गोळी आणि प्रकाश !

 1.

गोळी आणि प्रकाश !

‘मित्रहो, 

ज्यांच्याविषयी मी बोलायला इथं उभा आहे, त्यांच्या बद्दल सांगताना मला फार अभिमान वाटतोय. आज ते हयात नसले, तरी त्यांच्या मुलांनी त्यांच्या सहिष्णुतेचा आणि मानवतेचा वारसा समृद्धपणे चालवला आहे. त्यात सर्वात अभिमानाची बाब म्हणजे साध्या सरळ स्वभावाच्या या माणसाची पुढची पिढी तितकीच साधी आणि सरळ निघाली. नैतिकता आणि सत्याची चाड जपत त्यांनी आपल्या व्यवसायात आज जी प्रगती केली आहे, त्यावरून हेच सिद्ध होतं की चांगल्या मार्गाने-नैतिकतेने उद्योगात उत्तुंग यश मिळवता येतं. 

आताच प्रमुख पाहुण्यांनी बोलण्याच्या ओघात अशा काही पत्रकारांचा उल्लेख केला की जे आर्थिक दृष्ट्या संपन्न स्थितीत आहे.  आपल्या राजकीय लिखाणावरून समाजात त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, असंही त्यांनी सांगितलं. पण मला त्यांना प्रश्न विचारावासा वाटतो, की आजच्या ज्या सत्पुरुषाच्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित आहेत, त्यांच्याठायी असलेली नैतिकता आणि सत्यता या संपादक महोदयांजवळ आहे काय? मला माहीत आहे, हे व्यासपीठ नाही या सर्वांचे, पण जेव्हा आपण एखाद्या चांगल्या-पवित्र कार्यक्रमाला हजेरी लावून आपली पत्रकारिता आणि संपादकपद कौतुकानं मिरवतो, तेव्हा आपण स्वत:ला एक प्रश्न विचारतो का? की बाबा आपल्याला या सर्वांचा काही अधिकार आहे का नैतिकदृष्टया? आपण त्यासाठी लायक आहोत का? गाडी-बंगला- आणि संपादकपद आलं म्हणजे तुम्ही खरंच लायक पत्रकार झालात का? अर्थात माझं बोलणं कुणी व्यक्तीगत घ्यायचं ते घ्यावं, कारण तुमची कर्मच घाणेरडी असतील, तर तुम्हाला लाज वाटणारच, शरम वाटणारच आणि ही शरम, लाच  व पापांची बोच तुम्हाला धड जगू देणार नाही आणि मरू देणार नाही... भलेही तुम्ही राजकारण्यांकडून घेतलेल्या पाकीटांतून मनशांतीसाठी परदेशवारी करा, मद्यालयात जाऊन त्या पेयाच्या धुंदीत स्वत:ची अनैतिकता लपविण्याचा प्रयत्न करा.. किंवा मग अगदी मसाज पार्लरमधल्या पोरीसमोर कपडे उतरवून फकीर होण्याची अ‍ॅक्टींग करा. तुम्हाला तुमच्या कर्मांचा हिशेब द्यावाच लागेल. मित्रहो, मला आजही आठवतं की काही वर्षांपूर्वीच एका लहान दैनिकात वृत्तसंपादक असलेल्या आणि आज मोठ्या दैनिकातील संपादकपदाचा भ्रष्ट ताज मिरविणाºया एका भोंदू पत्रकाराच्या गुंड भावानं एकाचा खून केला. तेव्हा त्याचं पेपरमध्ये नाव छापून येऊ नये किंबहुना बातमीच्या आडनावात जरा बदल करून घ्यावा यासाठी त्या नीतिभ्रष्ट पत्रकारानं दुसºया वृत्तपत्रातील एका चांगल्या पत्रकारावर दबाव टाकला होता. इतकंच नव्हे, तर त्याला धमकीही दिली. पण तो सत्य छापण्यावर ठाम राहिला....सांगायचं कारण काय तर तो तथाकथित राजकीय संपादक आज या कार्यक्रमाला हजर आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीविषयी आपण बोलत आहोत, त्यांच्या  जीवनाचा वेध घेत आहोत, त्याच्या नैतिकतेच्या  आणि सत्यपरायणेच्या गुणांच्या कोसो मैलपर्यंत हा माणूस जाऊ शकत नाही. त्यामुळं त्याला इथं थांबण्याचा तसा अधिकारच नाही. मला गंमत अशी वाटते की प्रमुख पाहुण्यांना हे माहीत असून ते या पत्रकारितेच्या सोंगाबद्दल असं जाहीर कौतुक कसं करतात. बहुतेक रविवारीय राजकीय कॉलममध्ये त्यांच्यावर या संपादक महोदयांनी आपल्या काळ्या शाईचा कृपावर्षाव तर केलेला नाही ना....ही घाण समाजातून जायलाच हवी, म्हणून आज मी तुमच्या माफीसह याबद्दल स्पष्टच बोलतोय... आज समोर आपण ज्या पुतळ्याचं अनावरण केलंय, तो प्रत्यक्षात माणुसकीचा, सहिष्णुतेचा, तत्त्वांचा आणि नैतिकतेचाही पुतळा आहे. मला त्यातून सत्याचे तेज निघताना स्पष्ट दिसत आहे. सत्य आणि वास्तवतेच्या त्या तेजाच्या प्रकाशाने जणू हा आसमंत उजळून निघाला आहे. या निमित्तानं मला महात्मा गांधीजींचे एक वाक्य आठवत आहे. ते म्हणायचे की पहले मैं ईश्वर को सत्य समजता था, फिर मुझे अनुभव हुआ की सत्य ही ईश्वर है....हा तो सत्याचा प्रकाश...

खरं तर आणखी मला बरंच काही बोलायचं असतं...पण मी अचानक माझ्या छातीवर जोरात आघात होतो.. छातीत प्रचंड वेदना आणि डोळ्यांसमोर प्रचड प्रकाश दिसतो.... काय चाललंय मला काहीच कळत नसतं....हे परमेश्वरा तू मला बोलावत तर नाहीस ना? मी तयार आहे, माझं मन स्वच्छ आहे... परमेश्वरा....

बहुतेक मी स्टेजवरच कोसळलोय... अस्पष्ट आवाज येतोय... गोळी लागलीय त्यांना.. कुणी चालवली.. अ‍ॅम्बुलन्स बोलवा...पुढचं ऐकायला माझ्या जाणीवा सक्षम राहिलेल्या नसतात. बहुतेक माझ्या बायकोचे शब्द मला ऐकू येत असावेत.. आणि माझं डोकं तिच्या मांडीवर असावं..हे पुसटसं जाणवतंय याशिवाय मला काहीही जाणवत नाही... डोळ्यासमोर दिसतोय अंधार आणि त्यात दिसतोय बारीकसा प्रकाशाचा एक बिंदू ....वाढत जाणारा, इतका की हळूहळू मीही त्यात सामावत जातोय....

- पंकज प्र. जोशी

(कादंबरीचे हे पहिले प्रकरण... पुढचे भाग लवकरच...क्रमाने..)

copyright : Pankaj Joshi-Feb 2022

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट