जेव्हा मी शोधतो जात अन् धर्म...

‘‘तू कुठल्या धर्माला मानतो? तुझ्या देवाबद्दलच्या कल्पना काय आहेत?’’ एक दिवस गावातल्या लोकांनी मला घेरून विचारलं.

मी म्हणालो, ‘‘अरेच्च्या असं काही असतं का? मला तर माहीतच नाही. मी तर आजवर माझ्या अवतीभवतीच्या माणसांनाच मानत राहिलो अन् त्यांच्यावर प्रेम करत राहिलो. इतकंच काय सृष्टीतील पशु, पक्षी, किटक, वनस्पती, जमीन, पाणी, हवा, आकाश अशा सगळ्यांवरच मी मनापासून प्रेम करत राहिलो.’’

गावकऱ्यांना माझं म्हणणं पटलं नाही, ते संतापले, म्हणाले, ‘‘अरे ही तर तुझी फार मोठी समस्या आहे, असं समज आणि जोपर्यंत त्यावर तोडगा काढत नाहीस, तोपर्यंत आमच्या गावात, नव्हे या सगळ्या परिसरात पाय ठेवू नकोस, चल निघ आताच्या आता...’

मी खूप अडचणीत सापडलो. अगदी आता आतापर्यंत तर माझं चांगलं चाललं होतं. पण इतक्या सगळ्या गावकऱ्यांनी सांगितलं आहे, तर खरंच आपल्याला काही समस्या असली पाहिजे, असा विचार करून मी त्याच क्षणाला गाव सोडलं.

मी चालत राहिलो, चालत राहिलो..मला माझ्या समस्यांवर तोडगा हवा होता. वाटेत मला एक ब्राह्मण भेटला. मला वाटलं याला उत्तर माहीत असणार आपल्या समस्येचं. 

म्हणालो, ‘‘महाराज! मी खूप अडचणीत आहे. मला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा.’’

त्यावर ब्राह्मणानं हसून माझ्याकडं पाहिलं आणि म्हणाला, ‘‘हा सर्व कर्मांचा खेळ आहे. धर्मानं नेमून दिलेलं कर्मकांड करत राहा, मी तेच करतो, तुही कर.. सर्व समस्या आपोआप संपतील’’

कर्मकांड म्हणजे काय अन् धर्म म्हणजे काय? मला कळालं नाही, मनासारखं उत्तर मिळालं नाही. म्हणून मग मी पुन्हा चालत राहिलो, चालत राहिलो.

खूप चालल्यानंतर मला हातात तळपती तलवार घेऊन युद्धावर निघालेला एक क्षत्रिय भेटला. मला वाटलं माझी समस्या याला नक्कीच कळंल, मी त्याला विचारलं, ‘‘महाराज ! मी खूप अडचणीत आहे, माझ्या प्रश्नावर काही उपाय सांगा’’ त्यावर मोठ्यानं वीरहास्य करत तो म्हणाला, ‘‘ मनगटात बळ आणि तलवारीत दुसऱ्याला पाणी पाजण्याची क्षमता असेल ना तर कुठलीही समस्या आपोआप सुटते.’’

मला त्याचं म्हणणं कळलं नाही. मी पुन्हा चालत राहिलो, चालत राहिलो. खूप अंतरावर मला एक व्यापारी विक्रीसाठी काही साहित्य घेऊन जाताना दिसला. त्याला पाहून मला खूप आनंद वाटला. वाटलं हा नक्कीच माझी समस्या सोडवेल. मी त्याला माझी समस्या सांगितली.

त्यावर तो म्हणाला, ‘‘बुद्धीचा वापर करून चलाखपणे पैसा कमवता यायला पाहिजे, मग तू बघशीलच पैशानं तुझ्या सर्व समस्या चटकन सुटतात की नाही ते?...’’

मला त्याचंही म्हणणं काही केल्या पटेना आणि माझ्या समस्येचं कोडं काही सुटेना.. म्हणून मी चालत राहिलो, चालत राहिलो. मग मला एक रस्ता स्वच्छ करताना एक सेवक दिसला. 

मी त्याला विनम्रपणे अभिवादन केलं आणि म्हणालो, ‘‘महाराज, तुम्ही रस्त्यावरची ही सर्व घाण साफ करत आहात, तर माझी समस्या सोडवून माझं मन साफ करायला तुमची काहीच हरकत नसावी.’’ 

त्यावर त्यानं केविलवाणं हास्य केलं. 

म्हणाला, ‘‘मी तर समाजाच्या दृष्टीनं क्षुद्र माणूस, कोणी कितीही मारझोड केली, अन्याय अत्याचार केला, तरी समाजातील लोकांची घाण मान खाली घालून साफ करत राहण्याचं माझं काम...मी तुला काय उत्तर मिळवून देणार. पण एकच सांगतो, कोणी कितीही अन्याय केला, तरी सहन कर, दोन वेळच्या अन्नासाठी खाली मान घालून वाट्टेल ते कष्ट कर, मनाला मारून टाक, अस्तित्वाला मारून टाक...’’ 

मला त्याच्या उत्तरानं समाधान झालं नाही, उलट राग आला आणि कीवही.. मी चालत राहिलो चालत राहिलो...कितीतरी वेळ, कितीतरी दिवस, कितीतरी महिने, कदाचित वर्षे, कदाचित युगंही.. मलाच माहीत नाही मी किती चालत राहिलो...

एका रात्री चालताना दूरवर मला चमकणारे पांढरेशुभ्र पर्वत दिसू लागले. बर्फामुळं ते पांढरे झालेले होते, पण रात्रीच्या अंधारातही ते तेजस्वीपणे चमकत होते. मी जरा वेगानं चालत गेलो. दूरवरूनच तेथील सरोवराकाठी शुभ्र कपडे परिधान केलेला एक तेजस्वी म्हातारा बसलेला मला दिसला. 

पायातलं बळ एकवटून मी वेगानं त्याच्याकडं जाऊ लागलो, पण आता म्हाताऱ्याऐवजी मलाएक शुभ्र वस्त्र परिधान केलेली एक तेजस्वी लावण्यवती दिसू लागली. 

मी पुन्हा चालत राहिलो, चालत राहिलो. आता मला त्या लावण्यावती ऐवजी विविध पक्षी-प्राणी-वनस्पती असं आळीपाळीनं दिसू लागलं. हा काय प्रकार आहे ते मला कळेचना. इतका काळ चालल्यानंतर बहुतेक आपल्याला भ्रम झाला असावा असा विचार मी मनात आणला आणि त्याक्षणी चक्कर येऊन जमिनीवर कोसळलो. 

बराच वेळानंतर कुणीतरी तोंडावर शिंपडलेल्या थंड पाण्यानं मी शुद्धीवर आलो. पाहतो, तर मला सर्वात आधी सरोवराकाठी दिसलेला तोच तेजस्वी म्हातारा आपल्या मांडीवर माझं डोकं घेऊन बसला होता. तेज इतकं की त्याच्या चेहऱ्यावर प्रकाशच दिसत होता. मी त्याही अवस्थेत त्याला माझी समस्या सांगितली. 

त्यावर तो त्या तेजस्वी प्रकाशशलाकांमधून तो माझ्याकडं पाहून प्रसन्न हसला, म्हणाला, ‘‘मला काय ठाऊक धर्म अन् जात, मलाही कुठे आहे जात आणि धर्म.. सर्व सृष्टीला जो चैतन्यमयी प्रकाश देतो, त्या सूर्याला असतो का धर्म? मनुष्य असो की प्राणी, सर्वांच्या शरीरात चैतन्य निर्माण करतं, त्या पाण्याला असते का जात आणि धर्म? वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक, आकाश, जमीन यांना असते का जात? धर्म? मला तर माहीत नाही बुवा...आणि मनुष्यप्राण्यातील रक्ताला, हाडामांसाला, त्वचेला, कुठे असते जात आणि कुठे असतो धर्म...मला जात नाही.. मला धर्म नाही.. आणि मी ते निर्माणही केलं नाही.. मी ते निर्माण करणारही नाही....कारण मला जात-धर्म माहीतच नाही....’’ 

हे सांगत असतानाच प्रकाशरूपी तो वृद्ध अचानक दिसेनासा झाला. मी आता शुद्धीवर आलो. म्हाताऱ्याच्या उत्तरानं मला आतून खूप खूप समाधान मिळालं होतं.. 

मी त्या चमकदार सरोवराच्या काठी गेलो. सर्वात आधी ओंजळीत पाणी घेऊन माझी अनेक वर्षांची तहान भागवली. मग थोडं पाणी चेहऱ्यावर मारलं. मला हुशारी आली. आकाशातला चंद्र तोपर्यंत अधिकच तेजस्वी झाला होता. त्या तेजस्वी प्रकाशात सरोवरातल्या पाण्यात माझं प्रतिबिंब पाहण्याचा मला मोह झाला आणि धक्काच बसला... आपल्या तेजस्वी वाणीनं उत्तर देणाऱ्या मघाच्या म्हाताऱ्यासारखाच माझा चेहरा दिसत होता..

त्याकडं पाहत मी म्हणालो, ‘अरेच्चा ! जात-धर्म वगैरे असतं का? मला तर बुवा माहीतच नाही....!


- पंकज प्र. जोशी (मीडियाशिल्प)/ Pankaj Joshi's blog (mediashilp.com) 

 (रुपक कथा), सर्व हक्क सुरक्षित ( एप्रिल २०२२ )

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
मला लहान पणापासूनच जाती धर्म पंथ मानणाऱ्या माणसांचा राग येतो अस वाटतं जात नावाची गोष्ट या जगात नको हवेत फक्त माणसं एकाच प्रकारची

लोकप्रिय पोस्ट