हणे त्याचे प्रिन्शिपॉल का कोणी बोल्लं म्हणे... म्हणून त्यानं विष घेत्लं... ’ हॉस्पिटलमधून बाहेर पडताना, सोबतची एक बाई आईजवळ सांगत होती...माझं लक्ष अजूनही आयसीयूमध्येच अडकलेलं. 

‘आई, मी थांबू का इथं...?’

‘काय कामंय तूझं इथं, लहान पोरांना थांबू देत नाही..... उगाच तू मला आता त्रास देऊ नको, घरी चल दादांना सांगते तुझी नाटकं....’ आईनं भर हॉस्पिटलच्या गर्दीत तिचा ठेवणीतला आवाज चढवला... मग मी मुकाट मान घालून तिच्या मागून चालू लागलो. आपण काहीच करू शकत नाही... निदान थांबू तर शकतो, पण तेही नाही, कारण आपलं वय. वयानं आणलेली हतबलता....मी चडफडत निघालो तिच्या मागे....काहीच बोललो नाही.

काय रे शांत शांत.. तिला ते जाणवलं असावं... हे बघ शनिवारी सकाळची शाळा झाली की ये तू दादांसोबत भेटायला... पडत्या फळाच आज्ञा घेऊन, आशेचा एक किरण घेऊन मी चालू पडतो तिच्यासोबत आणि मुकाट गावाकडं जाणाºया खटारा जिपड्यात स्वत:ला झोकून देतो.. दहाच मिनिटांत जीप भरते, आम्हाला चेंगरून टाकते मीही चेंगरतो....पण विचार काही चेंगरत नाही.. मेंदू काही चेंगरत नाही. उलट आता मेंदू चांगलाच भानावर आलेला असतो... आपण ते पत्र घ्यायला पाहिजे होतं, ते चॉकलेट, निदान तो क्रॉस तरी....तो वाचेल ना? हो नक्कीच होईल तो बरा.. पुन्हा आम्ही पहिल्याप्रमाणेच भेटू अगदी कडकडून...गप्पा मारू... फिरायला जाऊ... मी मनाला समजावत असतो.. एव्हाना जीप गावच्या रस्त्याला लागलेली असते आणि माझ्या मनाला वेग येऊन ते शनिवारच्या दिवसापर्यंत पोहोचलेलं असतं....दादांना कसं पटवायचं? हाणलं बिनलं तर.... उगाच? पण पटवावं, तर लागणारच होतं...


संध्याकाळी वडील घरी आले... शाळेत जसे ते कडक शिक्षक तसेच घरीही कडक, आपण थोडं काही चुकलो की सरळ धोपटून काढायचे रितसर...मग मी जरा टरकूनच असायचो. पण आताशा मी नववीत गेल्यानंतर त्यांनी धोपटायची सवय कमी केली, पण तरीही त्यांची भीती होतीच..मनात. संध्याकाळी मग आईनं त्यांना गंभीरपणे सांगितलं सगळं काय घडलं ते.. आणि कसे कोण जाणे, त्यांना परिस्थितीचं गांभिर्य कळालं, माझ्या भावना कळाल्या आणि ते चक्क तयार झाले मला घेऊन जायला पुन्हा...मी त्याच आनंदात होतो. शनिवारची वाट पाहत होतो. एकदोन दिवसातच तो उजाडणार होता...


II.

प्रिय विलास, 

का कोण जाणे आज तूझी तीव्रतेने आठवण येतेय. स्वार्थी जगात खरं प्रेम, खरी मित्रता काय असते, ती तू मला शिकवली, नव्हे, तसा वागलाही.. त्यानंतर पुढे कॉलेजला दोघांचा अपवाद इतकी घट्ट मैत्री कुणाशीच झाली नाही. प्रत्येकजण फक्त स्वार्थापुरताच. आता या वयात कळंतय की इथे स्वत:च्या आई-वडिलांचं, बहिण भावांचं कुणी होत नाही आज, मग मित्रांचे कसे होणार? प्रत्येक जण पोटार्थी आणि स्वार्थी. अरे हो एक सांगायचेच राहिले.. इतक्या वर्षात जग खूप बदललंय. मला मुलगा नाही, पण मुलगी झाली गोड.. दोन वर्षांची असल्यापासूनच चित्र काढते. घरभर नुसती चित्रंच चित्र... वह्या, पुस्तकं, वर्तमानपत्रं काहीच सोडलं नाही...थोडी थोडी कविता, लिखाणही करते...तुझ्याप्रमाणेच पोट्रेटवर तिचं आतापासूनच प्रेम आहे खूप.... आणि हो कॅटबरी खूप आवडते तिला. एक्लेअर्स नाही बरं का आता फार मिळत...तिला आम्ही कुठलाच धर्म शिकवला नाही आणि सर्वच धर्मांबद्दल सांगितलंय.. परवा पोरीला चित्र काढताना अचानक तुझा विचार आला.... आणि तुझं पत्र आठवलं.. हा कसला विलक्षण योगायोग.. की तूऽऽच... नाही नाही मी इतका अंधश्रद्धाळू नाही. आणि हो.. तुला आणखी एक सांगायंचय, मी आता चंद्र पाहत नाही...पोरगी झाल्यापासून, पण तू गेल्यापासून चित्रं काढलेलं नाही आणि कविता करण्याच्याही भानगडीत पडलेलो नाही. अरे हो ! पुनर्जन्म वगैरे काही नसतो म्हणतात, पण बुद्ध म्हणाला होता माणूस गेल्यावर पंचतत्वात विलीन होतो आणि याच पंचतत्वांतून एकाच व्यक्तीचे गुणधर्म नव्याने जन्माला येणाºया माणसांमध्ये अवतरतात.... मी हे पूर्वी वाचलंय, पण आता पोरीची चित्रकारी पाहून आता माझा बुद्धाच्या या सिद्धांतावर विश्वास बसायला लागलाय... किंवा हे माझ्या मनाचे खेळ असतील, कोण जाणे, माहीत नाही...दहावीनंतर सायन्सला गेलो, पण मनच रमलं नाही.. कोण होतं मला हक्कानं सांगायला, मार्गदर्शन करायला तिथं, नंतर माझ्याकडेही तुझ्याप्रमाणेच डिसेक्शन बॉक्स आला.. पण तुझ्या आठवणीत तो मी वापरलाच नाही, कधी इच्छाच झाली नाही.. आजही कदाचित घराच्या माळ्यावर तो पडून असेल कुठेतरी. असो... आज का कोण जाणे तुझी आठवण तीव्रतेने येतेय... काळ बदललाय, वय बदललंय आणि जगण्याचा संघर्ष तीव्र होतोय.  आताशा आठवणी आल्यात की मी सुन्न होत नाही, थंड किंवा मख्ख बसून राहत नाही... आता डोळे पाणावतात... परवाच टाऊनशिपवरून जाणं झालं... मुलीला म्हणालो, येताना आपण इथे जाऊ, इथे माझा एक मित्र राहत होता... पण येताना अंधार पडला आणि राहून गेलं... घर येईपर्यंत एकच पत्ता मी वारंवार घोकत राहिलो टाईप टू ए- तेवीस चौदा... बॉम्बे गोवा रोड....टाऊनशीप. 

कळावे, लोभ असावा...

तुझाच

ह. भ. प. पंकज...


(कॉपीराईट : पंकज जोशी , डिसेंबर २०२१ )


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट